कॉकटेल
लंडनला शिकत असतानाची गोष्ट. दुपारचे कॉलेजचे तास झाले होते. हवेत नेहमीप्रमाणे गारठा होताच. आधी उष्मागतिकी (थर्मोडायनामिक्स) आणि मग लगेच आधुनिक भौतिकी (मॉडर्न फिजिक्स) असे तास सलग झाल्याने डोकी जड झाली होती आणि सर्वांनाच काहीतरी दिलासा हवा होता. हो-नाही करता करता आम्ही ७-८ जणांनी कॉलेजमधील क्रॉसलंड्स या पबकडे कूच केले. (ब्रिटनमध्ये विद्यापिठ/कॉलेजांमध्ये हॉटेले, पब इ. असतात व ते बहुतेक वेळा 'नॅशनल युनिअन ऑफ स्टुडंट्स' या ब्रिटीश विद्यार्थी संघटनेद्वारे चालवले जातात.) मी तेव्हा बिअर, वाईन इ. प्रकारांना हळूहळू सरावत होतो. अभियांत्रिकीला असताना कधीच अपेयपान केले नव्हते.