तीनी सांजा सखे मिळाल्या...
संध्याकाळची वेळ फार विचित्र असते नाही? त्यातून कालच्यासारखी आज नसते आणि आजच्यासारखी उद्या... खरं तर सूर्य नुकताच क्षितिजाखाली गेलाय आणि आकाशात एखादी चांदणी नुकतीच डोकावतेय, चंद्राच्या आगमनाची चाहूल देतेय यापेक्षा फार काही वेगळं बाहेर घडत नसतं. जे घडतं ते सगळं आत, आपल्या मनात असतं.
या वेळेला कातरवेळ म्हणतात ते काही उगीच नाही! दिवस-रात्रीच्या सीमारेषेवर, धड दिवसाचा लख्ख प्रकाश नाही की चंद्राचं शीतल चांदणं नाही अशा वेळेस अोळखीच्या वाटा वेगळ्या दिसतात. आपल्याच बागेतल्या झाडांच्या सावल्या भिववतात. आठवणींच्या गोफाच्या धाग्यांचा नुसता गुंता होतो. नेमक्या नको त्या आठवणीच का येतात अशा वेळी? त्याही एकेकट्या नाही... सोबतीला जणू सगळ्या वेदना, सगळे निःश्वास, मनाच्या खोल कप्प्यात पार दडपून बंद केलेल्या आठवणी उफाळुन वर येतात, जणू बजावतात, आम्ही आहोत अजून; असं बंद दरवाज्यामागे ढकललंस म्हणून आम्ही तुझी साथ सोडू असं वाटलं की काय तुला? बहुधा म्हणूनच मन सारखं म्हणत असतं 'या कातरवेळी पाहिजेस तू जवळी'... कारण एकटं असलं की संध्याकाळ अशी अंगावर येते... त्यात बाहेर पावसाने थैमान मांडलेलं असावं! नको-नको होतं नुसतं. तो पाऊस नक्की बाहेरच पडतोय ना? की डोळ्यांत न मावणाऱ्या अश्रुंमुळे तसं वाटतंय? ढगांत उगीचच चित्रविचित्र आकार दिसू लागतात, वीजांच्या रेघांनी क्षितिज उजळुन निघतं तेव्हा तर ती वीज जणू आपल्यावरच पडतेय असं वाटतं. अशा वेळी असहाय्य मन जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर रेंगाळणाऱ्या जीवासारखं होतं...
कदाचित म्हणूनच आपल्याकडे या वेळेस दिवा लावायची पद्धत असावी. समईच्या शुभ्र कळ्यांच्या उजेडात कातर मनाला दिलासा देण्याची केवढी ताकद असते! त्यासाठी देवावर श्रद्धा हवी असंच काही नाही कारण त्या शांत उजेडात कोणाच्याही मनातल्या अंधाराला बाहेर पडायची जणू वाट सापडते.
आणि तेच मन प्रसन्न असतं तेव्हा आकाशात उधळलेले गुलालाचे रंग मोहवतात, आपली माणसं हळुहळु घरी येणार याची हवीहवीशी हूरहूर असते, आज काय बरं करावं जेवायला हा विचार तर केव्हाचा मनात फेर धरत असतो! एखाद्या नवोढेच्या मनात त्यानंतर येणाऱ्या रात्रीच्या आठवणीनीच ते आकाशातले रंग गालावर उमटतात... त्यात नुकताच पाऊस पडुन गेलेला असावा किंवा पडत असावा! बाहेर डोकवावं तर संधीप्रकाशात अवघी धरणी जणू शुचीर्भूत झालेली दिसते. मोगऱ्याच्या झाडावर पावसाचे थेंब अजुन रेंगाळत असतात, रातराणीच्या कळ्या उमलण्याच्या बेतात असतात. फारच पाऊस झाला असेल तर मला उगीचच प्राजक्ताच्या नाजूक कळ्यांना हाऽऽऽ एवढा पाऊस सोसेल ना याचीच चिंता लागते... पाऊस अजून पडत असेल तर खिडकीशी बसून त्या रिमझिम झरणाऱ्या श्रावणधारा बघायला फार आवडतात. मधूनच कुठेतरी लखकन् वीज चमकते आणि तिच्या प्रकाशात नेहमीचंच आजूबाजूचं दृश्य नव्या उजेडानी नाहून निघतं; असं वाटतं आपण एका नव्याच जगात क्षणभर डोकावून पाहिलं जणू! अचानक रोजच्या 'तेच ते नि तेच ते' मध्ये विसरायला झालेला काळ आठवतो जेव्हा त्यानी आपला हात हातात घेऊन आपल्याला वचन दिलं होतं 'आजपासूनी जिवें अधिक तूं माझ्या हृदयाला'... लक्षात ठेवायची खरी गोष्ट हीच असायला हवी. कारण खरंच, संध्याकाळ कालच्यासारखी आज नसते अन् आजच्यासारखी उद्या... 'साक्षी ऐसे अमर करुनि हे तव कर करिं धरिला' हेच आपल्या जीवनातलं शाश्वत...
प्रीयादी कित्ती सुरेख वर्णन
प्रीयादी कित्ती सुरेख वर्णन केल आहे संध्याकाळच्या कातर वेळेच. हे मात्र अगदी खर आहे की संध्याकाळचा हूर हूर लावणारा हा काळ अगदी क्षणभाराचा असतो पण कधी कधी उगाच काही कारण नसताना सुधा मनाला उदास करून जातो तर कधी मनाला अजून हळवं बनवून जातो. एक वेगळीच जादू आहे ह्या तीन्हीसांजेत!!!
व्वा. मस्त. अगदी आतुन आलय अस
व्वा. मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदी आतुन आलय अस वाटत.
आवडेश!!!
>>अगदी आतुन आलय अस
>>अगदी आतुन आलय अस वाटत.
अनुमोदन
एकदम मस्त
एकदम मस्त
सुंदर लिहिलय....आवडले
सुंदर लिहिलय....आवडले
प्रिया, शीर्षकात चूक आहे कां?
प्रिया, शीर्षकात चूक आहे कां? तिन्हीसांजा हवं नां?
आवडलं. मनापासून लिहिलंय
आवडलं. मनापासून लिहिलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लोक्स ही दुसरी प्रिया आहे बर
लोक्स ही दुसरी प्रिया आहे बर का![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच गं नावबहिणे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आता माझी ओळख पटेल सगळ्यांना
आवडलं! शिर्षक बदलणार का? हे
आवडलं!
शिर्षक बदलणार का? हे शिर्षक वाचुन मला 'तिनी सांजा एकटीने खाल्ला... रिकामी बशी दिली मला' हे आठवले!![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
छान लिहिले आहे ...........
छान लिहिले आहे ........... :).....
(No subject)
उदय अरे ही प्रियाताई मी
उदय अरे ही प्रियाताई मी नव्हेच
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ओ...........हे वेगळ का ??????
ओ...........हे वेगळ का ?????? एडीट करायला हवे मग......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद, मित्र-मैत्रिणींनो!
धन्यवाद, मित्र-मैत्रिणींनो! खूप दिवसांनी मायबोलीवर आल्यावर छान वाटलं अगदी! त्याचं श्रेय मात्र समीरला... त्यानी सांगितलं की नुसतंच ब्लॉगवर ठेवण्यापेक्षा मायबोलीवरही लिही की!
'प्रिया.' - मी दुसरी नाही बरं का... पहिली
कारण मी १९९८ पासून मायबोली वाचतेय आणि १९९९ साली नोंदणी केली पहिली.
आऊटडोअर्स - तांब्याच्या मूळ कवितेत जसं लिहिलंय तसं मी लिहिलं (त्यांच्या कवितांच्या पुस्ताकात बघुन खात्री करुन घेतली); अर्थात त्यांचा काळ जवळपास एका शतकापुर्वीचा असल्याने भाषा वेगळी वाटणे स्वाभाविक आहे.
अरे वा प्रिया अनेक वर्षांनी!
अरे वा प्रिया अनेक वर्षांनी! वेलकम बॅक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रिया, तू परत आलीस. वा
प्रिया, तू परत आलीस. वा स्वागत!!!!
ह्यापुर्वी तुझ एकही ललित मी वाचलेल आठवत नाही. गाण्यांवरची माहिती मात्र खूप छान आठवते. तुझ्या ब्लॉगचा पत्ता दे ना.. तोही वाचेन. इथे नसेल द्यायचा तर संपर्कातून पाठवं.
वरचं ललित अत्यंत... अत्यंत सुरेख लिहिल आहे! एक एक शब्द काव्यमय झाला आहे.
माझ्यामते लतादिदिंनी जे भावगीत गायल त्यात 'तिन्हीसांजा' असा शब्द आहे तर राजकवी भा. रा. तांबे ह्यांच्या कवितेत मात्र 'तिनी सांजा..' अशा ओळीने सुरवात होते. बर्याचशा भावगीतात मुळ कवितेत बदल केलेले आहेत.
अप्रतिम्,हुरहुर लावणारं!!!
अप्रतिम्,हुरहुर लावणारं!!!
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हवे, बी - धन्यावाद... बी,
हवे, बी - धन्यावाद...
बी, खरंय,मलाही मी शेवटी ललित कधी लिहिलं होतें ते आठवत नाही. शंभर-एक वर्षांपुर्वी कालिजात असताना खरडलं होतं बरंच काही, पण सगळं पुलाखालच्या पाण्यात वाहून गेलं...
आत्ता अगदी स्पीकरला कान लावून ऐकलं तर मला गाण्यातही तीनी सांजा असंच ऐकू आलं... कान तपासून घ्यायला हवेत.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
माझ्या ब्लॉगचा पत्ता माझ्या profile मध्ये दिलाय, sahajsucheltase.blogspot.com
तिनी तिन्ही सांजा म्हणजे काय?
तिनी तिन्ही सांजा म्हणजे काय? तीन आणि संध्याकाळ यांचा काय स्म्बंध?
वाह ! सुंदर लिहिले आहे.
वाह ! सुंदर लिहिले आहे.
प्रिया, मीही हे भावगीत आत्ता
प्रिया, मीही हे भावगीत आत्ता ऐकले. मला मात्र 'तिन्ही' असे ऐकायला येत आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जागोमोहनप्यारे, तुम्हांला
जागोमोहनप्यारे, तुम्हांला पडलेला प्रश्न मलाही पडला होता. बरं, तिन्हीसांजेची वेळ हा शब्दप्रयोग अगदी सर्रास करतो आपण. आंतरजालावर थोडा शोध घेतल्यावर तिन्ही-सांजा या ठिकाणी याच विषयावर चर्चा दिसली.
बी - खरंच कान तपासून घ्यायला हवेत मला!
लेख आवडल्याचं कळवलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार!
ओह प्रिया, बर्याच दिवसांनी !
ओह प्रिया, बर्याच दिवसांनी ! छान वाटलं.
प्रिया, सुंदर लेख... <<जे
प्रिया, सुंदर लेख...
<<जे घडतं ते सगळं आत, आपल्या मनात असतं....> क्या बात है
प्रिया,मस्त!! फार आवडलं
प्रिया,मस्त!! फार आवडलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कातरवेळ... छान लिहिलं आहे.
कातरवेळ...
छान लिहिलं आहे.
सुरेख !
सुरेख !
धन्यवाद, मंडळी! दाद - तुला
धन्यवाद, मंडळी!
दाद - तुला प्रतिक्रिया द्यावी असं वाटलं, हेच खूप आहे माझ्यासाठी!
मस्त... << जे घडतं ते सगळं
मस्त...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<< जे घडतं ते सगळं आत, आपल्या मनात असतं.>> जियो !
बाकी सगळा लेखच छान. पहिल्या दोन परिच्छेदांमधील स्थिती अनेकदा अनुभवली आहे. त्यामुळे जास्त जवळचा वाटला लेख.