वातावरण सगळे उन्हात होरपळून गेलेले... घामाच्या धारांनी अभिषेक सुरु झालेला मग दिवस असो वा रात्र... हवेचा मागमूस नाही... गेल्या तीन -चार महिन्यात ट्रेक नाही... अश्यातच सरत्या मे महिन्यात 'खांदेरी' ट्रेक ने साद घातली.. नेहमीचा कंपु तयार झाला.. अगदी बच्चेकंपनीसकट.. छोटा-मोठा इंद्रा, छोटा-मोठा भीडे, आमचा मुकादम - गिरी, रो.मा आणि नविन... आमच्यातला सुन्या मात्र नोकरीशी प्रामाणिक राहुन गैरहजर राहीला.. कंपुत दोन पाहुणे.. एक छोटा-मोठा संत्या नि दुसरी मायबोलीकर सेलिब्रेटी म्हणजे कांदबरी.. च्च सॉरी.. नंदिनी ! मान पाहुण्यांचा म्हणून खाण्याची तजवीज करुन येणे आधीच बजावलेले...
सध्या ऊन वाढायला लागलंय. गडमाथ्यांवरचे आणि आडवाटांवरचे पाणीसाठेही आटायला लागलेत. सकाळी दहा-अकराच्या उन्हात टेकडी जरी चढायची म्हटलं तर शरीर घामेजायला लागलंय आणि घसा कोरडा पडायला लागलाय. 'जलदुर्ग' हा अशा वातावरणात हौस भागवणारा पर्याय असू शकतो.
बर्याच वर्षांपूर्वी समीर कर्वेंचा खांदेरी दुर्गावरील मटा मधला लेख आणि फोटो पाहून खांदेरी-उंदेरीसाठी तगमग बराच काळ सुरु होती. तीनेक वर्षांपूर्वी चक्रम हायकर्सच्या विनय आणि आशुतोषने सहसा न होणार्या सागरी दुर्गांच्या सफरीचा घाट घातला. खांदेरी- उंदेरी- सुवर्णदुर्ग- पद्मदुर्ग हे ४ दुर्ग तर 'करायचेच' कॅटेगरीत होते. या सर्व किल्ल्यांवर जाण्यासाठी सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट जमवावी लागणार होती ती म्हणजे परवानगी आणि स्थानिक नावाड्यांशी संपर्क. हे काम विनयने इतर सोबत्यांच्या मदतीने उत्तमपैकी हाताळलं.