असलेल्या नसलेल्या सरणाच्या वाटा
भेदरलेल्या सगळ्या मरणाच्या वाटा
या मुखकमलावर किरण निजावे सारे
का ठाऊक मला या तिमिराच्या वाटा
शुभ्र असो चांडाळ जरी त्रिकोणाचा
नाही धरल्या उलट्या रोगाच्या वाटा
चाचपडत सापडली ती रेषा काळी
विरलेल्या होत्या पाषाणाच्या वाटा
आता साग्र संगीत उश्याला घेऊ
कुठवर नेऊ एकट्या जगण्याच्या वाटा
(शुभ गंगा वृत्त - गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा )
वाटा
वाटावाटा वळत राहती पावलांसवे पळत राहती
सार्वभौम या अस्तित्वाचे अर्थ नवनवे कळत राहती
या वाटांवर हरवत जावे दूरदूरवर मिरवत जावे
मुक्कामाला क्षितिजापाशी जायचे कसे ठरवत जावे
वाटावाटा वळत राहती सहनशक्तिचा अंत पाहती
स्थानबद्ध जी गृहसीमेतच त्या प्रतिभेला स्वैर बाहती
या वाटांना व्यथा कथाव्या दूरदूर त्या त्यांनी न्याव्या
सर्व कहाण्या सर्व विराण्या वाऱ्यासंगे विहरत जाव्या
वाटावाटा वळत राहती सुखस्वप्नांना छळत राहती
स्थिरावलेल्या संथ भुईला डंख नभाचे मिळत राहती
या वाटांना शोधत जावे पहाटवेळी नि चांदराती
दिगंतराच्या भ्रमंतीमध्ये ऋतुचक्राचे आरे फिरती..