नाक्यावरच्या भटकंतीची ठरलेली वेळ, संध्याकाळच्याच आसपासची. तोच रस्ता, तीच दुकाने, आजूबाजुला भटकणारी तीच ती माणसं. पण आज संध्याकाळी मात्र एका मुलीला पाणीपुरी खाताना बघत होतो. तुम्ही तर रोजच बघत असाल नाही, पण राव ऐका तर पुढे. भैय्याने पाणीपुरी वाटपासाठी एक प्लेट तिच्या हातात धरताच तिने त्याच्याकडून एक चमचा मागून घेतला. आता त्या पाणीपुरीच्या गाडी कम स्टॉलवर "विठ्ठल शिंदे पाणीपुरीवाला, आमची कुठेही शाखा नाही" असे शुद्ध मराठीत लिहिले असले तरी विठठल भाऊंनी पाणीपुरीवाटप करायला हाताखाली एक भैय्याच ठेवला होता. कारण आपल्याकडे भैय्याचा हात लागल्याशिवाय पाणीपुरीतला खारटपणा जाणवत नाही ना.. तर हा भैय्या तिची फर्माईश ऐकून किंचित हडबडून गेला, मात्र ग्राहक हईच हमार भगवान बोलत जवळच पडलेल्या एका खरकट्या प्लेटमधील चमचा बादलीभर पाण्यात बुचकळून तत्परतेने तिच्या हातात ठेवला.
आता ही बया त्या चमच्याचा अगदी नजाकतदारपणे वापर करून एकेक करत ताटलीतील पाणीपुरी उचलून उचलून खाऊ लागली आणि इथेच अंड्या विचारात पडला...
काय राव, अशी चमच्याने पाणीपुरी खाण्यात कसली मजा आलीय, अंड्याला नाही झेपले हे काही. जोपर्यंत ती पाणीपुरी न फुटता, त्यातील पाणी न सांडवता, कसरत करत तोंडापर्यंत नेत नाही आणि नेमके तोंडाजवळ आल्यावर त्यातील पाणी गळायला सुरुवात होऊन ओठांच्या किनार्याने ओघळत हनुवटीवर येत नाही अन त्यापासून शरीराच्या इतर भागाला वाचवण्यासाठी आपण तोंड पुढे झुकवत नाही तोपर्यंत पाणीपुरी हा प्रकार खाल्यासारखा वाटूच शकत नाही.
म्हणजे बघा हा, उद्या कोणी तुम्हाला वडापाव काटाचमच्याने किंवा नूडल्स हाताने खायला लावले तर मजा येईल का? वेज-पनीर-शेजवान रोल म्हणजे आजकाल फ्रॅंकी की काय बोलतात ते उलगडून चपातीभाजी सारखे खाऊ घातले तर..... तर कदाचित मूळ पदार्थाची चव तशीच राहील. मान्य. मात्र ते खाण्यातील लज्जत तशीच जाणवेल का? पण असतात एकेकाच्या खाण्यापिण्याच्या विचित्र सवयी. हे असले प्रकार करताना एकेक नग आजूबाजुला बरेच दिसतील. अहो सॅंडवीचमधील एकेक काकडी टमाटर वेचून खाणारे लोक पाहिलेत या अंड्याने. जाब विचारला तर म्हणतात की आमच्या जबड्यात अख्खे सॅंडवीच नाही घुसत. वा रे वा. मग घेता कशाला तसे बनवून. बिचार्या त्या सॅंडवीचवाल्याची ही मेहनतही वाया घालवता. त्यापेक्षा हारवाल्याकडून जसे देवाच्या हाराबरोबर सुट्टी फुले मागून घेतात तसे चटणीपावाबरोबर सुट्टे कांदा टमाटर अन काकडीचे तुकडे शेपरेट घ्या की राव..!!
बाकी काही जणांचे कॉंबिनेशनही हटके असतात राव. त्यातले काही प्रकार अंड्याच्या आकलनापलीकडलेच. अश्यापैकीच एक म्हणजे कोलसवलेला भात अन चपातीचा घास...
च्यामारी..!! अंड्याच्या आवडीची भाजी नसली तर अंड्या एकवेळ लोणचे चपाती खाईल पण डाळभाताबरोबर चपातीचा घास घेणे म्हणजे. काय राव, काय चव लागत असेल याची कल्पनाही नाही करवत. एका अश्याच महाभागाला मी विचारले तर तो उलट मलाच म्हणाला, "शेवटी सगळे पोटातच जाणार ना..."
घ्या.. आता काय बोलणार.. राजा मग पाणी ही ओत की त्यात आणि सारेच एकत्र कोलसवून खा. ते तरी कशाला वेगळे पितोस..
आता आमच्या घरातही असे काही महाभाग भरले आहेत. माझा दूरचा भाऊ आहे एक, जो चहात फरसाण किंवा खारी कुस्करून टाकतो आणि हातात फावडे धरल्यासारखे चमचा घेऊन त्याचा फडशा पाडतो. एवढेच नव्हे तर केकसुद्धा बिस्किटसारखा चहात बुडवून खातो. नशीब यासाठी तो क्रीमचा नाही तर माव्याचा केक वापरतो. पण यासाठी त्याला अंड्याचा केकही चालतो. त्याचेच पाहून मी देखील एकदा ट्राय केले आणि....................................... बॉक बॉक बॉक..!!
डॉक्टर म्हणाला, बे अंड्या, अंड्याचा केक चहात बुडवून खाल्लास त्यानेच मळमळले की.. बस्स तोच पहिला आणि शेवटला प्रयोग. अंड्याने त्या दिवशीच अंड्याशी कोणताही खेळ न करायचे ठरवले. अन या सार्यातून एकच चांगले झाले की माझे बघून आणि डॉक्टरचा सल्ला ऐकून त्या धास्तीने माझ्या भावानेही अंड्याचा केकच खाणे सोडले.
.............मात्र फरसाण तो अजूनही चहात टाकून खातोच. खास करून तिखट शेव. जाब विचारला तर कारण बघा अन काय देतो, "असे फरसाण चहात टाकून खायला भारी मजा येते ती येतेच, मात्र त्यातील मसाला चहात मिसळल्याने चहाचीही मस्त तिखट झणझणीत मसाला चाय बनते."
............अरे राजा, मसालादूध, मसाला चाय म्हणून वेगळा असा खास प्रकार मिळतो रे जगात, त्यासाठी असला काही प्रयोग करायची गरज नाही, हे त्याला आता कोण समजवणार. उद्या फिल्टर कॉफीला बरर्रफ मार के कोल्ड कॉफी बनवशील तर कसे चालेल.
चहा वरूनच आठवले, की एकवेळ हे परवडले पण काही जणांना ग्लुकोजच्या बिस्किटांचाही चहात लिबलिबित लगदा करून खायची सवय असते. आता दात नसलेल्या आजोबांचा नाईलाज असतो म्हणून त्यांनी शोधलेला हा खाद्यप्रकार. पण त्यांच्या दात आलेल्या नातवंडांना कसा गिळवतो हे एक अंड्याला न उलगडलेले कोडे.
पण काही जणांना असे वेगवेगळे प्रयोग करायची सवयही असते बरं का. फार लांब कशाला जा, आमच्या घरचे काकाच आहेत असे. पावामध्ये फरसाण घालून खातात आणि त्याला सुका मिसळपाव बोलतात. भातामध्ये तर काय काय घालतील याचा नेम नाही. फोडणीच्या भातात द्राक्षे अन डाळिंबाचे दाणे घालणे म्हणजे कहर बोलू शकतो. नशीब आता त्याला दाबेलीभात नाही बोलत.
कधी कधी अश्यांचे प्रयोग आवडून ही जातात हे ही खरेय. याच काकांमुळे मी पावभाजीची भाजी आणि पावाच्या जागी साधा डोसा हे हटके कॉम्बिनेशन खायला शिकलो. हॉटेलमधील वेटरही अश्यावेळी कौतुकाने बघतात हा माझा यावरचा अनुभव. मी तेवढ्यावरच थांबलो मात्र काकांचे आजही हक्का नूडल्स, वेज मंच्युरीअन, अमेरीकन चॉप्सी असे नाना प्रकार डोश्यामध्ये लपेटून खायचे प्रयोग चालूच आहेत. आनंदा, कधीतरी हे अमुकतमुक नक्की ट्राय करून बघ असे अधूनमधून सुचवतही असतात.
चायनीज फूडबद्दल तर बोलायलाच नको, मुळात तो आपला भारतीय खाद्यप्रकार नसल्याने प्रत्येक जण आपापल्या स्टाईलने खातो. लहान असताना चायनीजच्या गाड्या रस्तोरस्ती दिसायच्या, तेव्हा ते नवीनच फॅड होते. आमच्या पॉकेटमनीमध्ये तेव्हा फक्त सूपच परवडायचे म्हणून तेच खाल्ले जायचे. कधीतरी पार्टी असल्यास वाढीव बजेट नुसार फ्राइड राइस घेतला जायचा. तेव्हाही आमच्यात सूप हे राईसच्या आधी घ्यायचे की नंतर यावरून नेहमी वाद व्हायचा. अर्धे जण त्याला स्टार्टर मानून आधी प्यायचे तर अर्धे जण डेझर्ट मानून नंतर. मी मात्र नेहमी आधीच घ्यायचो आणि याचे कारण म्हणजे त्यातील अर्धे सूप पिऊन अर्धे मी फ्राइड राईसमध्ये टाकायचो अन्यथा तो सुकासुका तळलेला तेलकट भात माझ्या घशाखाली नाही उतरायचा. आता हे कधी कोणाला विचित्र वाटले नाही आणि वाटले असते तरी अंड्या काही सोडणार नव्हता, ना आजवर ही सवय सोडलीय.
काही प्रकार एखाद्या ठिकाणची खासियत असते, मात्र इतरांना नाही झेपत ते. अश्यापैकीच एक म्हणजे मिसळीच्या जोडीला स्लाईस पाव. मध्यंतरी बाहेरगावी एके ठिकाणी जाणे झाले होते तेव्हा या प्रकारच्या मिसळपावचा अनुभव आला. साधारण गोडूस चवीचे असणारे हे स्लाईस ब्रेड कसे लोक मिसळीबरोबर खाऊ शकतात देव जाणे. कदाचित जवळपास चांगले पाव मिळत नसतील किंवा चांगले बनवता येत नसतील, कदाचित मिसळच काही खास नसावी ज्याबरोबर मग पाव खा किंवा ब्रेड खा एकच, अथवा मुद्दाम वेगळेपणा दाखवायचा अट्टाहास असावा वा तेथील ग्राहकांचीच अशी आवड असावी, जे काही कारण असेल ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. अंड्याला मात्र मिसळ किंवा पावभाजीसारखा तिखट झणझणीत प्रकार असो वा चिकन-मटण वा अंड्याची भुरजी, त्याबरोबर भट्टीचे पावच लागतात. शेवटी मॉरल ऑफ द स्टोरी काय तर हा चवीचा मामला आहे, आपल्या आपल्या चॉईसचा मामला आहे..!!
- आनंद उर्फ अंड्या
--------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------
अंड्याचे फंडे १ - रायटर अंड्या - http://www.maayboli.com/node/41484
अंड्याचे फंडे २ - फर्स्ट क्लास - http://www.maayboli.com/node/41751
अंड्याचे फंडे ३ - छंद - http://www.maayboli.com/node/41925
अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद - http://www.maayboli.com/node/42171
अंड्याचे फंडे ५ - शर्यत - http://www.maayboli.com/node/42319
अंड्याचे फंडे ६ - शॉपिंग मॉल - http://www.maayboli.com/node/42594
--------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------
हे वाचा -
हे वाचा - http://www.maayboli.com/node/4481
रिक्षा
भन्नाट लेख अन सूचनांचा
भन्नाट लेख अन सूचनांचा मारा.
आवडेश.
चहा + त्यात भिजवलेले जाडे पोहे =ऑलटाइम हिट..
माझा भाऊ गोड शिरा चहा मिसळून खायचा/ प्यायचा ?
पिंडे पिंडे रुचिर्भिन्ना !
लले तुझ्या रिक्षात बसून एक
लले तुझ्या रिक्षात बसून एक चक्कर मारून आले बघ...
अंड्या.. नाही रे रागवू कशाला..
जकार्ताला A & W या अमेरिकन फास्टफूड चेन रेस्टॉरेंट मधे रूट बिअर (नॉन अल्कोहोलिक) वर वनिला आईसक्रीम चा मोठ्ठा स्कूप घालून मिळायचं.. त्या रूट बिअर ची चव पाण्यात ,क्लोजप टूथपेस्ट घोळल्यासारखी लागायची..
मी सोडून ग्रुपमधील बाकी कुणाला कधीही हिम्मत झाली नव्हती हे काँबी ट्राय करायची
लले तुझ्या रिक्षात बसून एक
लले तुझ्या रिक्षात बसून एक चक्कर मारून आले बघ...
>>
मी पण
पिंडे पिंडे रुचिर्भिन्ना ! >>
जिव्हायाम (जिव्हा ची सप्तमी 'जिव्हायाम'च ना?) जिव्हायाम रुचिर्भिन्ना ! असं करा
तव्यावरून जस्ट काढलेल्या गरम
तव्यावरून जस्ट काढलेल्या गरम गरम पोळीला तूप लावायचे साजुक आणि रोल करून चहाबरोबर खायचे. अप्रतिम लागतो हा प्रकार.
माझ्या सासरी गोडाच्या शिर्याबरोबर आंब्याचे लोणचे व मिरगुंड (पोह्याचे चौकोनी व जाडे पापड) खातात.
मला साबुदाणा वड्याबरोबर किंवा वडा पाव बरोबर गोड दही किंवा खटाई (चिंच-गूळाची आंबटगोड चटणी) आवडते. सासरी मात्र नारळाची हिरवी चटणी (डोसा किंवा इडली साठी करतो तसली!) करण्याची पद्धत आहे. मला अजिबात आवडत नाही हे काँबो!
असेच एक विचित्र combination
असेच एक विचित्र combination आम्ही १५ वर्षांपूर्वी गोव्याला जाताना खाल्ले.
बसचा रात्रीचा प्रवास होता. बस एका खोपटेवजा हॉटेलात जेवण्यासाठी थांबवली. नवरा चायनीज प्रेमी. हॉटेलात घासफूस खाणे म्हणजे अपमान मानणारा. त्यामुळे त्याने हक्का नूडल्स आणि मी बटर चिकन-रोटी असे मागवले.
Order घेणार पोर्या नवर्याची order परत एकदा विचारून गेला. Confirm करून गेला.
थोड्या वेळाने माझ्या बटर चिकन-रोटी बरोबर नवर्यासाठी खास हक्का नूडल्स आले. एका मोठ्या ताटलीत "टू मिनिट्स" मॅगी नूडल्स वर ४-५ बटर चिकन मधले चिकनचे तुकडे.
मी घेवड्याची भाजी, गोड शिरा
मी घेवड्याची भाजी, गोड शिरा आणि चहा एकत्र करुन खातो /पितो
कॉफीत मी पांढरा तांबडा मटणाचा रस्सा, पडवळीची भाजी ,शेपुची भाजी मिक्स करुन खातो. हा.का.ना.का.
मी एका नातेवाईक कुटुंबाबरोबर
मी एका नातेवाईक कुटुंबाबरोबर रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले. चायनीज मागवूयात म्हणून ठरलं. मग त्यांनी पहिले चिकन मांचुरीयन आणि रोटी मागवली आणि नंतर फ्राईड राईस आणि दाल फ्राय मागवला. झालं की चायनीज जेवण ....... हाकानाका.
मजा आली! लेखातल्या आणि
मजा आली! लेखातल्या आणि प्रतिक्रियांमधल्या तर्हा वाचून!
निंबुडा, तव्यावरून जस्ट
निंबुडा,
तव्यावरून जस्ट काढलेल्या गरम गरम पोळीला तूप लावायचे साजुक आणि रोल करून चहाबरोबर खायचे. अप्रतिम लागतो हा प्रकार.
>>>>>>>>>
अगदी अगदी
फरक इतकाच की मी रोल न करता चपातीच्या तुकड्याचा द्रोण करतो आणि चहात डुबुक डुबुक करून खातो.
मात्र चपाती लागते तव्यावरची थेट ताटलीत, डब्यात गेली तर ती बाद,
तसेच तूप नसले तर मग वेळेला केळं बोलत अमूल मस्का वर समाधान मानतो
वर्षूदीदी,
रूट बीअर नाही पण फ्रूट बीअर ऐकलेय अन चाखलेय ही,.. बीअरशी दूर दूरचा संबंध नाही..
शिमल्यात एकदा सौ.नी
शिमल्यात एकदा सौ.नी ब्रेकफास्टला टोमॅटो ऑम्लेट मागवले. गुज्जूभाईचं हॉटेल होतं.
मस्त २ अंड्यांचं विना-कांदा/लसूण/तिखट/मीठ वालं आम्लेट अन त्यावर टमाट्याच्या ४ चकत्या गरम गरम! हिने ईऽक करून उडी मारलेली आठवतेय अजून.
***
अंड्या,
तव्यावरून चटके लावून काढलेली आजी/आई/बायकोच्या/आजकाल अन कधी कधी माझ्याही - हातची गरम गरम पुडाची पोळी (फुलका नाही) फक्त तूप लावून वर हलकी चिमूट मीठ टाकून नुसतीच सुंदर लागते. भाजी नंतर खाऊन घ्यावी चमच्याने.
शिळी पोळी तव्यावर बटर सोडून
शिळी पोळी तव्यावर बटर सोडून भाजत कडक करायची (खाकर्या सारखी) आणि त्यावर लसणीची चटणी टाकुन खायची, हा १-२पोळ्या उरल्यातर आवडीचा प्रकार आहे घरी.
अंड्या.. खास तेरे लिये Root
अंड्या.. खास तेरे लिये
Root beer is a carbonated, sweetened beverage, originally made using the root of a sassafras plant (or the bark of a sassafras tree) as the primary flavor.
फरक इतकाच की मी रोल न करता
फरक इतकाच की मी रोल न करता चपातीच्या तुकड्याचा द्रोण करतो आणि चहात डुबुक डुबुक करून खातो.
मात्र चपाती लागते तव्यावरची थेट ताटलीत, डब्यात गेली तर ती बाद,
>> कसले मनातल बोललास. मला वाटायचे कि चपाती च्या तुकड्याचा द्रोण करणारी मी एकटीच आहे. :-). त्या द्रोणात घरचे लोणी, अमूल बटर किंवा तूप टाकायचे आणि मगच चहात बूडवायची...अहाहा..उद्या फोटो टाकू का? बघूया द्रोणाचा आकार सेम आहे का? लग्नाच्या आधी मी आई चपाती करताना बाजूला उभी रहायचे आणि आता जेवण करणारया काकूंच्या बाजूला ...चपाती तव्यावरून डायरेक्ट प्लेट मधे .
मी या द्रोणाला "होडी" म्हणते...
सामी नेकी और पूछ पूछ... फोटो
सामी
नेकी और पूछ पूछ... फोटो टाकलेस तर उत्तमच.. जर तुझे बघून आणखी कोणाला इथे फोटो टाकावेसे वाटले तर हा धागा एका वेगळ्याच उंचीवर जाईल..
बाकी ते द्रोणात तूप लोणी टाकायचे नाही समजले.. म्हणजे मी पुर्ण चपातीला लोणी-तूप लाऊन घेतो, चपाती १०० डीग्री सेल्सियसपेक्षा किंचित कमी गरम असल्याने तूप टाकल्याटाकल्या त्याचे पाणी होऊन पसरते.. मग त्या तूप लावलेल्या चपातीचा तुकडा तोडून त्याचा द्रोण करत चहात डुबुक डुबुक..
अवांतर - सामी, मामी आणी साती... हे तीन आयडी जाम कन्फ्यूज करतात राव..
अंड्या... मी 'कुडाळ'ला
अंड्या...
मी 'कुडाळ'ला असतानाची गोष्ट (इ.स. १९८९-९०). नाटक-एकांकिकेच्या तालमी रात्री १० नंतर सुरु व्हायच्या. घरातून नऊ वाजता जेवून बाहेर पडायचो. तालीम संपायला रात्रीचे दीड्-दोन वाजायचे. त्यावेळी सपाटून भूक लागायची, पण त्यावेळी आम्ची भूक भागवणारं एकही ठिकाण नसायचं... (आता दिवस बदललेत... रात्री दोन वाजता देखिल एकाद्या हातगाडी वर ऑम्लेट्-पाव मिळू शकतो...). माझे एक शिक्षक आहेत (आता निवृत्त झालेत), त्यांना आणि मला 'बन्-पाव' आतिशय प्रीय. तेव्हां त्यांनी यावर उपाय शोधला, रात्री येताना ते सोबत ४-५ बन्-पाव घेऊन यायचे. तालीम आटोपल्यावर आम्ही दोघे बन्-पाव थंडगार पाण्यात भिजवून खायचो... बन्-पाव जर खरोखर चांगल्या प्रतीचा असेल तर हे कॉम्बीनेशन 'फार चांगले' लागते... नंतर हल्ली कोल्ड-ड्रींक 'पेट्-बॉट्ल' मधुन मिळयला लागल्यावर थंडगार पाण्याची जागा लिमका, स्प्राईट, 7-Up... नी घेतली...
जेव्हां 'बियर' प्यायचो तेव्हां अर्धा-ग्लास अगोदर Citra (Super Cooler) ने भरुन घ्यायचो. नंतर उरलेल्या ग्लास मधे बियर ओतून घेऊन प्यायचो. कारण एकच - बियरची कीक येऊ नये. Citra (Super Cooler) बाजरातून गायब झालं, आणि बियर पिण्याचं प्रमाण 'नगण्य' झालं...
अनु ३ शिळी पोळी तव्यावर बटर
अनु ३
शिळी पोळी तव्यावर बटर सोडून भाजत कडक करायची (खाकर्या सारखी) आणि त्यावर लसणीची चटणी टाकुन खायची, हा १-२पोळ्या उरल्यातर आवडीचा प्रकार आहे घरी.
>>>>>>>>>>>>>>
हॉटेलमध्ये देखील रोटीला असेच कडक करून त्यावर चाट मसाला टाकून बनवायला सांगायचे.. सर्वच ठिकाणी मिळते की नाही माहीत नाही, पण माझ्या ड्रिंक्स घेणार्या काही मित्रांचा तो फेवरेट चकणा आहे, आणि मी घेत नसलो तरी ते मात्र आवडीने खातो..
इब्लिस,
खरे तर टोमेटो ऑमलेटच्या नावाखाली चण्याबेसण्याच्या पिठाचे ऑमलेट करून देणार्या सार्यांचाच मी निषेध करतो..... ऑमलेट या शब्दावर फक्त आम्हा अंड्यांचाच हक्क आहे..
वर्षूदीदी.. धन्यधन्यवाद... माहितीबद्दलही आणि चेतावणीबद्दलही.. नावात बीअर आहे म्हणून यापुढे काहीही नाही प्यायचे एवढे नक्की..
विवेक देसाई, बनपाव आणि थंडगार
विवेक देसाई,
बनपाव आणि थंडगार पाणी.... वाह... मलाही यावरून काही आठवले..
एक म्हणजे बिस्किटांच्या कंपनीत काम करणारे बिस्किट फुकट मिळतात म्हणून थंड पाण्यात बुडवून खातात, आमच्या इथे एक काका होते असे, त्यांच्या पोरांना देखील ती सवय इतकी लागली की चहा-बिस्किटपेक्षा पाणी-बिस्किट जास्त आवडीने खायची..
दुसरे म्हणजे जाम भारी... खरे तर मूळ लेखातच टाकायला हवे होते..
दारू-पाव ... तो ही देशीदारू - पाव
लहान असताना आमच्या वाडीत दोन अटटल बेवड्यांची जोडी होती.. ते खायचे दारू पाव.. सकाळी उठल्या उठल्या त्यांचा हाच नाश्ता... दुर्दैवाने दोघेही आज नाहीत..
रुट बीयर मला तरी आयोडेक्स
रुट बीयर मला तरी आयोडेक्स सोड्यात मिसळून दिलं तर कसं लागेल? तशी लागली.
लहानपणी मी कढीत बेसनाचा लाडू
लहानपणी मी कढीत बेसनाचा लाडू कुस्करून खायचो (इति आई ...)
आजकाल जेवणा नंतर वाटीत उरलेल्या वरणात शेव घालून चमच्याने खातो ... टू गुड
मामी.. आयोडेक्स?? ईईई.... पण
मामी.. आयोडेक्स?? ईईई.... पण मला रूट बिअर, क्लोजप टूथपेस्ट , सोड्यात घोळून कसं लागेल तशी लागायची
कढीत बेसनाचा लाडू.. बाप्रे
कढीत बेसनाचा लाडू.. बाप्रे कसा लागत असेल..
वरणात शेव चांगली लागत असेल..
बाप्रे कसा लागत असेल.. >>>
बाप्रे कसा लागत असेल.. >>> मलापण आठवत नाही आता ...
कोणत्याही प्रकारच्या भाता
कोणत्याही प्रकारच्या भाता बरोबर शेव, फरसाण किन्वा काही तरी कुरकुरीत खुप छाण लागते.
कुरकुरीत म्हणजे वेफर्स्,चकली इ.
शक्यतो गोड भाता बरोबर पहिला ट्राय करू नये.
अगदी साध वरण भात ,तुप + शेव /फरसाण यम्म्म्म्मी......:)
रुट बीयर मला तरी आयोडेक्स
रुट बीयर मला तरी आयोडेक्स सोड्यात मिसळून दिलं तर कसं लागेल? तशी लागली.
<<
मामी.. आयोडेक्स?? ईईई.... पण मला रूट बिअर, क्लोजप टूथपेस्ट , सोड्यात घोळून कसं लागेल तशी लागायची <<
जळ्ळं मेलं लक्षण! मी म्हंतो, चांगली इष्टरंग ह्यावर्डची टेम थाव्जंड बियर बाजारात मिळत अस्ताना रूट बियर कशाला प्यावी माणसानं?
मी मटणात बासुंदी टाकतो ,आटवतो
मी मटणात बासुंदी टाकतो ,आटवतो आणि तो गोळा...
........ खातच नाही....
पुर्वी मी पील्सनर प्यायचो
पुर्वी मी पील्सनर प्यायचो ,आता ती बंद झाली
माझा एक साउथ इंडीयन कलीग
माझा एक साउथ इंडीयन कलीग पोहे, डाळ भात, उपमा याबरोबर पिकलेल केळ मिक्स करुन आवडीने खातो. वर सगळ्यांना ट्राय करुन बघा म्हणुन सांगतो.
लेख मस्त खुसखुशीत झालाय. तसे
लेख मस्त खुसखुशीत झालाय. तसे तुमचे सगळेच लेख मस्त असतात. आणि समहाऊ तुमच्या आयडी मुळे माझ्या डोळ्यासमोर कायम आनंद इंगळे येतो आणि त्याच्याच स्टाईल मधे हे लेख वाचले जातात. त्यामुळे मी ते जरा जास्तच एन्जॉय करते
माझा नवरा असा चपाती बरोबर भाजी, लोणचं आणि श्रिखंड एका घासात घेतो फार यातना होतात मला बघून त्या पदार्थांना बिचार्यांना काय वाटत असेल.
रच्याकने थंड पाणी आणि ग्लुकोज बिस्कीट...अतिशय आवडीचे
माझा एक साउथ इंडीयन कलीग
माझा एक साउथ इंडीयन कलीग पोहे, डाळ भात, उपमा याबरोबर पिकलेल केळ मिक्स करुन आवडीने खातो>> केरळमहे हे स्टेपल फूड आहे.
Pages