वर्षाविहार(२४ जुलै २०११)- फार्मलाईफ इथे वविकरांसमोर व्यक्त केलेलं मनोगत
***
नमस्कार मित्रांनो.
इंटरनेटवर कधीतरी काहीतरी शोधता शोधता अचानक आपल्याला मायबोली.कॉम हा फोरम सापडतो. मग इथलं हितगुज, गुलमोहर, गप्पा आणि भांडणं वाचता वाचता आपणही इथं कधी लिहायला लागतो, तेच कळत नाही. आणखी थोडा काळ गेला, की एक दिवस कळतं- ही जागा आता आपल्या आयुष्यातली अविभाज्य घटक झाली आहे. मग इथे आल्याशिवाय आपला दिवस उगवला, मावळला- असं क्वचितच होतं. इथेच कधीतरी हरवलेलं मैत्र सापडतं, कधीतरी सोडून दिलेलं लिखाण पुन्हा आपलं बोट धरतं, जगण्याच्या रहाटगाडग्यात 'आपण भले की आपले भले' हा शिरस्ता स्वीकारलेल्या आपल्याला मुद्देसूद किंवा मुद्द्यांविनाच भांडण्याची ऊर्मी देते. रोजच्या कामातून वेळ काढून गणेशोत्सव, दिवाळी अंक आणि अनेक सामाजिक उपक्रमांत हिरीरीने भाग घेतला जातो. मते जुळलेल्या मायबोलीकरांना भेटण्यासाठी आवर्जून गेट-टुगेदर आयोजित केले जातात. वविसारख्या ठिकाणी गळाभेटी होतात.
हे सारं वातावरण आपल्याला आपल्या वाईट मनस्थितीत बळ देतं, आपल्या अनेक मानसिक गरजा भागवतं. पण आपल्याला नवे भान देणारा आणि रात्रंदिवस अव्याहत चालणारा हा मायबोलीचा गाडा कोण कसा कुणाच्या पैशाने चालवतो, याचा विचार आपण फारच क्वचित करतो. कुणीतरी अॅडमिन आहेत, कुणीतरी वेबमास्तर आहेत. शिवाय मदत समिती आहे, निरनिराळ्या कार्यक्रमांच्या उपक्रमांच्या संयोजन समित्या आहेत- एवढंच बहुधा आपल्याला माहिती असतं.
मायबोलीच्या प्रेमापोटी अनेक संयोजक मायबोलीसाठी स्वेच्छेने काम करत असले, तरी अनंत विषयांवरची हजारो पेजेस असलेल्या या फोरमच्या सर्व्हरचा, साईट मॅनेजमेंटचा खर्च असतो. तो खर्च मुख्यत्वे इथल्या खरेदी विभाग- ईकॉमर्स (ज्यात पुस्तके, सीडीज इत्यादी विकायला ठेवली जातात) आणि जाहिरातींतून भरून काढावा लागतो.
या विषयावर वविच्या निमित्ताने आपल्याशी हितगुज साधण्याची सूचना मायबोली प्रशासनाकडून आली, म्हणून हा प्रपंच. वविसंयोजकांनी मला ही संधी इथे दिली, त्याबद्दल आभार.
मायबोली सुरू झाली, त्यानंतर अनेक वर्षे संस्थापकांनी खिशातून पैसे टाकून तिला जगवली, वाढवली. गेल्या काही वर्षांपासून मायबोली स्वतःच्या पायांवर उभी असली, तरी इथले सभासद वाढत आहेत, त्याच प्रमाणात कंटेंटही वाढत आहे, शिवाय अनेक नव्या पद्धती-तंत्रज्ञान आत्मसात करून त्यांचा उपयोग, अवलंब इथे करावा लागतो आहे. काळासोबत जायचे असेल, तर 'कसातरी चरितार्थ चालवणे' याच्यापलीकडे जावे लागणार आहे, आणि ऑनलाईन जाहिरातींचे जगभरात वाढते प्रस्थ पाहिल्यावर यापुढे 'जाहिराती' हेच मायबोलीसाठी उत्पन्नाचे (आणि म्हणूनच प्रगतीचे) साधन बनणार आहे यात शंका नाही.
जाहिरातींसाठी स्वतःचे असे नेटवर्क मायबोलीने तयार केले आहे, त्यावर सतत कामही चालू आहे. ज्या मायबोलीने आपल्याला काहीतरी दिलेय, तिचे सभासद म्हणून आपणही याबाबतीत थोडेसे काहीतरी करू शकलो तर?
सर्वात आधी- 'छोट्या जाहिराती' विभाग. या वर्षापासूनच हा विभाग नव्या स्वरूपात मायबोलीवर आला आहे. खरे तर हा विभाग सध्या तरी मायबोलीसाठी उत्पन्नाचे साधन नाही. छोट्या जाहिरातींचेही दरपत्रक अर्थात आहेच, पण ते बाजूला ठेऊन यावर्षी तरी ही सेवा मायबोलीकरांसाठी मोफत देण्याचे मायबोलीने ठरवले आहे. मायबोलीचाच लॉगिन आयडी वापरून तुम्ही इथे स्वतःच्या जाहिराती टाकू शकता. त्यासाठी विषयानुसार इथे मालमत्ता, नोकरी, विवाह, आरोग्य, विज्ञान-तंत्रज्ञान-मशिनरी असे अनेक विभाग आहेत. एकाच वेळी अनेक विषयांवरच्या अनेक जाहिराती तुम्ही इथे एकाच वेळी टाकू शकता. या छोट्या जाहिराती वाचण्यातून, टाकण्यातून अर्थातच फायदा झाल्याचा अनेक मायबोलीकरांचा अनुभव आहे.
जाहिरातींचा दुसरा प्रकार म्हणजे- 'बॅनर अॅडव्हर्टाईझमेंट्स'. म्हणजे सर्वात वरती मायबोली लोगोच्या उजव्या बाजूला दिसणारे रूंद आयताकृती किंवा पानावरच्या मुख्य कंटेंटच्या उजव्या बाजूला, (उजव्या पेनमध्ये) साधारण चौकोनी आकारात दिसणारे अॅनिमेटेड किंवा स्थिर चित्र.
याठिकाणी आतापर्यंत गुगल अॅड्स कडून रूट होणार्या विविध ब्रँड्सच्या जाहिराती दिसत होत्या, त्यात भर म्हणून आता अनेक क्षेत्रांतल्या रिटेल आणि लोकल कंपन्यांच्या, छोट्या मोठ्या उद्योगांच्या जाहिराती दिसत आहेत. आपण अनेक बाफ जितक्या उत्सुकतेने चाळतो, तितक्या गांभीर्याने या जाहिराती बघितल्या, तर लक्षात येईल की एका क्लिकसरशी आपल्या अनेक गरजा भागण्याची इथे शक्यता आहे. नीट विचार केला, तर पुण्यामुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या उद्योजकांच्या जाहिराती जितक्या जास्त वाढतील, तितकी त्या जाहिरातींची आपल्या दृष्टीने उपयोगिता वाढेल, मग त्या बघणार्यांची संख्या वाढेल, आणि ही संख्या वाढली- त्याच प्रमाणात हे जाहिरातदारही पुन्हा वाढतील- असे हे चक्र आहे. आपण, म्हणजे इथले सारे सभासद वाचक 'एक ग्राहक' या नात्याने सदैव चांगल्या वस्तू किंवा सेवांच्या शोधात असतो- हे लक्षात घेतले, तर समजायला सोपे होईल.
एक ग्राहक म्हणून या जाहिराती सजगपणे बघणे आहेच, पण त्याहीपुढे या सार्या चक्राला गती देण्यासाठी एक मायबोलीकर म्हणून आपण काय करू शकतो? आपल्या आजूबाजूला अनेक छोटे मोठे उद्योजक असतात, आणि एंड युजरपर्यंत पोचवणार्या परिणामकारक जाहिरात माध्यमाच्याही ते शोधात असतात. अशांना आपण मायबोलीची सर्वसाधारण माहिती देऊन इथल्या जाहिरातींचा पर्याय सुचवू शकतो. त्यांनी प्राथमिक तयारी दाखवली, तर त्यांची माहिती प्रशासनाला दिली तर इथला जाहिरात विभाग पुढचे काम करेल. एखाद्या उद्योजकाला अपील होईल, असे मायबोलीबद्दल नक्की काय सांगायचे आणि जाहिरातींचे रेट्स आणि इतर गोष्टींबद्दल काही माहिती हवी असेल, तर कृपया आम्हाला कळवा / विचारा.
उद्योजक मुलाखतीही आपण गेल्या काही दिवसांपासून सुरू केल्या आहेत (उद्योजक आपल्या भेटीला). मराठी उद्योजक या ग्रुपात असूनही त्या सार्वजनिक आहेत. आपल्याला त्या त्या उद्योजकाकडून जास्तीत जास्त आणि उपयुक्त माहिती मिळावी यासाठी 'जास्त इंटरअॅक्टिव्ह' असे त्यांचे स्वरूप ठेवले आहे. त्यांना प्रतिसादही चांगला मिळतो आहे. मायबोलीकरांनी उत्सुकतेने त्यांना पडणारे प्रश्न विचारले, आणि त्यांची उत्तरेही त्या त्या उद्योजकांनी दिली, हे आपण पाहिलेच आहे. आता अर्थातच यांतून मायबोलीला उत्पन्न मिळत नाही, या मुलाखतींचा आणि जाहिरातींचा थेट संबंधही नाही. कारण ज्यांची मुलाखत आहे, त्यांनी अजून जाहिराती दिल्या नाहीत, आणि ज्यांच्या जाहिराती आहेत/होत्या, त्यांनी मुलाखती दिल्या नाहीत, किंवा आपण घेतल्या नाहीत- अशीही उदाहरणे आहेत. पण इथे उद्योजकांना या फोरमबद्दल विश्वास वाटेल तसेच उद्योजक आणि आपण एंडयुजर मायबोलीकर- म्हणजे ग्राहक- या दोघांनाही 'विन-विन सिच्युएशन' वाटेल- असे वातावरण या मुलाखतींमधून निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तुमच्याही आजूबाजूला एखाद्या मराठी उद्योजकाने कष्टाने उभ्या केलेल्या व्यवसायाची सक्सेसस्टोरी दिसत असेल, तर जरूर आम्हाला सांगा.
अपॉईंटमेंट्स, म्हणजे नोकरीविषयक जाहिरातींना इथे चांगला प्रतिसाद असतो. मायबोलीकरांपैकी अनेक जण आयटी आणि इतर सेक्टरमध्ये काम करतात. आपापल्या कंपनीतल्या एचआर विभागाला मायबोलीवरच्या जाहिरातींचा पर्याय तुम्ही सुचवू शकता.
जाहिरातींव्यतिरिक्त विचार केला, तर ई-कॉमर्सचाही अत्यंत परिणामकारक पद्धतीने उपयोग आपल्याला करून घेता येईल, आणि त्याद्वारे मायबोलीला मदतही करता येईल. तुम्ही आपापल्या एचआर सेक्शनला 'मायबोली गिफ्टकार्ड्स'बद्दलही सुचवू शकता. प्रत्येक कंपनीत जी एक 'इन्सेन्टिव्ह' सिस्टिम असते, त्याला इथल्या गिफ्टकार्ड्स किंवा गिफ्ट व्हौचर्स हा एक छान पर्याय ठरू शकतो, असे वाटते. यातून खरेदी विभागातल्या पुस्तके-सीडी व इतर काही गोष्टी आपल्याला देता, घेता येतील. व्यक्तिगतरीत्या भेटवस्तू देण्यासाठीही याचा छान उपयोग आपण करू शकतो.
मायबोलीने देणगी स्वरूपातली मदत मिळूनही आजवर घेतलेली नाही. उलट वेळोवेळी सामाजिक उपक्रमांना जागा आणि महत्व देऊन, तसेच मायबोली पुरस्कृत उपक्रमांतून अनेक सामाजिक संस्थांना आणि आर्थकदृष्ट्या दुर्बलांना मायबोलीकरांकडून मदत होईल, असे बघितले आहे. हे असेच चालू राहायचे असेल, तर मुळात मायबोली टिकायला हवी, वाढायला हवी, इतकेच नव्हे तर आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायला हवी- इतकी जाणीव मायबोलीवर वावरताना सतत आपण ठेवली, तरी या प्रपंच चालवण्यातला खारीचा वाटा आपण स्वतः उचलण्यातले मोठे समाधान मिळेल, असं मला वाटतं.
धन्यवाद.
लेखाला अनुमोदन.
लेखाला अनुमोदन.
काही प्रश्न, सूचना असतील तर
काही प्रश्न, सूचना असतील तर कृपया इथे प्रतिसादांत लिहा.
काल वविला ज्यांनी प्रश्न विचारले होते, त्यांनी ते कृपया इथे लिहा, म्हणजे उत्तरेही लिहिता येतील. सर्वच मायबोलीकरांसाठी लिखित स्वरूपातली माहिती- म्हणून त्याचा उपयोग होऊ शकेल.
आभार.
अनुमोदन. कमर्शिअल विचार देखील
अनुमोदन. कमर्शिअल विचार देखील व्हायलाच हवा. कल्पनाही छान सुचवल्यात. मायबोलीकरांनी बनवलेल्या वस्तुंचं, फोटोग्राफीचं, विविध कलाकृतींच प्रदर्शनही भरवता येईल.
रच्याकने, प्रश्न विचारण्याची मुभा आहेच तर एक व्यावहारीक प्रश्न.
सध्या मायबोलीचा वार्षिक जमाखर्च काय असावा? आणि वर सुचवलेल्या सगळ्या कल्पना आमलात आणून जेव्हा मायबोली आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल तेव्हा प्रश्नांवर कितीपत विचार करता येईल?
चांगला लेख आहे. जाहिरातीचा
चांगला लेख आहे. जाहिरातीचा मुद्दा समजून घेतोय.
एक सूचना कराविशी वाटते. प्रत्येक अकाऊंटसाठी काही सदस्य फी का नाही ठेवता येणार ? मला वाटतं त्यात गैर काहीच नसावं. कदाचित या विषयावर आधीच चर्चा झालेली असल्यास दुर्लक्ष करावे. पंण माझ्यासारख्यांना सहज करता येण्यासारखं आहे असं वाटतं
साजिरा, ह्या लेखाद्वारे
साजिरा, ह्या लेखाद्वारे मायबोलीवरील जाहिरातींबद्दलचं आवाहन / माहिती जास्त चांगल्या रितीने आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. ई-कॉमर्सबद्दल नक्कीच प्राधान्याने विचार करेन.
साजिरा खुप चांगली माहीती
साजिरा खुप चांगली माहीती दिलीत. मला खुप दिवसांपासुन वाटत होत की मायबोलीसाठी काहीतरी करावे.
मला पुस्तक खरेदी बद्दल अधिक माहीती हवी. आम्ही इनरव्हिल ग्रुप तर्फे एका म्युनसिपाल्टी शाळेला लायब्ररी चालु करुन देणार आहोत. शाळा १ली ते ७वी मराठी मिडीयमची आहे. त्यासाठी मला पुस्तके कशी खरेदी करता येतील ह्याचे प्लिज मार्गदर्शन करा.
धन्यवाद साजिरा. तू छानच
धन्यवाद साजिरा. तू छानच लिहीले आहेस.
बरेच काही म्हणायचे आहे, पण म्हणावे की नाही या संभ्रमात आहे. कदाचित हा योग्य प्लॅटफॉर्म ठरणार नाही. गैरसमजही व्हायला नको. असो.
तात्पुरते मी काय करायला हवे यावर विचार करते. तो याआधीच का नाही केला असेही वाटुन गेले.
अनुमोदन !
अनुमोदन !
वा! छान मांडलंस साजिर्या!
वा! छान मांडलंस साजिर्या! ज्यांना मायबोलीवरच्या जाहीरातींचा उपयोग झालाय त्यांनी तो इथे शेअर केला तर कुणालाही इथल्या जाहीरात विभागाचा पर्याय सुचवताना हे अनुभव सांगायला उपयोगी पडतील असं वाटतंय. तसेच मायबोलीवरुन काही चांगली ऑफर मिळाली (डीस्काउंट ऑफर प्रकारातली) तर त्यामुळे विक्री वाढून त्यातूनही उत्पन्न वाढू शकेल. उदाहरणच द्यायचं झालं तर स्नॅपडील सारख्या प्रकाराचं देता येईल. अशा काही वस्तू / सेवा ज्या मायबोलीवर येणारे सदस्य वापरतात आणि त्यांना मायबोलीतर्फे आल्याचा फायदाही होईल.
साजिर्या, उत्तम लिहिलं
साजिर्या,
उत्तम लिहिलं आहेस.
जागू,
http://kharedi.maayboli.com/shop/home.php हा मायबोलीचा खरेदी विभाग आहे. यात मायबोलीवर उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी आहे. http://kharedi.maayboli.com/shop/manufacturers.php इथे प्रकाशकांची यादी आहे. या ठिकाणी असलेल्या पुस्तकांव्यतिरिक्त जर पुस्तकं हवी असतील, तर कृपया प्रशासकांना संपर्कातून कळव. तुला हवी असलेली पुस्तकं मायबोलीवर लवकरात लवकर उपलब्ध करून दिली जातील. मायबोलीवरून अनेकांनी आजवर पुस्तकं विकत घेतली आहेत, आणि त्यांना चांगले अनुभव आले आहेत.
धन्यवाद चिनुक्स.
धन्यवाद चिनुक्स.
मला हा प्रश्न नेहमी पडत आला
मला हा प्रश्न नेहमी पडत आला आहे. मायबोलीची ब्रँड इक्विटी इतकी सॉलिड व मोठी आहे कि ह्या साइटची ओनरशिप ज्यांच्याकडे आहे त्यांनी लि. कंपनी स्थापन करून शेअर्स सभासदांना विकल्यास कॉर्पस फंड तयार होइल. नक्की कसे करायचे ते मला माहित नाही. मी मायबोलीचे शेअर्स विकत घेण्यास लगेच तयार आहे.
ह्या व्यतिरिक्त जाहिरातींचा मुद्दा पटला. त्यावर काम केले पाहिजे. इतरही काही उत्पादने ह्या विभागात ठेवता येतील का? जसे जोशी मसाले यांची उत्पादने/ कालनिर्णय इत्यादी? ते तपासून घेतले पाहिजे.
जगात कुठेतरी किंवा अनेक ठिकाणी मायबोली कॅफे सारखे ठिकाण उघडून तिथे माबोकरांची बनविलेली उत्पादने विक्रीस ठेवता येतील. साइट टू फिजिकल ऑफलाइन प्रेझेन्स कसा निर्माण करायचा ते सल्लागारांकडून समजून घेतले पाहिजे. हे कॅफे म्हणजे अगदी स्वप्न आहे माझे. ह्या कॅफेचे फ्रांचाइस त्या त्या देशातील शहरातील माबोकरांना देता येतील. ( फी घेऊन. ) मला द्या.
छान लिहिलं आहेस साजिर्या...
छान लिहिलं आहेस साजिर्या... ह्या गिफ्टकार्डांबद्दल माहिती नव्हती. आता यापुढे उपयोग करता येईल.
जाहिरातीच्या मुद्द्याबाबत मला
जाहिरातीच्या मुद्द्याबाबत मला असे सांगावेसे वाटते, कि या जाहिरातांना मिळालेल्या प्रतिसादावर / किंवा त्यातून झालेल्या व्यवहारावर मायबोलीने दर आकारावेत. हा मुद्दा थोडा आणखी स्पष्ट करतो.
पैसे देऊन जाहिरात द्या, असे सांगायला गेले तर उत्पादक / विक्रेते थोडे कचरतात. पण तूमच्या सेवेबद्दल / उत्पादनाबद्दल आमच्याकडे माहिती द्या. (हि विनामूल्य असावी.) आणि आमच्याकडे चैकशी आली तर ती तूमच्यापर्यंत पोहोचवू, असे मायबोलीने सांगावे. हि सेवा मात्र मोफत नसावी. प्रयोग म्हणून अशी सुरवात करता येईल.
गणेशोत्सवातल्या विभागांसाठी पण प्रायोजक मिळवता येतील.
छान लिहिलं आहेस .
छान लिहिलं आहेस .
छान लिहिलं आहेस .
छान लिहिलं आहेस .
छान लिहिलं आहे. मायबोलीवर
छान लिहिलं आहे.
मायबोलीवर प्रसिद्ध होणारं ( सिलेक्टेड ) लिखाण व्यवस्थित संपादित करुन लिखित पुस्तक स्वरुपात प्रकाशित करता येईल. आणि मायबोली हा एक प्रकाशन ब्रँड म्हणुन पुढे आणता येईल.
मायबोलीचा दिवाळी अंक किंवा तशा प्रकारे संपादन केलेला अंक हा सिडी / डिव्हीडी स्वरुपात आणुन एक वेगळ्या प्रकारच्या अंकाच्या प्रकाशनाचा पायंडा पाडता येईल. (सध्या बहुतेक कविता महाजनांच एक पुस्तक अशा प्रकारे प्रकाशित होतय / झालय असे वाचलेले आठवते )
मायबोलीवरचे लिखाण ऑडीयो बुक्स म्हणुन प्रकाशित करता येईल.
इथल्या अनेक उत्कृष्ठ रेसिप्याचे रेसिपी बुक संकलन करता येईल.
आपल्या रोजच्या जीवनाला
आपल्या रोजच्या जीवनाला कांहीसं अर्थपूर्ण करणार्या मायबोलीची सेवा आपण विनामूल्य वापरतो हे मलाही खूप खटकतं, विशेषतः कुणीतरी त्याकरता खस्ता काढतंय व आर्थिक झळही सोसत असावं ह्या जाणीवेनं. आत्ता तरी मला कांही भरीव सूचना करता येत नाहीय पण << प्रत्येक अकाऊंटसाठी काही सदस्य फी का नाही ठेवता येणार ? >> हा सोनावणेजी यांचा विचार माझ्याही मनात आला. निदान, स्वेच्छेने माझ्यासारख्याना स्वतःला सहज पेलवेल असा आर्थिक हातभार आनंदाने लावता आला, तर त्याकरता कांही सुटसूटीत मार्ग आहे का ?
तुझे विचार पटले आहेत साजिरा.
तुझे विचार पटले आहेत साजिरा. जसे जमेल तसे मदत करणे मलादेखील आवडेल.
साजिरा, उत्तम विचार. एक
साजिरा, उत्तम विचार. एक वेगळीच कल्पना. यावर सविस्तर लिहिनच.
साजिरा... खुप चांगली
साजिरा... खुप चांगली माहिती....
मायबोली गिफ्टकार्ड द्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. पण इथे भारतात ती वापरली गेल्यास त्यावर शिपिंग चार्जेस लागतील व असलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीला ती विकत घ्यावी लागतील. त्यावर काही तोडगा काढता आला तर पहा ही विनंती.
कंपनी रजिस्टर केल्यास
कंपनी रजिस्टर केल्यास तुम्हाला डिपॉझिट्स घेता येतील की. चांगले रिटर्न्स मिळत असतील तर फंड्स ठेवता येतील त्यात. येथील ट्रॅफिक बघितल्यास उत्तम कंपन्या नक्की जाहिराती देतील जसे एल आय सी, वेस्टर्न युनिअन मनी ट्रान्स्फर इत्यादी.
साजिरा, तू जाहिरातींसाठीचं
साजिरा, तू जाहिरातींसाठीचं रेटकार्ड इथे टाकणार होतास ना...... वाट पाहतोय.
मायबोलीवर प्रसिद्ध होणारं (
मायबोलीवर प्रसिद्ध होणारं ( सिलेक्टेड ) लिखाण व्यवस्थित संपादित करुन लिखित पुस्तक स्वरुपात प्रकाशित करता येईल. आणि मायबोली हा एक प्रकाशन ब्रँड म्हणुन पुढे आणता येईल. >> मलाही असेच वाटते.
जाहिरातीच्या दरपत्रकाची वाट पहात आहे.
१) मायबोली गिफ्टकार्ड भारतात
१) मायबोली गिफ्टकार्ड भारतात द्यायला घ्यायला वेगळे शिपिंग पडत नाही. ते ईमेल द्वारा पाठवता येते. त्या गिफ्टकार्डवर घेतलेल्या पुस्तकांना भारतात शिपिंग आहे पण ते नाममात्र आहे (स्पीडपोस्टने पुस्तके पाठवायचा खर्च).
२)मायबोली इंक (अमेरिका) आणि मायबोली (इंडीया) या दोन्ही रीतसर नोंदणीकृत लिमिटेड कंपन्या आहेत आणि आपआपल्या देशात योग्य तो कर परतावा आणि कायदेशीर कागदपत्रे सादर करतात.
>येथील ट्रॅफिक बघितल्यास उत्तम कंपन्या नक्की जाहिराती देतील
हे आतापर्यंत तरी सगळ्यात अवघड ठरले आहे. यात कुणि मदत करू शकत असेल तर ती नक्कीच हवी आहे. आमच्या माहितीत अगदी मोठ्या मराठी वर्तमानपत्रांच्या इंटरनेट आवृत्यांनाही हीच अडचण येते आहे. सध्यातरी "आठ दिवस छापील पेपरमधे जाहिरात दिल्यास , १ महिन्यासाठी इंटरनेट आवृत्तीवर फुकट जाहिरात देऊ" असे त्यांचे काम चालते असे एका लोकप्रिय मराठी दैनिकाच्या मुख्य मार्केटींग अधिकार्याने आम्हाला सांगितले होते. ही अडचण मुख्यत्वे करून इंग्रजी सोडून इतर भारतीत भाषांना येते आहे.
सध्या मायबोलीचा वार्षिक
सध्या मायबोलीचा वार्षिक जमाखर्च काय असावा? आणि वर सुचवलेल्या सगळ्या कल्पना आमलात आणून जेव्हा मायबोली आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल तेव्हा प्रश्नांवर कितीपत विचार करता येईल?
>>>
मायबोलीने आजवर कुठचीही 'देणगी' स्वीकारली नसल्याने पहिला प्रश्न इथे अर्थातच अप्रस्तुत आहे. दुसरा प्रश्न नीट कळला नाही. मायबोली 'स्वतःच्या पायांवर' उभी आहे, हे वरती नमूद केलंच आहे. काळ बदलतो, त्यासोबत प्रश्न-समस्याही बदलतात. काळासोबत जाताना, नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करताना, इथल्या बदलत्या जाणीवांना आणि वाढत्या कंटेंटला पुरे पडताना मायबोलीने आणखी सक्षम झाले पाहिजे. आणि हे जाहिरातींतूनच होऊ शकेल, असं वरती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
बाकीच्याही प्रश्नांबद्दल (सदस्यत्व फी ठेवण्याबद्दल, लिखाणाची पुस्तके-ऑडिओबुक्स्-सीडी काढण्याबद्दल, मीन्वा, दिनेशदा आणि अश्विनीमामी यांच्या मुद्द्यांबद्दल) थोड्याफार फरकाने हेच बोलता येईल. 'मायबोलीला आर्थिक दृष्ट्या सक्षम कसे करावे' हा इथे मुख्य मुद्दा नसून 'सध्या ऑनलाईन जाहिरातींच वाढत चाललेल्या ट्रेंडचा फायदा घेऊन आपल्या आजूबाजूलाच सहज दिसणार्या उद्योजकांपर्यंत/ जाहिरातदारांपर्यंत मायबोलीची माहिती सहजपणे कशी पोचवता येईल' हा आहे. मग हे लोक आपले जाहिरातदार बनू शकतात का?- ही शक्यता तपासणे (जे अर्थातच इथला जाहिरात विभाग करेल) आणि त्यांच्या जाहिराती इथे प्रसिद्ध करणे - हा त्याच्या पुढचा प्रवास.
तसेच, जाहिरातींचे रेट कार्ड
तसेच,
जाहिरातींचे रेट कार्ड देणे ही फार नंतरची गोष्ट आहे. कुठचाही जाहिरातदार 'हे माध्यम नक्की कितपत आपल्या प्रॉडक्ट/सर्व्हिसच्या जाहिरातीसाठी योग्य आहे' हा विचार आधी करतो. मायबोलीकरांनी जाहिराती सजगपणे बघितल्याने आणि उद्योजक मुलाखतींतून त्याला या फोरमबाबत विश्वास वाटेल- असं वातावरण तयार करायचा प्रयत्न आहे- हेही आपण वरती बोललोच आहोत.
रेटकार्ड देण्याआधी त्याला मायबोलीबद्दल (त्याला कळेल अशा) सहजसोप्या शब्दांत सांगणे आवश्यक आहे. आणि हे अनौपचारिक गप्पा संवादातूनही शक्य आहे.
माझा एखादा मित्र छोटा-मोठा उद्योजक आहे. त्याला समजा मायबोलीबद्दल अजिबात कल्पना नाही तर त्याला मी काय सांगायला हवे?
उदाहरणार्थ-
सप्टेंबर १९९६ मध्ये सुरू झालेलं मायबोली.कॉम हे मराठी भषेतलं पहिलं संकेतस्थळ.
मराठी उद्योजक ग्रुप- उद्योग-व्यवसाय करणार्या, करू पाहणार्यांसाठी खास व्यासपीठ.
उद्योगवार्ता, तसेच उद्योजकांच्या मुलाखती.
संयुक्ता- जगभरातल्या महिलांचे प्रश्न, संधी, माहिती आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी खास व्यासपीठ.
ध्यासपंथी पाऊले- समाजसेवी संस्था व व्यक्तींची माहिती देणारे सदर.
अनेक उपक्रम तसेच ग्रुप्सद्वारे विविध सामाजिक / सेवाभावी संस्थांना मदत.
गेली १० वर्षे ऑनलाईन गणेशोत्सव. यानिमित्ताने अनेक स्पर्धा व उपक्रम.
गेली १० वर्षे दिवाळी अंक. (दिवाळी अंकांना मिळालेले पुरस्कार- २००८ दिवाळी अंकाला स्टार माझा / ग्रंथालीतर्फे विशेष पुरस्कार. २००७ बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सिएटल अधिवेशनात 'बेस्ट मराठी वेबसाईट' पुरस्कार. २००३ दिवाळी अंकाला मुंबई मराठी पत्रकार परिषदेचा खास पुरस्कार.)
गुलमोहर- साहित्यिकांसाठी व्यासपीठ.
गझल कार्यशाळा. साहित्य व साहित्यिकांवरील चर्चा / माहिती.
संवाद- विविध क्षेत्रांतल्या विशेष कामगिरी केलेल्या मराठी व्यक्तिमत्वांची ओळखी / मुलाखती.
अक्षरवार्ता- पुस्तक परिचय. तसेच ई-कॉमर्स द्वारा मराठी पुस्तक विक्री साठी खास सोय.
हितगुज- अव्याहत वाहत राहणारी, निरनिराळ्या देशा-प्रांता-शहरांसाठी गप्पांची पाने.
विविध शहरांतील मायबोलीकरांच्या प्रत्यक्ष होणार्या भेटीगाठी. त्यातुन उभे राहणारे अनेक उपक्रम. पावसाळ्यातील खास 'मायबोली-वर्षाविहार' मेळावा.
या सार्या अर्थातच आपणा सर्वांना नीट माहिती असलेल्या गोष्टी आहेत. हे सारे सांगून जोवर आपण त्याच्या मनात या फोरमबद्दल थोडीफार उत्सुकता तयार करत नाही, तोवर 'रेटकार्ड' देणे ही फक्त औपचारिकता ठरेल. तोही ते घेऊन बाजूला ठेवून देईल, आणि नंतर विसरेल.
जॉनी वॉकर ला
जॉनी वॉकर ला अनुमोदन....गिफ्टकार्ड ची संकल्पना खुप छान....तसेच अश्विनीमामीची कल्पना पण आवडली....मबोकरांच्या कलाकृतींची प्रदर्शन....पुस्तक प्रकाशन... मबोसाठी मला पण काहीतरी करायला आवडेल.... माहितीसाठी धन्यवाद साजिरा
अश्विनीमामी, भ्रमर, भुंगा,
अश्विनीमामी, भ्रमर, भुंगा, पल्ली- तुम्हाला मेल केली आहे.
(No subject)
Pages