सोबत
Submitted by Abhishek Sawant on 15 April, 2016 - 10:39
'लिंब इजंला धार्जिणा असतो' या वाक्याने एकेकाळी मनावर गारूड केलेलं. साहित्य आणि साहित्यप्रकारांतलं फारसं काही कळत नसण्याच्या काळात अभ्यासाच्या पुस्तकांत कथा कादंबर्यांची पुस्तकं ठेऊन गुपचूप वाचायचो, शिवाय आधीच्या इयत्तेत असताना थेट बारावीपर्यंतची मराठीची पुस्तकं आसुसल्यागत वाचायचो, तेव्हा. पुढे हे वाक्य 'संदर्भासहित स्पष्टीकरण द्या'मध्ये प्रश्नस्वरूपात आलं तेव्हाही परीक्षकांना कंटाळा येईस्तोवर त्यावर लिहिलं जायचं. आता अभ्यासक्रम संपला, आणि परीक्षाही. पण शंकर पाटलांच्या लक्षात राहून गेलेल्या अनेक वाक्या-वाक्प्रचारा-शब्दप्रयोगांसारखंच हे चार शब्दांचं वाक्य जे मनात कोरलं गेलं, ते कायमचं.