निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभा अगं बरेच लक्षात आहे कि तुझ्या! आंब्याचे तर किति विविध प्रकार? इकडे फक्त तीन चार प्रकार बास! एप्रील्-मे मधे आंबा पोळ्या, फणस पोळ्या (साठं) ! वा, वा काय दिवस होते ते!

आपल्याकडे विदर्भातले कुणी आहे का ? मी चारोळ्याचे झाड अजून बघितलेले नाही. ते पण आंब्याच्याच वर्गातले.
ती फळे खाऊन मग त्याच्या बियांची टरफले काढली कि आत चारोळी असते.
मी असे वाचले होते की, माकडे त्यांच्य बायका बाळंत व्हायच्या वेळी या चारोळ्या आणि डिंक एकत्र करुन त्याचे लाडू करतात. त्यांना या बिया फोडायची गरज नसते.

अस्वले पण पोळ्यातला मध आणि सुगंधी फूले एकत्र करुन भाकर्‍या करतात, व त्या वाळवून ठेवतात.
हे खरे नैसर्गिक स्वयंपाकी !!

माकडांचे लाडु माहीत नव्हते!

अस्वलाची मादि जेव्हा पिल्ल घालते. आणि नंतर पावसाळा येतो, तेव्हा पावसात पिल्लांसाठी अन्न आणायला बाहेर जाता येत नाही. म्हणुन मादि आधीच उन्हाळा असताना ठराविक फळ आणि मध भरपुर खाऊन येते. मग एखाद्या खडकावर ते खाल्लेलं सगळ ते छोट्या छोट्या गोल भाकर्‍यांच्या आकारात उलटते. दिवसा गरम दगडामुळे ते सुकतं. त्या अस्वलाच्या भाकर्‍या, या भाकर्‍या ती साठवुन गुहेत ठेवते. पावसात जेव्हा खायला इतर काही मिळत नाही तेव्हा पिल्लाला हे भरवते. संदर्भ - पाखरमाया , मारुती चितमपल्ली.
पाखरमाया मधला एक लेख या वेळच्या एका दिवाळी अंकात आलाय, कुठल्या ते नंतर बघुन सांगेन. त्या लेखातही हि माहिती आहे.

इतकी माहीती प्रथमच मिळ्तेय मला.. माझ्या घराजवळ एक इंग्लिश चिंचेचं झाड होतं...मस्त तुरट गोड चिंचा असतात त्या आणि रंग ही सुरेख गुलबट असतो आणि पावसाळ्यात शेताजवळच्या पाण्याच्या साठ्याजवळ अगदी छोटसं २-३ पानांचं गवत उगवलेलेलं असायचं, त्याला एक छोटासा कंद असायचा... त्याचं नाव मला अजुन्पर्यंत कधीच समजलं नाही पण सगळी चिल्लीपिल्लि जमा होउन एक एक गवत उपटत बसायची. मी अजूनही कधी पावसाळ्यात भारतात गेली की असले गवत उपटून बघते पण आजकाल सापडत नाही ते ...

दिपाली

माकडे त्यांच्य बायका बाळंत व्हायच्या वेळी या चारोळ्या आणि डिंक एकत्र करुन त्याचे लाडू करतात. त्यांना या बिया फोडायची गरज नसते.

अस्वले पण पोळ्यातला मध आणि सुगंधी फूले एकत्र करुन भाकर्‍या करतात, व त्या वाळवून ठेवतात.
हे खरे नैसर्गिक स्वयंपाकी !!

कित्ती छान !

सावली खुप छान माहीती. पाखरमाया पाहते मिळत का ते लायब्ररी मध्ये.
दिपाली, विलायती चिंचा अजुन खुप आहेत आमच्याकडे. ते कंद खणून काढावे लागायचे का दिपाली ? साधारण त्याला हळदी म्हणतात. वेल असतो ना तो ? पावसाळ्यात येतात हे कंद मी लहानपणी खुप खाल्लेत. अगदी लहान असताना एकदा भलत्याच झाडाचा कंद खाल्ला होता कोणालाही न दाखवता. आणि अशी खाज आली घशाला अजुन आठवत.

त्या बांबुच्या फुलाबावत मी वाचल आहे. कुठल्यातरी दंतकथेत किंवा पोथी मध्ये त्याच वर्णन आहे.

जागु मी ते अनेक वर्षापुर्वी वाचलेलं. पुस्तकाचं नाव पाखरमाया कि रानपाखरं ते बघ जरा.
चकवा चांदणं पुस्तक मिळाल तर तेहि वाच.
चकवा चांदणं म्हणजे घुबड !

लेखक - मारुती चितमपल्ली.

हा माणुस खरेच भाग्यवान. याला मुळात जंगलाची/झाडांची ओढ होती. आणि नोकरी लागली ती नेमकी वनपाल म्हणुन... असे भाग्य पाहिजे. अर्थात फिरती असल्याने त्यांना काय कमी त्रास झाला नाही पण निदान आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळाले हेही नसे थोडके. वनपाल म्हणुन काम करताना त्यांचे बॉस म्हणुन जे लोक यायचे त्यातल्या बहुतेकांना जंगलाची, निसर्गाची अजिबात आवड नसायची. ते कायम ह्या पोस्टींगकडे शिक्षा म्हणुन पाहायचे, आणि त्यामुळे कामाचे आणि पर्यायाने जंगलाचे खुप नुकसान व्हायचे असेही यांनी लिहुन ठेवलेय.

दिपाली,
त्या इंग्लिश चिंचेचं झाडाला माझ्या माहितीप्रमाणे 'विलायती चिंच' असही म्हणतात, हे झाड खरचं विशेष वाटलं मला, याचे देखील २-३ प्रकार मी पाहिले, त्यात एकामध्ये चिंच कच्ची असताना देखील खाल्ली तरी खुप गोड लागते, दुसरी ही पिकल्यावरच गोड लागते,त्यात काही चिंचेचा आतला गाभा लालभडक असतो.
मला तरी ही झाडे नदीकाठच्या गावापेक्षा कमी पाणी असणार्‍या, मुरुमाड जमीनीत खुप आढळली ..
आमच्याकडे तर याची मी ५० एक झाडे पाहिली,शाळेत असताना अनेक झाडे (चढुन) पालथी घातली

जाणकारांनी या बद्दल आणखी माहिती द्यावी.

अनिल आमच्याकडेही ह्या विलायती चिंचांची झाडे भरपुर दिसतात. जास्त तर समुद्रकिनारीच्या आजुबाजुला दिसतात.
साधना आज कामावर येता येताच मी विचार करत होते. की मीही काही प्रमाणात लकी आहे. कारण माझ ऑफिस डोंगरात आहे आणि भरपुर झाडी आहे इथे. ऑफिसच्या बाहेरच समुद्र दिसतो. अर्थात पोर्ट समुद्रभागातच येणार. त्यामुळे येता जाता चांगली करमणूक असते. थोडे पुढे जंगलही आहे. आणि हल्ली आपण निसर्गावर चर्चा करायला लागल्यापासुन गाडी चालवतानाही मी सरळ न पाहता माझी मान रस्त्याच्या दोन्ही बाजुला वळत असते झाड पाहण्यासाठी.

दिनेशदा, जागु,सावली
तुम्ही दिलेली माकडांबद्दल,अस्वलाबद्दलची माहिती एकदम अफलातुन, भन्नाट वाटली मला,ऐकावं ते नवलचं ! प्राण्यांना देखील किती कळतं ना !

अलिकडेच वाचलेली एक घटना एका मळ्यातल्या गोठ्याला रात्री आग लागल्यावर त्यातल्या एका बैलाने गळ्यातला दोर तोडुन घेऊन ,तिथुन पळत जाऊन ४ किलोमीटरवर असणार्‍या आपल्या मालकाच्या घरचा दरवाजा धडकवुन घरच्यांना जाग केलं
Happy

कारण माझ ऑफिस डोंगरात आहे आणि भरपुर झाडी आहे इथे. ऑफिसच्या बाहेरच समुद्र दिसतो.
जागु,
अस ऑफीस असल्यामुळं, तुम्ही खरच भाग्यवान आहत असं म्हणायला हवं !
निदान घर नाही ऑफीस जवळ तरी झाड असावीत ना !
Happy

लहानपणी आम्ही खूप चारोळ्या खाल्ल्यात. करवंदाएवढे ते हिरव्या रंगाचे बी असते. हे वरचे हिरवे कव्हर थोडेसे तुरट असते. ते खाल्ल्यावर आत टणक बी असते. ती फोडण्यासाठी प्रथम हातोडी व मग हातोटी लागते. ते बी बरोबर शिरेवर फोडयचे की आत मस्त पैकी चारोळी! त्यावेळी ह्या गोष्टींचे काय महत्त्व आहे ते कळतच नव्ह्ते.

चारोळ्याची झाडे कोकणातही आहेत. मी पाहिली नाहीत पण माझे शेजारी बियांसकट चारोळ्या आणायचे आणि आम्ही ते फोडुन खात बसायचो. प्रज्ञाशी सहमत... शिरेवर फोडले नाही तर चारोळीसकट बी जायबंदी व्हायची. आम्ही त्याच्याही कपच्या काढुन खायचो. Happy

आज मी शोभा१२३ च्या आधि चारोळ्यंचि थोडिशि माहिती दिली.

आज परत ठिय्या देऊन बसलो आणि जूने फोटो शोधून काढले.
इथली मंडळी जास्त माहिती देऊ शकतील

हि आहे निळी जास्वंद. अंबोलीच्या एका घराच्या अंगणात होती. हि सुंदर आहेच पण यापेक्षा वेगळी अशी सोनघंटा नावाची जास्वंद त्या परिसरात आढळते. मला ती अजून दिसली नाही कधी.

हा काय प्रकार आहे मला माहीत नाही. अंबोलीलाच, हिरण्यकेशीच्या रस्त्यावर दिसले होते.

ही फळे पण अंबोलीलाच, पूर्वी जिथे आयुर्वेदिक झाडांची बाग होती, तिथे दिसली होती. अगदी मौल्यवन रत्ने दिसताहेत कि नाही ? आत चिकट पारदर्शक रस होता.

हि पण रत्नेच की. ही फळे मला तिलारी घाटात मिळाली होती.

या सर्वांबद्दल कदाचित, साधना काही सांगू शकेल.

जागू, हि आहेत शिवण / गंभारीची फूले. याला हिरवी गोल फळे लागतात.

हि आहेत केसात माळायची करवंदे. चवीला ती नेहमीच्या करवंदासारखीच लागतात. पण सुंदर दिसतात म्हणून केसात माळतात.

हि आहे एक प्रकरची आमरी म्हणजेच ऑर्किड. हा फोटो डिचोलीचा आहे पण वसईच्या किल्ल्यात पण हि भरपूर दिसतात. पण हि दिसायला मात्र शोधक नजर पाहिजे. कारण ही उगवते झाडाच्या खोडावर. आमरी आणि बांडगूळ यात फरक आहे. आमरी बहुतेक वेळा झाडाच्या खोडाचा फक्त आधार हेते, ती झाडाचे शोषण करत नाही.

अरे हो, नाव काय आह माहितीय ? वाघरी.

हे झाड मला सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगरावर दिसले होते. काय आहे ते माहित नाही.

त्याच झाडाचा जरा झूम आउट करुन घेतलेला फोटो

हा प्रकार पण नरेंद्र डोंगरावरच दिसला होता.

आज मी वाचकाच्या भूमिकेत आहे. तेव्हा या झाडांबद्दल काही माहित असेल तर लिहा.

दिनेशदा, त्या दोन नंबरच्या फोटोत आहे ते झाड परवाच मी मरीन ड्राईव्हवरच्या बॅचलर्स आईस्क्रीमच्या दुकानाच्या ५ पावलं पुढे पाहिलं.

दिनेश तुम्ही दिलेली आंबोलीतली फुले/फळे अगदी तिलारी घाटातली सुद्धा मी पाहिलीत लहानपणापासुन. ते २ न. चे हिरण्यकेशीवर लहानपणापासुन पाहते. (गणपतीत माटीवर हे बांधतात.) पण कोणाला कधी विचारायची बुद्धी झाली नाही. आता मात्र तिथलेही डॉक्युमेंटेशन करायला घेते Happy गावी गेले की एकदा हा उद्योग करतेच. घरच्यांना खुप माहिती आहे.

नरेंद्र डोंगरावरचा प्रकार क्वचित इतरत्रही पाहिलाय.

हिरण्यकेशीला जिथे गाड्या थांबतात तिथे एक वेल आहे, तिथले लोक बेडकीचा पाला म्हणतात. त्याची पाने चुरडुन खाल्ली आणि वर साखर खाल्ली तर साखर अजिबात गोड लागत नाही. गोड सोडून इतर गोष्टींची चव मात्र कळते. गावातले लोक मधुमेहावर उपचार म्हणुन हा पाला वाळवुन खातात. थोडाफार प्रभावी असावा, कारण माझा काका घेत होता आणि त्याला बरेही वाटत होते. पण त्याने साखर न खायचे पथ्य मात्र पाळले नाही Sad मी हजारदा पाहिलीय ही वेल पण फोटो घ्यायचे सुचले नाही Sad

साधना, हे काम व्हायलाच पाहिजे. आपल्याकडे आता फोटोंची सोय आहे. झाडाचे कितीही वर्णन केले तरी फोटो बघितल्याशिवाय नीट कल्पना येत नाही.

मधुमेहावर उपचारी असा एक पाला मला पाचगणीला पण एकाने दाखवला होता. पण यात थोडा धोका आहे तो असा कि साखरेची चव लागत नसली तरी ती शरीरात जात असतेच.
मधुमेहावर सध्यातरि इन्सुलिन शिवाय उपाय नाही.
साखरेला पर्याय ठरतील पण ज्यात साखर नसेल अशा काही वनस्पती जरुर आहेत. सध्या स्टीव्हीया ची लागवड त्या दृष्टीने केली जातेय.

मामी, माधव आता बघण्यात कुठलेही नवीन झाड आले तर त्याचा फोटोच काढून ठेवायचा. मायबोलीच्या सर्व्हर वर लोड येत असेल, तर पिकासो अल्बम वापरता येईल. त्याची माहिती / नाव वगैरे सर्व मिळून शोधूच.

दिनेश सहमत. मी तरी हे काम हाती घेतलेय. झाडांची उपयुक्तता पटली तर त्यांना तोडणारे हातही क्षणभर थबकतील. आपण ज्या दृष्टीने झाडांकडे पाहतो ती दृष्टीही अनेकांना नसते. याचे कारण ते निर्दयी असतात हे नाही तर झाडेही आपल्यासारखेच हक्क असलेली एक सजीव आहे हेच माहित नसते.

दिनेश, नोवेंबरात आंबोलीच्या नानापाणी भागात मी मुद्दाम गेले होते. पण तिथल्या बायांनी असे कसलेही फुल तिथे नाही म्हणुन मला सांगितले. आत जंगलात जाऊन पाहण्याइतका वेळ नव्हता. पुढच्या वेळेस परत जाईन. घाट उतरताना एक ठिकाणी वळणावर पांढरा क्रॉस उभा केलेला दिसेल. तोच नानापाणी भाग म्हणुन मला सांगितले गेले. तुम्ही दुस-या कुठल्या भागाला या नावाने ओळखत असाल तर सांगा म्हणजे तिथे जाऊन पाहिन.

त्याच्या मागचे जंगल कुणीतरी विकत घेतले (हे कसे जमवतात माहित नाही, आम्हाला जंगलात जायलाही परवानगी मिळत नाही आणि यांना अख्खे जंगल विकत मिळते. आंबोलीहुन घाट सुरू होतो तिथेही कामत चेन ने जंगलात हॉटेल उभारले आहे) आणि तिथे रिसॉर्टची योजना आहे असे कानावर आलेय. Sad

दिनेशदा ती करवंदे आणि शिवणी ओळखीची आहेत माझ्या. शिवणी पिकल्यावर पिवळीधम्मक होतात मग ती सोलुन दगडावर घासायची आणि त्यातील बी फोडून खायची.

फोटोतल्या करवंदीचे झाड राणीबागेत आहे. नंदन कलबागांनी दाखवलेले. आता आपण गेलो की शोधुया परत.

आपली रोजची झाडे सोडल्यास इतर स्पेशलाइज्ड झाडे फुलांवर किंवा फळांवर आल्याशिवाय मला ओळखता येत नाहीत. Happy

दिनेशदा ती निळी जास्वंद माझ्या आईकडे आहे.
आमच्याकडे येते बांडगुळ त्याला लिलीच्या कळीप्रमाणे फुल येतात पण खुप छोटी लांबट. त्याला फळ येतात ती पिकल्यावर लालभडक होतात. पहिला डोळ्यांत टाकण्यासाठी ज्या छोट्या ट्युब यायच्या लाल अगदी तशीच ती फळे दिसतात.

साधना मी राणीच्या बागे खुप लहान असताना गेलेले आता आठवत पण नाही जास्त. माझे काका तिथे कुठल्यातरी पोस्टवर की संस्थेवर होते. मला नक्की माहीत नाही. ते आम्हाला झाडेही घेउन यायचे.

पुर्वी पिवळ्या रंगाची साधारण ओल्या खजुरापेक्षा जरा लहानच असणारी फळं मिळायची. आम्ही त्याला अहमदाबादी मेवा म्हणायचो. चव खुप गोडही नसे पण वेगळीच होती. ती हल्ली बाजारात दिसत नाहीत.

सॉरी, मला अहमदाबादी मेवाच म्हणायचं होत... घाईघाईत लिहिताना काहीतरी वेगळच लिहिलं. बदल केला आहे. धन्स दिनेशदा!

मामी तो अहमदाबादी मेवा. अजून असतो बाजारात पण फार नाही. मला त्याची चव साधारण चिकूसारखी वाटते.

जागू बांडगूळाचे अनेक प्रकार आहेत. आता त्याला फूले दिसली, कि नक्की फोटो काढायचा. यातही फूलांचे अनेक प्रकार आहेत. त्यांच्या बियांचा प्रसार हवेमार्फतच होतो.

पण या बाबतीत सर्वच झाडे उदार नसतात. सर्वात मोठ्या मनाचे ते आंब्याचे, त्याचे खोड इतके खडबडीत असते, कि त्यावर सहज बांडगुळे रुजतात. माडाचे / नारळाचे झाड मात्र अगदी कठोर. त्याच्या खोडावर बांडगूळे रुजूच शकत नाहीत (अपवाद एक प्रकारचे अळू ).

साधना,
मला वाटते फ्लॉव्हर्स ऑफ सह्याद्री च्या पहिल्या भागावरच्या मुखपृष्ठावर सोनघंटेचा फोटो आहे. याचे रुप जास्वंदीसारखेच पण पाच पाकळ्या सुट्या असतात. पाकळ्या मूळाशी गर्द निळ्या आणि पुढे सोनेरी रंगाच्या होत जातात.
आता तूझ्या मंडळीकडूनच आशा आहे. मी जंग जंग पछाडले पण मला ते बघायला मिळाले नाही. अंबोली ही जागा भौगोलिक दृष्ट्या एकमेव आहे. काहि काहि फूलांच्या प्रजाती केवळ तिथेच दिसू शकतात. तशीच जागा कासचे पठार ही आहे.

Pages