पहील्या भागात मला माझ्या भटकंती दरम्यान भेटलेल्या माणसांविषयी, दिसलेल्या गावांविषयी, सह्याद्री विषयी लिहीले. या भागात अजून काही शब्दचित्रे:
पहील्या भागाची ही लिंक
----------------
शब्दचित्र चौथे: संतोष जंगम - मु. पो. चकदेव पर्वत किवा वळवण गाव किंवा पुणे किंवा मुंबई किंवा कुठेही
कलावंतीण सुळका व किल्ले प्रबळगड
"आपल्यातलं कुणी आधी गेलेलं नाही, रात्रीची वेळ, रस्ता माहीत नाही, आपल्याकडे काही सामान नाही, कसं काय जमणार राव?" विकास ने सगळ्यांच्याच डोक्यात असलेला प्रश्न विचारला.
"काय नाय रे, सरळ निघायचं. कात्रज बोगद्यापासून कुठूनतरी चढतात. आणि थोडं वर गेल्याव सिंहगडावच्या टावरची लाल लाईट दिसली की चालत सुटायचं.
आणि गड्यासारखे गडी आपण चौघं... काय होत नसतय. लोकं किती वेळा जातात...
आणि सामान लागून लागून काय लागतं रे? पायात बूट आणि पाठीवर पाण्याच्या बाटल्या घेतल्या की झालं काम!"