अंड्याचे फंडे ७ - खादाडी

Submitted by अंड्या on 13 January, 2013 - 09:04

नाक्यावरच्या भटकंतीची ठरलेली वेळ, संध्याकाळच्याच आसपासची. तोच रस्ता, तीच दुकाने, आजूबाजुला भटकणारी तीच ती माणसं. पण आज संध्याकाळी मात्र एका मुलीला पाणीपुरी खाताना बघत होतो. तुम्ही तर रोजच बघत असाल नाही, पण राव ऐका तर पुढे. भैय्याने पाणीपुरी वाटपासाठी एक प्लेट तिच्या हातात धरताच तिने त्याच्याकडून एक चमचा मागून घेतला. आता त्या पाणीपुरीच्या गाडी कम स्टॉलवर "विठ्ठल शिंदे पाणीपुरीवाला, आमची कुठेही शाखा नाही" असे शुद्ध मराठीत लिहिले असले तरी विठठल भाऊंनी पाणीपुरीवाटप करायला हाताखाली एक भैय्याच ठेवला होता. कारण आपल्याकडे भैय्याचा हात लागल्याशिवाय पाणीपुरीतला खारटपणा जाणवत नाही ना.. तर हा भैय्या तिची फर्माईश ऐकून किंचित हडबडून गेला, मात्र ग्राहक हईच हमार भगवान बोलत जवळच पडलेल्या एका खरकट्या प्लेटमधील चमचा बादलीभर पाण्यात बुचकळून तत्परतेने तिच्या हातात ठेवला.

आता ही बया त्या चमच्याचा अगदी नजाकतदारपणे वापर करून एकेक करत ताटलीतील पाणीपुरी उचलून उचलून खाऊ लागली आणि इथेच अंड्या विचारात पडला...
काय राव, अशी चमच्याने पाणीपुरी खाण्यात कसली मजा आलीय, अंड्याला नाही झेपले हे काही. जोपर्यंत ती पाणीपुरी न फुटता, त्यातील पाणी न सांडवता, कसरत करत तोंडापर्यंत नेत नाही आणि नेमके तोंडाजवळ आल्यावर त्यातील पाणी गळायला सुरुवात होऊन ओठांच्या किनार्‍याने ओघळत हनुवटीवर येत नाही अन त्यापासून शरीराच्या इतर भागाला वाचवण्यासाठी आपण तोंड पुढे झुकवत नाही तोपर्यंत पाणीपुरी हा प्रकार खाल्यासारखा वाटूच शकत नाही.

म्हणजे बघा हा, उद्या कोणी तुम्हाला वडापाव काटाचमच्याने किंवा नूडल्स हाताने खायला लावले तर मजा येईल का? वेज-पनीर-शेजवान रोल म्हणजे आजकाल फ्रॅंकी की काय बोलतात ते उलगडून चपातीभाजी सारखे खाऊ घातले तर..... तर कदाचित मूळ पदार्थाची चव तशीच राहील. मान्य. मात्र ते खाण्यातील लज्जत तशीच जाणवेल का? पण असतात एकेकाच्या खाण्यापिण्याच्या विचित्र सवयी. हे असले प्रकार करताना एकेक नग आजूबाजुला बरेच दिसतील. अहो सॅंडवीचमधील एकेक काकडी टमाटर वेचून खाणारे लोक पाहिलेत या अंड्याने. जाब विचारला तर म्हणतात की आमच्या जबड्यात अख्खे सॅंडवीच नाही घुसत. वा रे वा. मग घेता कशाला तसे बनवून. बिचार्‍या त्या सॅंडवीचवाल्याची ही मेहनतही वाया घालवता. त्यापेक्षा हारवाल्याकडून जसे देवाच्या हाराबरोबर सुट्टी फुले मागून घेतात तसे चटणीपावाबरोबर सुट्टे कांदा टमाटर अन काकडीचे तुकडे शेपरेट घ्या की राव..!!

बाकी काही जणांचे कॉंबिनेशनही हटके असतात राव. त्यातले काही प्रकार अंड्याच्या आकलनापलीकडलेच. अश्यापैकीच एक म्हणजे कोलसवलेला भात अन चपातीचा घास...
च्यामारी..!! अंड्याच्या आवडीची भाजी नसली तर अंड्या एकवेळ लोणचे चपाती खाईल पण डाळभाताबरोबर चपातीचा घास घेणे म्हणजे. काय राव, काय चव लागत असेल याची कल्पनाही नाही करवत. एका अश्याच महाभागाला मी विचारले तर तो उलट मलाच म्हणाला, "शेवटी सगळे पोटातच जाणार ना..."
घ्या.. आता काय बोलणार.. राजा मग पाणी ही ओत की त्यात आणि सारेच एकत्र कोलसवून खा. ते तरी कशाला वेगळे पितोस..

आता आमच्या घरातही असे काही महाभाग भरले आहेत. माझा दूरचा भाऊ आहे एक, जो चहात फरसाण किंवा खारी कुस्करून टाकतो आणि हातात फावडे धरल्यासारखे चमचा घेऊन त्याचा फडशा पाडतो. एवढेच नव्हे तर केकसुद्धा बिस्किटसारखा चहात बुडवून खातो. नशीब यासाठी तो क्रीमचा नाही तर माव्याचा केक वापरतो. पण यासाठी त्याला अंड्याचा केकही चालतो. त्याचेच पाहून मी देखील एकदा ट्राय केले आणि....................................... बॉक बॉक बॉक..!!
डॉक्टर म्हणाला, बे अंड्या, अंड्याचा केक चहात बुडवून खाल्लास त्यानेच मळमळले की.. बस्स तोच पहिला आणि शेवटला प्रयोग. अंड्याने त्या दिवशीच अंड्याशी कोणताही खेळ न करायचे ठरवले. अन या सार्‍यातून एकच चांगले झाले की माझे बघून आणि डॉक्टरचा सल्ला ऐकून त्या धास्तीने माझ्या भावानेही अंड्याचा केकच खाणे सोडले.

.............मात्र फरसाण तो अजूनही चहात टाकून खातोच. खास करून तिखट शेव. जाब विचारला तर कारण बघा अन काय देतो, "असे फरसाण चहात टाकून खायला भारी मजा येते ती येतेच, मात्र त्यातील मसाला चहात मिसळल्याने चहाचीही मस्त तिखट झणझणीत मसाला चाय बनते."
............अरे राजा, मसालादूध, मसाला चाय म्हणून वेगळा असा खास प्रकार मिळतो रे जगात, त्यासाठी असला काही प्रयोग करायची गरज नाही, हे त्याला आता कोण समजवणार. उद्या फिल्टर कॉफीला बरर्रफ मार के कोल्ड कॉफी बनवशील तर कसे चालेल.

चहा वरूनच आठवले, की एकवेळ हे परवडले पण काही जणांना ग्लुकोजच्या बिस्किटांचाही चहात लिबलिबित लगदा करून खायची सवय असते. आता दात नसलेल्या आजोबांचा नाईलाज असतो म्हणून त्यांनी शोधलेला हा खाद्यप्रकार. पण त्यांच्या दात आलेल्या नातवंडांना कसा गिळवतो हे एक अंड्याला न उलगडलेले कोडे.

पण काही जणांना असे वेगवेगळे प्रयोग करायची सवयही असते बरं का. फार लांब कशाला जा, आमच्या घरचे काकाच आहेत असे. पावामध्ये फरसाण घालून खातात आणि त्याला सुका मिसळपाव बोलतात. भातामध्ये तर काय काय घालतील याचा नेम नाही. फोडणीच्या भातात द्राक्षे अन डाळिंबाचे दाणे घालणे म्हणजे कहर बोलू शकतो. नशीब आता त्याला दाबेलीभात नाही बोलत.

कधी कधी अश्यांचे प्रयोग आवडून ही जातात हे ही खरेय. याच काकांमुळे मी पावभाजीची भाजी आणि पावाच्या जागी साधा डोसा हे हटके कॉम्बिनेशन खायला शिकलो. हॉटेलमधील वेटरही अश्यावेळी कौतुकाने बघतात हा माझा यावरचा अनुभव. मी तेवढ्यावरच थांबलो मात्र काकांचे आजही हक्का नूडल्स, वेज मंच्युरीअन, अमेरीकन चॉप्सी असे नाना प्रकार डोश्यामध्ये लपेटून खायचे प्रयोग चालूच आहेत. आनंदा, कधीतरी हे अमुकतमुक नक्की ट्राय करून बघ असे अधूनमधून सुचवतही असतात.

चायनीज फूडबद्दल तर बोलायलाच नको, मुळात तो आपला भारतीय खाद्यप्रकार नसल्याने प्रत्येक जण आपापल्या स्टाईलने खातो. लहान असताना चायनीजच्या गाड्या रस्तोरस्ती दिसायच्या, तेव्हा ते नवीनच फॅड होते. आमच्या पॉकेटमनीमध्ये तेव्हा फक्त सूपच परवडायचे म्हणून तेच खाल्ले जायचे. कधीतरी पार्टी असल्यास वाढीव बजेट नुसार फ्राइड राइस घेतला जायचा. तेव्हाही आमच्यात सूप हे राईसच्या आधी घ्यायचे की नंतर यावरून नेहमी वाद व्हायचा. अर्धे जण त्याला स्टार्टर मानून आधी प्यायचे तर अर्धे जण डेझर्ट मानून नंतर. मी मात्र नेहमी आधीच घ्यायचो आणि याचे कारण म्हणजे त्यातील अर्धे सूप पिऊन अर्धे मी फ्राइड राईसमध्ये टाकायचो अन्यथा तो सुकासुका तळलेला तेलकट भात माझ्या घशाखाली नाही उतरायचा. आता हे कधी कोणाला विचित्र वाटले नाही आणि वाटले असते तरी अंड्या काही सोडणार नव्हता, ना आजवर ही सवय सोडलीय.

काही प्रकार एखाद्या ठिकाणची खासियत असते, मात्र इतरांना नाही झेपत ते. अश्यापैकीच एक म्हणजे मिसळीच्या जोडीला स्लाईस पाव. मध्यंतरी बाहेरगावी एके ठिकाणी जाणे झाले होते तेव्हा या प्रकारच्या मिसळपावचा अनुभव आला. साधारण गोडूस चवीचे असणारे हे स्लाईस ब्रेड कसे लोक मिसळीबरोबर खाऊ शकतात देव जाणे. कदाचित जवळपास चांगले पाव मिळत नसतील किंवा चांगले बनवता येत नसतील, कदाचित मिसळच काही खास नसावी ज्याबरोबर मग पाव खा किंवा ब्रेड खा एकच, अथवा मुद्दाम वेगळेपणा दाखवायचा अट्टाहास असावा वा तेथील ग्राहकांचीच अशी आवड असावी, जे काही कारण असेल ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. अंड्याला मात्र मिसळ किंवा पावभाजीसारखा तिखट झणझणीत प्रकार असो वा चिकन-मटण वा अंड्याची भुरजी, त्याबरोबर भट्टीचे पावच लागतात. शेवटी मॉरल ऑफ द स्टोरी काय तर हा चवीचा मामला आहे, आपल्या आपल्या चॉईसचा मामला आहे..!!

- आनंद उर्फ अंड्या

--------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------

अंड्याचे फंडे १ - रायटर अंड्या - http://www.maayboli.com/node/41484
अंड्याचे फंडे २ - फर्स्ट क्लास - http://www.maayboli.com/node/41751
अंड्याचे फंडे ३ - छंद - http://www.maayboli.com/node/41925
अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद - http://www.maayboli.com/node/42171
अंड्याचे फंडे ५ - शर्यत - http://www.maayboli.com/node/42319
अंड्याचे फंडे ६ - शॉपिंग मॉल - http://www.maayboli.com/node/42594

--------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंड्या,

मस्त लेख लिवलास! अहाहा, काय आठवणी जगवल्यास म्हणून सांगू! पिठल्यावर मिरपूड भुरभुरवल्यावर आमच्या मातोश्री अशा काही वैतागल्या की काही विचारू नका! आमचे एक परिचित ताकात पापड (तळलेला का भाजलेला ते माहित नाही) बुडवून खायचे.

कोकणात भातावर आमरस ओततात.

बाकी इथे इंग्लंडमध्ये देशी हाटेलात चायनीज इडली मिळते. इडलीचे तुकडे व्हेज मांचुरियन मध्ये सोडलेले असतात. छान लागते.

आ.न.,
-गा.पै.

इथे एक धागा होता ज्यात लोकांनी आपापल्या खाण्या-पिण्याचा तर्‍हा लिहिल्या होत्या. चहात पोहे भिजवून खाणे इ.

पटकन आठवलेली माझ्या आवडीचीं दोन वेगळी काँबिनेशन्स-
१]मस्कापाव व डाळींबी; डाव्या हातात मस्का लावलेला स्लाईस व उजव्या हातातल्या चमच्याने डाळींबी !
२] इडली व मटणाचा रस्सा [ ग्रेव्ही ] - माझ्या एका कुर्गच्या मित्राकडे खास 'डेलिकसी ' म्हणून हा बेत केला होता . चमचा निषिद्ध. हाताने इडली [ खास कुर्गी स्टाईल घरगुती ] रश्श्यात कुस्करून खाणे/ भुरकणे !

हो सिंडरेला त्याचं नाव ' मला आवडणारे पदार्थ मी असे खातो/ते

अंड्या, तो सूपचा भात सोडल्यास आपल्या आवडी सेम आहेत.

.

गामाजी धन्यवाद,
खरे तर त्या मानाने या विषयावर कमीच लिहिले असे बोलू शकाल, पण मला निव्वळ लिस्ट न करता एक लेख म्हणून हे लिहायचे होते, त्यामुळे जे गंमतीशीर अन हटके वाटणारे डोक्यात आले त्यावर भरभर लिहून काढले. सुचायचे तात्कालिक कारण ती पाणीपुरी खाणारीच मुलगी...

उद्या अजून काही आठवतील तसे प्रतिसादात टाकेनच.. पण तुम्ही सांगितलेल्या ताकात पापड वरून माझा एक मित्र आठवला, जो सॅंडवीच मधील टोमॅटोची स्लाईस चहामध्ये एकदा हलकेच बुचकळून काढायचा, काय तर टोमॅटो फ्लेवर चहा.. Happy

आणि हो साती, तसे अंड्याने आपल्या आवडी फारश्या सांगितल्या नाहीत यात कारण आपल्याला दुसर्‍यांचेच जास्त हटके वाटते ना.

फिलहाल शुभरात्री शब्बाखैर टाटा बायबाय गोडगोड नाईट.. Happy

चहा वरूनच आठवले, की एकवेळ हे परवडले पण काही जणांना ग्लुकोजच्या बिस्किटांचाही चहात लिबलिबित लगदा करून खायची सवय असते.>>माझ्या एका मैत्रीणीला पण अशीच सवय होती, आणि ती ते सेरेलॅक सारखे लागते अस म्हणत खायची.. Blush

असा धागा आहेच इथे... सापडला की लिंपतो इथे...

तुम्हाला पदार्थ कसे खायला आवडतात... अश्या काहिश्या नावाचा आहे धागा...

ग्लुकोजच्या बिस्किटांचाही चहात लिबलिबित लगदा करून खायची सवय असते.>>>>>>>> हे अमृततुल्य चहापेक्षा भारी लागतं Wink

रच्याकने, या शनिवारीच कांद्यापोह्यांबरोबर चिकनचा रस्सा ट्राय केलाय.. छान लागतो.. Happy

अंड्या, लेख चांगला जमलाय Happy

रच्याकने, या शनिवारीच कांद्यापोह्यांबरोबर चिकनचा रस्सा ट्राय केलाय.. छान लागतो..

चिमुरी, माझ्या नवरा पोहे नुसते कधीच खात नाही. वरण, आमटी, चिकन / मटन रस्सा, उसळी, पिठले याबरोबर खातो.

माझी नणंद तर तिच्या नवर्याबरोबर कधीही जेवायला बसत नाही.
बासुंदी-भात,चहा-भात वगैरे काहीही combination करतो. यक्स...

खरे चायनिज नुडल्स आणि चिकन खाल्ले.... मजा नाही आली. शेवटी भारतीय केलेले चायनिज खाण्यातच मजा आहे, ओरिजिनलम्ध्ये पण नाही Happy

भातात टोमॅटो केचप द. भारतात बघितला.

अजुन बरेच काही आहेत... असो.

इथे (कोरियात) भारतीय लोकं हाताने कसे खातात, याचच या लोकांना जास्त नवल. {काय खातात ते नंतरची गोष्ट !!!}

मात्र फरसाण तो अजूनही चहात टाकून खातोच. खास करून तिखट शेव. जाब विचारला तर कारण बघा अन काय देतो, "असे फरसाण चहात टाकून खायला भारी मजा येते ती येतेच, मात्र त्यातील मसाला चहात मिसळल्याने चहाचीही मस्त तिखट झणझणीत मसाला चाय बनते.." >>>>>

मी ही यातलीच Happy

मला काहीतरी बुडवून खाल्याशिवाय चहा प्यायल्यासारख वाटतच नाही .चकली , सुके पोहे ,शिळ्या पुर्या गेलाबाजार साबुदाणे वडे , काहीही .

नवरा पहिल्यांदा हसायचा , नंतर भडकायचा हल्ली लक्शच देत नाही

मस्त आहे लेख. आम्ही कॉलेजात असताना सॉफ्ट ड्रिंक / लस्सी मध्ये बिस्किटे बूडवून खायचा प्रयोग करायचो. Happy लस्सीत थम्स-अप, आइस्क्रीम मध्ये फँटा, पावाला श्रीखंड इ. कायच्या काय करायचो!

ते चायनीज सूप आणि भात मी अजूनही करतोय. नाहीतर तो भात संपत नाही Sad

चिमुरीताई अन मी नताशा
कांदापोहे आणि चिकन रस्सा, नक्की ट्राय करणार, फक्त आमच्याकडे पोहे रविवारी नाश्त्याला म्हणजे दुपारी बाराला बनतात तर मटण बनेबनेपर्यंत दुपारचे चार वाजतात.. तरी संध्याकाळी चहाबरोबर परत शिळे पोहे खातो तेव्हा हे नक्की ट्राय करणार.. विचार करून तरी चांगले वाटतेय.. Happy

चैत्राली... चह्हाभात.. भावना पोहोचल्या तुझ्या नणंदेच्या.. विचार करायला घेताच जरासे मळमळायला लागलेय.. Sad
बाकी बासुंदीभातात बोलशील तर, दूधभात खाणार्‍यांना पचेल हे.. अंड्याला मात्र गोडूस भात जरापण नाही आवडत.. त्यापेक्षा दहीभात मस्त तिखट झणझणीत हिरव्या मिरचीची फोडणी मारके ट्राय कर.. Happy

रंगासेठ.. मस्तच.. चायनीज सूप आणि भाताची आपली आवड जमली तर.. Happy

( दहीभात मस्त तिखट झणझणीत हिरव्या मिरचीची फोडणी मारके ट्राय कर...)
अरे , हे तर माझे favourite आहे.
गोड भात तर मलाही नाही आवडत. अगदी नारळी भातही नाही.

मागच्या महिन्यात गोवा trip मध्ये असताना एका beach resort वर prawns बिर्यानी मागवली होती.
तिला एव्हढी गोडसर चव होती, मी एक घासाच्या वर खाऊच नाही शकले. परत दुसरी dish मागवली.

चैत्राली,
आपले पण तेच,
नॉनवेज कुठल्याही प्रकारचे का असेना गोडूस असले की डोक्यातच जाते पण घशाखाली नाही जात. Sad

झकासजी,
घेतलाय वाचायला बीबी पण एकच पान पुरे आजच्याला, उगा अजीर्ण व्हायचे.

अवांतर - बीबी चे फुल्ल वर्जन कोणी मला सांगेल का?

अंड्या, लेख छान जमलाय. Happy

अवांतर - बीबी चे फुल्ल वर्जन कोणी मला सांगेल का?
>>>बीबी म्हणजे पत्नी नव्हे. सध्या इतकेच ज्ञान पुरे तुझ्या साठी Proud

अंड्या, बीबी म्हणजे बुलेटिन बोर्ड (मराठीत बातमी फलक - बाफ)

माझी चुलत नणंद कच्चा लिज्जत (उडदाचा) पापड ताटलीच्या मध्यभागी ठेवून त्यावर आमटी भात कालवते. व भात खाऊन संपल्यावर उरलेला कच्चा पण मऊ - लिबलिबित झालेला पापड खाते. मला आवडला हा प्रकार.

माझ्या साबा जेवताना पोळी संपल्यावर भाजी उरली तरे ताकात घालून ते भाजीयुक्त ताक पितात. मला हे नॉट आवडेश. ताकात फक्त सैंधव मीठ + जिरा पूड किंवा नुसते मीठ वा ताकाचा रेडीमेड मसाला. पण नो भाजी.

चहा + त्यात भिजवलेले जाडे पोहे हे काँबि पहिल्यांदा लहानपणी ज्या पाळणाघरात सांभाळायला होते त्यांच्या घरी पाहिला. मला आवडला.

एका मैत्रिणीकडे चहा बरोबर डोसा हा प्रकार पाहिला. अगेन नॉट आवडेश.

मोदकला साय + दूध युक्त भातात लसणीची मिरची किंवा खाराची मिरची लागते.

नवीन काही दिसले की एकदा ट्राय करून पहायला मला आवडते. आवडले नाहे तर परत प्रयोग करायचा नाही. Happy

बीबी- बुलेटिन बोर्ड... Happy

चहात चिवडा ही मस्त लागतो.. चहा आणी चिवडा ही... Happy Happy

पावाला हलकीशी स्लिट करून आत आवडत्या फ्लेवरचं आईसक्रीम स्कूप भरून मस्त लागतं... Happy Happy Happy

बीबीचा फुलफॉर्म सांगणार्‍यांचे धन्यवाद,
आणि इब्लिसराव, तुमची वेळ येऊद्या, तुम्हाला काही प्रश्न पडूद्या मग अंड्या याचा बदला घेतो बरोबर.. Wink
बाकी ते बातमीफलक हे नाव काहीच्या काही, म्हणजे अंड्याने इथे काही बकवास छापली तरी त्याला बातमी बोलणार, हे बरे आहे राव..

निंबुडा, भारीच ग्ग
पापड तसा चांगला लागत असणार, मारवाडी की राजस्थानी डिशमध्ये बर्‍याचदा ग्रेवीमध्ये पापडरोल असतो तो छान लागतो, अगदी रोटी बरोबर खायलाही. हे काहीतरी त्याच चवीचे लागावे.

ताकात भाजी - हे आपल्यालाही नाही झेपणार, प्लेन ताक आवडते, मात्र कोणती भाजी टाकल्यावर ताकाचे काय होईल हे कल्पना म्हणून विचार करायला भारीय...

चहा + पोहे हे तर वर्ल्डक्लास काँबिनेशन आहे, कोकणातच खातात की आणिक कुठे ते माहीत नाही.

अन चहा बरोबर डोसे हे जरी कसेसेच वाटत असले तरी जाळीदार घावणे किंवा आंबोळी नक्की ट्राय कर किंवा इडलीफ्राय खातखात जोडीला चहा..

अवांतर - आता ते साबा म्हणजे नक्कीच सासूबाई असणार नाही........... त्रास आहे राव, तीन मिनिटे डोके खर्ची घातले यावर. Sad

वर्षू नील
आपण सांगितलेले दोन्ही पदार्थ मला माझ्या आवडीचा विचार करता जराही मस्त नाही वाटले पण आपले नाव मस्त आहे.... वर्षू नील... ते नितीन नील मुकेश आहे ना तसे एकदम.. तो आवडत नसेल तर प्लीज रागाऊ नका हा.. पण मी मस्करी नाही करतेय.. खरेच छान नाव.. Happy

अवांतर - आता ते साबा म्हणजे नक्कीच सासूबाई असणार नाही........... >>
का रे का? का असणार नाही? इन फॅक्ट तसेच आहे ते.

तू जरा इथे चक्कर टाक बरं. आधी माबो चा अभ्यास कर बघू. Happy

जेव्हा मी दारू प्यायचो त्या काळची गोष्ट आहे. एक प्लेट व्हॅनिला किंवा चॉकलेट आईसक्रीमवर दोन चमचे व्होडका (खासकरून स्मर्‌नॉफ) टाकायचो. किंचितशी कडसर लिंबट चव छान लागते.
-गा.पै.

कोकणात बरेच ठिकाणी कच्चा किंवा ओला पोह्याचा किंवा उडदाचा पापड ताटलीत ठेऊन त्यावर मऊ गुरगुट्या भात तुप, मेतकुट आणि लोणच अस घेऊन खातात, भात संपल्यानंतरचा तो पापड खूप छान लागतो.
निंबुडा तु म्हणती आहेस तो ही असाच काहिसा लागत असेल.

निंबुडा
धन्यवाद, लागतो अभ्यासाला आजच.. Happy

जेव्हा मी दारू प्यायचो त्या काळची गोष्ट आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
पैलवान मामा नक्की ना.... म्हणजे आता घेत नाही हे नक्की ना... Wink

बाकी मला स्वताला दारूची चव माहीत नसली तरी आईसक्रीम अन दारू कॉम्बो चांगले लागत असेल.. कारण मॅकडोनाल्डमध्ये कोकफ्लोट म्हणून कोकाकोला या फसफसणार्‍या पेयात आईसक्रीम टाकून मिळते ते चांगले लागते.

Pages