माणूस जितका जुना असेल तितकीच जुनी बहुतेक घर सजवण्याची कला..! राहायला घर हवं, याचं भान आलं तसंच पुढे ते छान हवं, सुंदर हवं वगैरे याचंही हळुहळू आलं असेल. लाखो वर्षे गेली, नि उत्क्रांतीसोबतच या गृहसजावटीच्या कलेतही क्रांतीकारक बदल झाले. आजही घर आणि सजावट हा विषय सामान्याच्या जवळचा, जिव्हाळ्याचा. घर सजवून देणार्या लोकांशी जिव्हाळ्याचं नातं तयार होईल असा. ही कला सहजसाध्य, सोपी असेल असं कधी वाटतं, तर कधी तिच्या वेगवेगळ्या अविष्कारांमधून, साक्षात्कारांमधून थक्क व्हायला होतं. कल्पनाशक्तीला आणि बुद्धीला आव्हान देणारी ही कला नवनवीन तंत्राला, तंत्रज्ञानाला आणि बदलांना सहज सामोरं जाते.
आपल्याला एखादी छोटी मोठी कल्पना अचानक खूप रोमांचकारी वाटते, यात काहीतरी प्रचंड काम होऊ शकेल असं जाणवत राहतं, पण थोडंसं पुढे गेल्यावर लक्षात येतं, की या गोष्टीत आपण सोडून कुणालाच रस नाही, किंवा एकुणच यात काही राम नाही. व्यवसाय-धंदा करायला निघालेल्या लोकांबाबत असं अनेक वेळेला घडलेलं आपण पाहिलं आहे. पण त्याचबरोबर अनेक वेळेला हेही बघितलं आहे, की एखाद्याला एखादी छोटी गोष्ट करून बघायची तीव्र इच्छा होते, मग तो अनेक जणांचा विरोध सहन करून किंवा प्रसंगी झुगारून त्याला पाहिजे ते करत राहतो, आणि एखाद्या दशकानंतर त्या हौसेखातर करून बघितलेल्या गोष्टीचं एखाद्या साम्राज्यात रूपांतर होतं!
नियतकालिकांची सतत बदलती धोरणं, ग्राहकांच्या सारख्या वाढत असलेल्या अपेक्षा, जागतिकीकरण आणि स्पर्धा, व्यावसायिकता आणि मित्रत्वाचे संबंध यांचा सतत घालावा लागणारा मेळ, पैसे थकण्याचं वाढतं प्रमाण.. ही न संपणारी यादी आहे सध्याच्या कुठल्याही जाहिरात संस्थेच्या, एजन्सीच्या दुखण्यांची. छोट्या-मोठ्या, नव्या-जुन्या अशा सार्याच कंपन्यांना कमीजास्त प्रमाणात भेडसावणार्या या समस्या. खरंतर अशा प्रश्नांचा हात धरतच कुठलीही व्यावसायिक संस्था वाढते, बहरते, पुढे जाते. तरीही या प्रश्नांचं संधीमध्ये रूपांतर करत ग्राहकांशी आणि समाजाशी असलेली बांधिलकीही जपणारे विरळाच.
वर्षाविहार(२४ जुलै २०११)- फार्मलाईफ इथे वविकरांसमोर व्यक्त केलेलं मनोगत
***
नमस्कार मित्रांनो.