'आम्हाला मातृभूमी नाही'
मी आणि प्रसाद एकाच कॉलेज मधले. पहिल्या दिवशीच्या पहिल्या लेक्चरला एक शांत मुलगा चौथ्या -पाचव्या बाकावर येउन बसला आणि एक मितभाषी मुलगा अशी त्याची पहिली छाप माझ्यावर पडली. मी देखील फार बोलकी वगेरे नाही. पण ओळख आणि मैत्रीची खात्री पटली की मी अगदी मनापासून गप्पा मारते. हळू हळू कॉलेज मध्ये सर्वांशी ओळख होत होती आणि मित्र-मैत्रिणी ह्यांची संख्या वाढत होती. पण ह्याचे मितभाषी असणे अजूनही तसेच होते. जे काही शिकवले जायचे ते मात्र अगदी व्यवस्थित वहीत उतरवून घ्यायचा तो. आणि एके दिवशी 'फौंडेशन कोर्स' नावाचा विषय आम्हाला शिकवला जाणार हे कळले. एकंदर सामाजिक भान वाढविण्यासाठी हा विषय होता.