इशारों इशारों में दिल लेनेवाले...
लताच्या गाण्यांवर लागोपाठ दोन लेख लिहिलेले पाहून बहिणीने मुद्दाम फोन करुन निषेध व्यक्त केला - म्हणाली, 'तुला माहितिये मला आशा जास्त आवडते म्हणून मुद्दाम मला चिडवायला लतावर लेख लिहिलेस ना?' तिची समजूत घालताना माझी पुरेवाट झाली! तरी तिला सांगून पाहिलं की बये, दुसरा लेख दोघींनी म्हटलेल्या गाण्यांवर लिहिलाय ना... पण बाईसाहेब अश्या काही फुरगंटून बसल्या, काही केल्या पटेचना. शेवटी म्हटलं, बरं, मग आता काय लिहू तूच सांग. म्हणाली की आशा-रफी अशा द्वंद्वगीतांवर लिही काहीतरी आणि मग फोन कर. तोवर केलास तर तुझ्या मेहुण्यांशी, भाचरांशी बोल... आता अशी धमकी दिल्यावर बाईसाहेबांची मर्जी सांभाळणं भाग आहे, तेव्हा हा लेख खास तिच्यासाठी!
ती म्हणाली ते तसं बरोबर आहे. रफीची गाण्यात जोडी जास्त जमली ती लताबरोबर आणि आशाची किशोर कुमारबरोबर. कदाचित हा त्यांच्या गाण्याच्या शैलीतल्या साधर्म्याचा परिणाम असेल, कदाचित त्यांचा बहराचा काळ जुळला म्हणून असेल किंवा कदाचित निव्वळ योगायोग असेल. पण आशा-रफी यांनी गायलेली द्वंद्वगीतं त्यामानानी संख्येनी कमी आहेत - पण संख्येनीच फक्त! बाकी या सर्वांच्याच आवाजाची तयारी आणि रेंज या दोन्हीला बंधनं नाहीतच जणू, त्यामुळे कुठल्याही प्रकारची गाणी हे चौघेही गाऊ शकतात - एकेकटे असोत किंवा एकमेकांबरोबर असो. त्यामुळे आशा-रफी या जोडीनेही जवळपास सगळ्या आघाडीच्या आणि मोजकेच काम करणाऱ्या अश्या सगळ्या संगीतकारांकडे गाणी गायली. त्यातलीच ही काही ठळक गाणी.
मैं सोया अखिया मीचे - १९५८ सालचा 'फागुन' हा एकदम टिपीकल हिंदी चित्रपट - पुनर्जन्म, नायक-नायिकेच्या प्रेमाला विरोध वगैरे सगळं साग्रसंगीत होतं. चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा एका हवेलीचे नवे मालक घोडागाडीतून येतात. त्या तरुण दांपत्याला पाहताच हवेलीची देखरेख करणारा म्हातारा सेवक दचकतो आणि त्यांना हवेलीच्या जुन्या मालकांच्या तसबिरी दाखवतो, त्यात या दांपत्याच्याही तसबिरी असतात. दोघे ते पाहून हैराण होतात आणि विचारतात, आमच्या तसबिरी इथे काय करतातहेत? तेव्हा तो सेवक त्यांना त्यांच्या आधीच्या जन्माची हकीगत सांगतो. नायक भारत भूषण जमीनदार घराण्यातला आणि बाह्मण कुळातला. नायिका मधुबाला बंजाऱ्यांच्या टोळीच्या सरदाराची एकुलती एक मुलगी. दोघांचं एकमेकांवर प्रेम जडतं, पण त्याला त्याच्या घरातून आणि तिच्या टोळीतुनही विरोध होतो. शेवटी एकदाचं तिच्या वडलांना त्यांचं प्रेम मान्य होतं पण तिच्याशी लग्न करुन टोळीचा सरदार होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा जीवन त्या दोघांच्या जीवावर उठतो. कसेबसे त्याच्या तावडीतून सुटुन दोघं एका हवेलीच्या आश्रयाला येतात ती मधुबालाच्या वडिलांची हवेली निघते. जन्मतः आईचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या जमीनदार वडिलांना त्यांचे गुरु मुलीचा त्याग करायला सांगतात. तिला नदीत सोडुन दिल्यामुळे वहात-वहात बंजाऱ्यांच्या हाताला ती लागते आणि त्यांच्यातली एक म्हणूनच लहानाची मोठी होते. तिच्या जन्माची हकीगत कळल्यामुळे मग काही विरोध न होता त्यांचं लग्न होतं, पण तरुणपणीच दोघांचाही मृत्यू होतो. एकूण कथेला विशेष काही अर्थ नाही. पण नायिकेच्या भूमिकेतील मधुबाला आणि अो. पी. नय्यर यांचं संगीत यामुळे चित्रपट आर्थिकदृष्ट्या प्रचंड यशस्वी झाला.
चित्रपटात तब्बल अकरा गाणी. लौकिकदृष्ट्या शास्त्रीय संगीताचं अजिबात शिक्षण न घेतलेल्या अो. पीं. नी ही सगळी गाणी पिलु रागात बांधली! त्यात आशा आणि रफीची पाच द्वंद्वगीतं. सगळ्यांत गाजलेलं अर्थात 'एक परदेसी मेरा दिल ले गया'. पण मला स्वतःला 'मैं सोया अखिया मीचे' जास्त आवडतं. गाण्याची चाल अत्यंत तरल, सहज गुणगुणल्यासारखी - पण तोच प्रयत्न आपण करु जावं तर तोंडघशी पडायला होतं! रफी आणि आशासारखे पार्श्वगायक ते किती सहज करुन जातात आणि आपल्यासाठी भास निर्माण करतात की गाणं म्हणायला फारच सोपं आहे. हीच खऱ्या कलाकाराची करामत. कितीही अवघड चाल असली तरी ती अश्या तऱ्हेनी उलगडून मांडायची की ऐकणाऱ्याला वाटावं, 'अरे, किती छान, सोपी चाल आहे!' हे गाणं ऐकताना ही भुरळ आपल्यावर सतत पडत राहते. म्हणूनच मला हे गाणं जास्त आवडतं. बाकी पडद्यावर मधुबाला पाहण्यासारखं सुख नाही आणि रफीचा परीसस्पर्श लाभलेली सुंदर गाणी गायला पडद्यावर भारत भूषण असावा यापेक्षा आपलं प्रेक्षक म्हणून दुर्दैव नाही...
अच्छाजी मैं हारी - १९५८ सालच्या 'काला पानी' या चित्रपटाची निर्मिती देव आनंदच्या 'नव केतन फिल्मस्' ने केली होती. त्या काळात देव आनंदचा चित्रपट म्हटल्यावर संगीत दिग्दर्शन सचिन देव (दादा) बर्मनचं असणार हा जणू अलिखित करारच होता. आणि दादांचं संगीत म्हणजे चित्रपटातलं एकूण एक गाणं गाजणार हे ही गृहीतच धरायचं. नेमकं त्याच सुमारास दादा आणि लतामधल्या काही गैरसमजामुळे दादा बर्मननी लताच्या ऐवजी आशाचा आवाज वापरायला सुरुवात केली. अर्थात त्यामुळे आशाचा फायदा तर झालाच पण आपल्यासारख्या चाहत्यांचाही झाला कारण तोवर आणि लताशी झालेलं भांडण मिटल्यावर दादांची पहिली पसंती होती लताच्या आवाजाला. ते भांडण झालंच नसतं तर 'अच्छाजी मैं हारी, चलो मान जाअो ना' सारखं द्वंद्वगीत आपल्याला आशाच्या आवाजात कदाचित मिळालं नसतं, कारण नायिका मधुबालाही शक्यतो लताच्या आवाजालाच झुकतं माप देत असे.
असो. तर, हे गाणं - आपल्या वडिलांना चुकीच्या साक्षीपुराव्यांमुळे त्यांनी न केलेल्या खुनाची शिक्षा म्हणून जन्मठेपेची शिक्षा झाली आहे हे कळल्यावर देव आनंद त्यांचं निरपराधित्व सिद्ध करण्यासाठी जो झगडा देतो त्याची गोष्ट म्हणजे A. J. Cronin लिखित 'Beyond This Place' या कादंबरीवर आधारीत हा चित्रपट. वडिल हैदराबादच्या तुरुंगात असल्यामुळे देव आनंद तिकडे जातो आणि मधुबालाकडे पेईंग गेस्ट म्हणून राहतो. नलिनी जयवंत या कलावंतिणीकडे वडिल निर्दोष असल्याचा पुरावा असल्याचं कळल्यावर तो पुरावा मिळवण्यासाठी देव आनंद तिच्यावर प्रेमाचं नाटक करुन तो पुरावा मिळवु पाहतो. साहजिकच, तोवर त्याच्या प्रेमात पडलेली मधुबाला त्याच्यावर चिडते. जेव्हा सत्य तिला समजतं, तेव्हा देव आनंदचा राग घालवण्यासाठी म्हणून ती कान पकडून कबुली देते, 'अच्छाजी मैं हारी, चलो मान जाअो ना'; पण दुखावलेला देव आनंद तिला सुनावतो 'देखी सब की यारी, मेरा दिल जलाअो ना'... खरं तर प्रत्यक्ष मधुबालाने कान पकडल्यावर कोण विरघळणार नाही? पण प्रेमिकांचंच भांडण ते! कोण कधी रुसेल आणि कसं मनेल - कोणी सांगावं! खरं सांगायचं तर प्रेमिकांचे रुसवे-फुगवे त्यांच्या प्रेमापेक्षाही मला गोड वाटतात कारण हे रुठना-मनाना एकदा संसार सुरु झाला की पार माळ्यावरच भिरकावलं जातं जणू! रोजच्या जगण्याच्या धांदलीत एवढी सवड तरी कुठून आणायची? पडद्यावर मधुबाला आणि देव आनंद म्हणजे प्रेक्षकांवर जीवघेणा प्रसंग - कोणाकडे पहायचं? तसंच हे गाणं ऐकताना वाटतं, कुणाचा आवाज जास्त लक्ष देऊन ऐकू? त्याची सगळी नाराजी केवळ आपल्या गळ्यातून आपल्या डोळ्यांसमोर उभी करणाऱ्या रफीचा? की मधुबालाच्या गोडव्याला तोडीस तोड, खास तिच्या लकबीने गोड स्वरात गाणाऱ्या आशाचा?
त्याची हात जोडून माफी मागितली, कान पकडले तरी तो मानत नाही म्हटल्यावर शेवटी ती म्हणते,
आशा: जाअो, रह सकोगे ना तुम भी चैन से
रफी: तुम तो खैर लुटना जीने के मज़े
आशा: क्या करना है जी के?
रफी: हो रहना किसी के...
आशा: हम ना रहे तो याद करोगे.... समझे?
रफी: समझे...
इथे 'हम ना रहे तो याद करोगे' नंतर एक जीवघेणा पॉज टाकलाय! मी तर त्या पॉजवरच जाम फिदा आहे! त्या एका पॉजसाठीसुद्धा दादा बर्मनना सलाम!
बड़े है दिल के काले - सन १९५९. 'तुमसा नहीं देखा' च्या अफाट यशानंतर शम्मी कपूरनी चित्रपटातली आपली प्रतिमा बदलायला सुरुवात केली होती. बहुतांशी आनंदी, मनाची मर्जी लागेल तेव्हा आणि तसं स्वतःच्या शैलीत नाचणारा, भूमिकेला विनोदी झालर असलेला, सहसा मारामारी न करणारा असा नायक हिंदी चित्रपटात आघाडीचं स्थान मिळवू शकतो आणि चित्रपट यशस्वी करु शकतो हे अचाट काम त्यानी करुन दाखवलं. नायिकेपासून चार हात दूर, तिसरीकडेच पहात, तिच्याहीपेक्षा लाजत आणि अत्यंत आडवळणाने प्रेम व्यक्त करणं यातली कोणतीच गोष्ट या नव्या समीकरणात बसत नव्हती. 'तुमसा नहीं देखा' च्या यशाच्या पार्श्वभुमीवर दिग्दर्शक नासिर हुसेन आणि शम्मी कपूर या जोडगोळीने दुसरा चित्रपट दिला 'दिल देके देखो'. नव्या नायिकांबरोबर काम करायला शम्मी कपूर कायमच तयार असायचा. त्याचा एक फायदा म्हणजे चित्रपटात थोडा ताजेपणा आपोआप यायचा. या चित्रपटात, तोवर बालनट असलेली आशा पारेख नायिकेच्या रुपात पहिल्यांदा पडद्यावर आली. हिंदी चित्रपटात तशी विरळा गोष्ट म्हणजे स्त्री-संगीतकार. या चित्रपटात उषा खन्नाने संगीतकार म्हणून पदार्पण केलं. आणि पहिल्याच चित्रपटात सगळीच्या सगळी गाणी यशस्वी करुन दाखवली. शम्मी कपूरला पार्श्वगायक म्हणून रफीला पर्याय नव्हता. पण पुढे जरी आशा पारेखवर चित्रीत झालेली बरीच गाणी लतानी म्हटली असली तरी पदार्पणाच्या चित्रपटात मात्र आशाचा आवाज उषा खन्नाने वापरला आणि फार बरं झालं. उडत्या चालीची गाणी आशाच्या आवाजात जास्तच खुलतात!
आशा: बड़े है दिल के काले, हाँ यही नीली सी आँखोंवाले
रफी: सूरत बुरी हो, बुरा नहीं दिल मेरा, ना हो यकीं, आज़माँ ले
आशा: मेरी जाँ, वाह, वाह, वाह
रफीः मेरी जाँ, वाह वाह वाह वाह
L O V E लव्ह का मतलब है प्यार - 'Love in Simla' या १९६० साली आलेल्या चित्रपटात हे गाणं मुख्यतः जॉय मुखर्जी आणि आझ्रा यांच्यावर चित्रित केलं आहे. तशी गाण्याच्या वेळी तिथेच चित्रपटाची नायिका साधनाही आहे, पण तिचं काम मुख्यतः या दोघांच्या प्रेमगीताला 'B O R E... बोअर' ची साथ देणं आणि त्या दोघांची एक प्रकारे खिल्ली उडवणं हेच आहे. तिच्यासाठीही आशाचाच आवाज वापरला आहे. गाणं संपेपर्यंत दिग्दर्शकाने विशेष कष्ट घेऊन साधना दिसायला कशी अतिसामान्य वाटेल ते दाखवलं आहे आणि मला वाटतं, दिग्दर्शक, वेशभूषाकार आणि रंगभूषाकार यांना खरंच बरेच कष्ट पडले असतील... जेमतेम १८-१९ वर्षाची साधना त्याच चित्रपटात नंतर नेहमीप्रमाणेच अतीव सुंदर दिसते. पण या गाण्यात capri म्हणण्यासारखी पँट, बाह्या दुमडुन कोपरापर्यंत आणलेला शर्ट, पायात कॅनव्हासचे बूट, डोळ्यांवर न शोभणारा चष्मा, घट्ट पोनिटेल या अशा अवतारात साधना आणि छानपैकी नटलेली, सुंदर दिसणारी आझ्रा यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक दिसतो, तोच त्यांच्या विचारातही दाखवला आहे. हिंदीमधला साधनाचा हा पहिला चित्रपट.
जॉय: एक हंसी होठोंपे, एक हया आँखों मे
आझ्रा: दोनों जब टकराए, प्यार बसा आँखों में
साधना: जो वफ़ा ना हो तो ये है, दो घड़ी का खुमार
रफीचा आवाज नेहमीप्रमाणे प्रसंगानुरुप प्रसन्न आहे यात तसं काही विशेष नाही. पण गाणं नीट ऐकताना, आशाने आझ्रा आणि साधना या दोघींसाठी गाताना नुसत्या आवाजातच नाही तर पूर्ण गायकीत बदल केलाय. या सगळ्या पार्श्वगायकांचा हा विशेष होता की कोणासाठी आपण गातोय, चित्रपटात प्रसंग काय याची माहिती करुन घेणं त्यांना गरजेचं वाटत होतं. त्यामुळे आझ्रासाठी गाताना आशाचा आवाज अगदी तरुण, हसरा, खेळकर वाटतो आणि गाणं न पाहताही हे सहज लक्षात येतं ही प्रेमात पडलेली एक अल्लड तरुणी हे गाणं म्हणत असावी. पण साधनावर चित्रीत झालेल्या अोळी म्हणताना तोच आवाज जादू केल्यासारखा बदलतो - साधनाच्या व्यक्तिरेखेप्रमाणे वयापेक्षा मोठी झालेली, जणू सगळ्या जगाचं अोझं आपल्याच खांद्यावर असावं अशी, आपण सुंदर नाही, कोणाला आवडत नाही आणि कदाचित म्हणूनच तिच्या वयाच्या मुली जसं वागतात त्याविरुद्ध सगळं काही करणारी सोनिया त्या अावाजातूनही आपल्यापर्यंत पोहोचते! आणि ही कमाल फक्त आशाचा आवाजच करु शकतो.
इशारों इशारों में दिल लेनेवाले - १९६४ सालच्या 'काश्मीर की कली' या चित्रपटातून शर्मीला टागोरने हिंदी चित्रपटात पदार्पण केलं. तोपर्यंत तिच्या मातृभाषेत - बंगालीमध्ये - साक्षात सत्यजित राय यांच्या 'अपूर संसार' आणि इतर काही चित्रपटांतून तिने स्वतःची अोळख पटवलेली होती. पण हिंदी चित्रपटाचं जगच वेगळं! इथे गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूराच्या घराण्याशी आणि त्यांच्या कर्तुत्वाशी फारसं कोणाचं देणं-घेणं नाही... सुदैवाने शर्मीला स्वतः बुद्धीमत्तेचा वारसा घेऊन आल्यामुळे हिंदी चित्रपटाशी तिने जुळवून घेतलं; नुसतंच जुळवून घेतलं नाही, तर मुख्यतः सुंदर दिसणं यापलिकडे फारसं काही करावं न लागणं (आणि त्यासाठी तर तिला काहीच करायची गरज नव्हती - सौंदर्याची देणगी उपजतच होती.) इथपासून सुरुवात करून हळुहळु स्वतःचं स्थान तिने निर्माण केलं. नायिकेची भूमिका नायकाइतकीच, नव्हे, कधी-कधी नायकापेक्षाही जास्त प्रभावी असलेले चित्रपट तिने सहजगत्या पेलले.
'काश्मीर की कली' ला अो. पी. नय्यर यांचं संगीत होतं आणि अोपींच्या संगीतरचनांत आशाचा आवाज सर्वात जास्त खुलतो. या जोडीने अनेक अविस्मरणीय गाणी दिली, सगळ्या प्रकारची गाणी दिली. याही चित्रपटामधलं एकन् एक गाणं रसिकांची दाद मिळवुन गेलं. रफी आणि आशा यांचीच मुळी तीन द्वंद्वगीतं आहेत. पण त्यातलं माझं आवडतं 'इशारों इशारों में दिल लेनेवाले, बता ये हुनर तू ने सीखा कहाँ से'. गाण्याच्या सुरुवातीलाच रफी अगदी हळुवार आवाजात गुणगुणतो आणि अचानक आशाचा जीवघेणा 'हाये'... सगळं जग त्या क्षणी थबकतं आणि एकत्रितपणे सुस्कारा सोडतं - 'हाये'!
आशा: मुहोब्बत जो करते है वो, मुहोब्बत जताते नहीं
धड़कने अपने दिल की कभी, किसी को सुनाते नहीं
मज़ा क्या रहा, जब के खुद कर दिया हो
मुहोब्बत का इज़हार अपनी ज़ुबाँ से
रफीः माना के जान-ए-जहाँ, लाखों में तुम एक हो
हमारी निगाहों की भी, कुछ तो मगर दाद दो
बहारों को भी नाज़ जिस फूल पर था
वहीं फूल हम ने चुना गुलसिता से
प्रेयसीची लज्जा, मार्दव, सामाजिक बंधनाची जाणिव आणि तरी मनात भरुन राहिलेलं प्रेम आणि प्रियकराचं प्रेम म्हणजे थोडं तिच्यावर आपला हक्क बजावणारं, थोडं आपल्याच पसंतीवर मन खूष असलेलं आणि जणू सगळ्या जगाला आपलं प्रेम अोरडून सांगावंसं वाटणारं - शब्द, संगीत आणि रफी-आशाचे सुरेख लागलेले आवाज यांचा हा अप्रतिम संगम पडद्यावर पहायला तर छान वाटतोच, पण नुसतं ऐकायलाही किती गोड!
अभी ना जाअो छोड़कर - लेख लिहायला सुरु करण्याआधीच मला माहीत होतं, लेखात मी शेवटी कोणत्या गाण्याबद्दल लिहिणार आहे ते. असं माझ्याबाबतीत सहसा होत नाही कारण माझं लेखन कधीच काही ठरवून असं होत नाही. सुचेल तसं लिहीत जाते, मध्ये थोडया-थोडया वेळानी थांबून वाचून थोडं संस्करण करते आणि पुन्हा पुढे सुरु ही साधारण माझी पद्धत... पण आशा-रफी यांच्या द्वंद्वगीतांवरचा लेख केवळ याच गाण्याने समाप्त करणं शक्य आहे... 'अभी ना जाअो छोड़कर' ही केवळ प्रत्येक प्रियकराचीच विनवणी/ तक्रार नव्हे, तर मला वाटतं वेगवेगळ्या संदर्भात प्रत्येकाच्याच मनात ही भावना कधी ना कधी येते...
१९६१ सालचा 'हम दोनो' नावाचा देव आनंदचा डबल रोल असलेला हा चित्रपट. साहजिकच दोन नायिका - साधना आणि नंदा. श्रीमंत घरातली साधना आणि जीवनाचं ध्येय आणि जगण्यासाठी आवश्यक अशी नोकरी शोधत असलेला देव आनंद. फक्त फरक इतकाच की चित्रपटात दोघांच्याही घरुन त्यांच्या प्रेमाला विरोध नाही. इतका, की नायक सैन्यात नोकरी धरतो तेव्हा लग्न झालेलं नसतानाही नायिका त्याच्या आईच्या सोबतीला, तिची सेवा करायला येऊन राहते आणि तिचे वडिलही तिला पाठिंबा देतात.
साधना देव आनंदला भेटायला येते आणि येताना तीच त्याला भेट म्हणून धुन वाजवणारा एक लाईटर घेऊन येते (हेही एकदम हटकेच!) ही धुन चित्रपटभर वापरली आहे. सूर्य क्षितिजाखाली गेला, दूर कुठे दिवे दिसायला लागले, आता निघायला हवं, वडिल काळजी करत असतील म्हणून ती उठते आणि तो कुठल्याही प्रियकराची नेहमीची तक्रार करतो, 'अभी ना जाअो छोड़कर, के दिल अभी भरा नहीं'
रफीः अभी अभी तो आई हो, बहार बनके छाई हो
हवा ज़रा महक तो ले, नज़र ज़रा बहक तो ले
ये शाम ढल तो ले ज़रा, ये दिल सँभल तो ले ज़रा
मैं थोड़ी देर जी तो लूँ, नशे के घूँट पी तो लूँ
अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं
आशाः सितारे झिलमिला उठे, चराग़ जगमगा उठे
बस अब ना मुझको टोकना, न बढ़के राह रोकना
अगर मैं रुक गई अभी, तो जा न पाऊँगी कभी
यही कहोगे तुम सदा, के दिल अभी नहीं भरा
जो खत्म हो किसी जगह, ये ऐसा सिलसिला नहीं
रफीः अधूरी आस छोड़के, अधूरी प्यास छोड़के
जो रोज़ यूँ ही जाअोगी, तो किस तरह निभाअोगी
कि ज़िंदगी की राह में, जवाँ दिलों की चाह में
कई मुक़ाम आएंगे, जो हमको आज़माएंगे
बुरा न मानो बात का, ये प्यार है, गिला नहीं
आशाः हाँ, तही कहोगे तुम सदा के दिल अभी भरा नहीं
रफीः हाँ दिल अभी भरा नहीं
आशाः नहीं, नहीं, नहीं, नहीं
संगीतकार जयदेवनी अगदी मोजकं पण अतिशय दर्जेदार काम केलं. गंमत म्हणजे स्वतंत्रपणे संगीत द्यायला लागण्याआधी ते दादा बर्मनचे साहाय्यक होते. त्यामुळे संगीताची जशी घराणी असतात तसं हे बर्मन घराणं मानायला हरकत नाही! दर्जेदार काम ही बर्मन घराण्याची खासियत असली पाहिजे. तेव्हा त्याच तालमीतून बाहेर पडलेल्या जयदेवनी दर्जाशी कधी तडजोड केली नाही यात आश्चर्य ते काय असं रूढार्थाने म्हणता आलं असतं पण चित्रपटांच्या मायावी दुनियेत हे आश्चर्यच म्हणायला हवं.
पडद्यावर देव आनंद आणि साधनानी गाण्याचे भाव जितके जिवंत केलेत तितकेच रफी आणि आशानी आपल्या गळ्यातून.
लेख लिहायला बसले तेव्हा आधी आवडीच्या गाण्यांची यादी करायला घेतली. पहिल्या यादीत जवळपास ५० गाणी होती. हळुहळु कात्री लावत ती ११-१२ वर आली होती. त्यानंतर मात्र यादी छोटी करणं काही केल्या जमेना... शेवटी लेखाची लांबी हा एकमेव निकष लावून लिहीत गेले. शेवट कुठे करायचा ते आधीच ठरलं होतं, त्यामुळे 'हम इंतज़ार करेंगे ते क़यामत तक', 'इन बहारों में अकेले ना फ़िरो', 'मुझे गले से लगा लो बहुत उदास हूँ मैं', 'आजा पंछी अकेला है', 'सावन आए या न आए' आणि 'उड़े जब जब ज़ुल्फ़ें तेरी' ही गाणी राहूनच गेली... मलाच हूरहूर लागली आहे.
अप्रतिम.......
अप्रतिम.......
त्यानंतर मात्र यादी छोटी करणं
त्यानंतर मात्र यादी छोटी करणं काही केल्या जमेना... >> असे का पण ? अजून लिहिलेले आवडेलच वाचायला.
"इशारों इशारों में दिल लेनेवाले" मात्र सर्वात पहिले राहणार ह्या जोडीसाठी, असा बाज नि साज पण जमलाय .
है अगर दुष्मन जमाना गम नही हम
है अगर दुष्मन जमाना गम नही
हम किसि से कम नही
ओ मेरे सोना रे सोना रे
ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना
एवढं सगळं कसं लिहून काढतात
एवढं सगळं कसं लिहून काढतात लोक? मलाही खुमखुमी येतेय
एक तसं कमी ऐकू येणारं गाणं : जिस दिन से मैंने तुमको देखा है
पण दो घडी वो जो पास आ बैठे हे लता-रफीचं आहे. पुन्यांदा आमच्या आशावर अन्याव का वो ताई?
मस्त लेख. आता लगेच दो घडी वो
मस्त लेख. आता लगेच दो घडी वो जो... ऐकायला घेतलं. आता सगळी ऐकतो एक एक करुन.
असामी +१ अख्ख्या पोस्टीला!!!
लिहीत रहा कृपया
धन्यवाद, मंडळी! लेख
धन्यवाद, मंडळी! लेख वाचल्याबद्दल आणि आवर्जुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल.
असामी, लिहीते बाबा! भाग -२ लिहायचा माझाही विचार होता. हा लेख एवढाच ठेवला कारण आमच्या मातोश्री! रिटायर होऊन इतकी वर्षं झाली पण अजुन काही शिक्षिका असल्याचं विसरायला बाई तयार नाहीत. लगेच टोकतात - किती ते पसरट लिहायचं! पण खरं आहे इतक्या थोड्या गाण्यांबद्दल लिहिणं हा अन्याय आहे.
भरतराव - आमच्या कानाला त्या आशाताईच वाटतात हो... 'I am telling the truth, the whole truth and nothing but the truth' अशी इकडच्या कोर्टात शपथ घेतात तसं... आणि हो, ती खुमखुमी कागदावर उतरू द्या की! जुन्या गाण्यांबद्दल जितकं लिहिलं जातं ते कमीच वाटतं, शिवाय प्रत्येकाची आवड वेगळी, शैली निराळी - त्यामुळे वाचायला जास्त मजा येते!
वैद्यबुवा - नक्की लिहित राहणार; तुम्हीही काही चुकलं, कमी-जास्त झालं तर सांगत रहा.
सुरेख लेख लिहीत रहा
सुरेख लेख
लिहीत रहा कृपया>>>>+१
मस्त जमलाय लेख,आवडलाच !
मस्त जमलाय लेख,आवडलाच ! पुढील भागाच्या प्रतिक्षेत...!
खूपच छान लिहिलयं. आज घरी
खूपच छान लिहिलयं. आज घरी गेल्यावर आवर्जून ऐकणार ही गाणी.
यु ट्युब वर विडियो
यु ट्युब वर विडियो टाकणार्यांनी सुद्धा लता लिहीलय खरं. मला लता-आशाचे अगदी तरुण असतानाचे आवाज पटकन ओळखू येत नाही त्यामुळे ठामपणे म्हणता येत नाही की आशाच आहे पण मलाही प्रिया ह्यांचे बरोबर वाटतय.
मस्त लिहिलंय.... अजून
मस्त लिहिलंय.... अजून वाचाय ला आवडेल.
लता आहे
लता आहे
http://www.youtube.com/watch?v=WYOg5i086F0
२.४ मि पासुन ऐका आवाज जो वरती जातो तो लताचा आहे ते कळते
अप्रतिम लेख! दो घडी गाणं
अप्रतिम लेख!
दो घडी गाणं लतानेच गायलंय. आईला सर्व जुनी गाणी आवडत असल्याने ही सर्व गाणी लहानपणापासून ऐकत आलेय आणि त्यामुळे कान तयार झालाय आवाज आशाचा सुद्धा चढतोच पण ह्या गाण्यात खास लता टच आहे, वरच्या सुरांना तरी.
अजून एक, ग़मगुसार असा शब्द आहे, ग़मदुसार नाही
मदनमोहनने संगीत दिलेल्या गाण्यांमध्ये त्याने जास्त करून लताचाच आवाज वापरलाय, आशाने त्याच्याकडे गायलेली गाणी शोधायलाच लागतील.
प्रिया, छान! "मला जमीं से
प्रिया, छान! "मला जमीं से हमें आसमाँ पर .." ही खुप आवडतं ..
मलाही "दो घडी.." लता चंच आहे असं वाटत होतं .. लता आणि आशाच्या आवाजात तसा खुप कमी वेळा गोंधळ उडतो ..
"दो घडी" लता रफी च्या गोल्डन
"दो घडी" लता रफी च्या गोल्डन कलेक्शन मध्येही आहे .. HMV ही चुक करेल असं वाटत नाही ..
इशारों इशारों में दिल
इशारों इशारों में दिल लेनेवाले
शब्द, संगीत आणि रफी-आशाचे सुरेख लागलेले आवाज यांचा हा अप्रतिम संगम पडद्यावर पहायला तर छान वाटतोच, पण नुसतं ऐकायलाही किती गोड! >> या गाण्याचे चित्रीकरणही शब्दांइतकेच मोहक आहे.
अगदी मला ज्या ओळी आवडतात त्यांचाच उल्लेख तु केलेला बघुन खुपच छान वाटले.
लेख मस्तच झाला आहे. भाग -२ च्या प्रतिक्षेत
मंडळी, प्रथम तुमची सगळ्यांची
मंडळी, प्रथम तुमची सगळ्यांची क्षमा मागते. का कुणास ठाऊक, माझी समजूत होती की 'दो घड़ी वो जो पास' रफी आणि आशानी गायलं आहे. दुर्दैवाने मी सहसा ज्या एक-दोन साईटवर अश्या गोष्टींसाठी भरवसा ठेवते तिथेही तीच माहिती मिळाल्यामुळे मी अजिबात मनात शंका न येता ते गाणं लेखासाठी निवडलं. पण जर ती माहिती चुकीची असेल तर या लेखात ठेवू नये असं मला स्वत:ला वाटतं. आणि म्हणून मी त्याच्याऐवजी दुसऱ्या गाण्याबद्दल लिहिलं आहे.
भरत, संपदा, पिनाकीन आणि सशल - तुमचे आभार चूक लक्षात आणून दिल्याबद्दल. संपदा, त्या खोडलेल्या गाण्यातल्या शब्दाच्या (ग़मग़ुसार) टायपोबद्दल क्षमा.
आरती - आपली आवड खरंच खूपच जुळते की!
मस्त लेख !
मस्त लेख !
वा! मस्त लेख!
वा! मस्त लेख!
आला बुवा आशावर पण लेख
आला बुवा आशावर पण लेख
मधुबाला !! स्वर्गिय सौंदर्य! तिला पडद्यावर बघताना पापण्यांची उघडमीट करणेही जीवावर येते. मग कंटाळा येणे तर दूरच (तसे एक गाणे आहे की ज्यात तिला बघवत नाही - 'एक परदेसी मेरा दिल ले गया'. गाण्याचा नृत्यदिग्दर्शकाने विडा उचलला असावा की मधुबालाला एका गाण्यात तरी विचीत्र दिसायला लावेन. पूर्ण केलीये पैज त्याने. पडद्यावर नाच म्हणून जे काही घडते ते बघणे म्हणजे एक अत्याचार असतो.) पण जेंव्हा ती मधुबाला खट्याळपणे हसते तेंव्हा पडदा जिवंत होतो. आणि त्या खट्याळ मूडला आशाचाच आवाज लागतो. लताच्या आवाजात मधुबालाची अनेक सुंदर गाणी आहेत पण त्यावर बर्याचदा ती नुसते ओठ हलवते आहे असेच वाटत रहाते पण आशा जेंव्हा मधुबालासाठी गायली आहे तेंव्हा तो मधुबालाचाच आवाज वाटतो.
आशा रफीची आणखी काही गाणी (पुढच्या भागाकरता )
१. आप युही अगर हमसे मिलते रहे - एक मुसाफिर एक हसीना
२. दिवाना मस्ताना हुवा दिल - बंबइका बाबू
३. देखो कसमसे - तुमसा नही देखा
अप्रतिम्च. इशारों इशारों में
अप्रतिम्च.
इशारों इशारों में दिल लेनेवाले मधील आशाचं 'हाये' कातिलच.
अभी ना जाअो छोड़कर मधील 'सितारे झिलमिला उठे' व्वा!
दिवाना मस्ताना हुआ दिल - बंबईका बाबु - माझं अत्यंत आवडतं
मस्त गाणी, आणि मस्त लेख. छानच
मस्त गाणी, आणि मस्त लेख.
छानच लिहिलं आहे...
माझ्या मनातली आशा ची ड्युएट्स
१. ओ मेरे सोनारे सोना रे सोना रे
२. मांगके साथ तुम्हारा
३. बोहोत शुक्रिया बडी मेहेर्बानी
४. छोड दो आंचल
५. ओ नीगाहे मस्ताना ( हे ड्युएट नाही तरी त्या गाण्यात तिच्या आवाजातलं "हं हं हं हं". जस्ट लाजवाब!!!)
ह्या प्रत्येक गाण्यात आशाची खासीयत जाणवते ......
मस्त लिहिलंय.... अजून वाचाय
मस्त लिहिलंय.... अजून वाचाय ला आवडेल.
सुंदर लेख. लिहीत रहा.
सुंदर लेख.
लिहीत रहा.