हसू..
Submitted by निवडुंग on 9 July, 2011 - 14:27
दुपारी सैरभैर रस्ता तुडवत आपल्याच तंद्रीत भऱकटताना, त्याला एक लहान गोंडस पोरगी खेळताना दिसली. या आधी आपण कधी हसलो होतो का हेच त्याला आठवेना, आणि मग असंच तिच्याकडे पाहून हसावसं वाटलं. नेहमीचं कृत्रिम हसू त्याच्या चेहर्यावरून सांडलं. उत्तरादाखल ती इतकी गोड, निरागस हसली की सणसणीत थोबाडीत मारल्यासारखं झालं त्याला. मनापासून हसण्यात एक वेगळंच चैतन्य असतं, आणि ते हसू इतकं नैसर्गिक असतं, सहज, सुंदर, निर्मळ आणि शुद्ध असतं की त्याचा कधीच आव आणता येत नाही. हसायचं आहे तर निर्भेळ हसायला शिक असंच म्हणून गेली ती. मुकाट्याने मान खाली घालून तो रस्ता तुडवत राहिला.