मुखवटा
दडलेले मनोभाव मुखवट्यापाठी
नाटकी वागणे शोभे चेहऱ्यावरती
किती सोजवळ, किती निरागस
पाही त्याची होते हमखास फसगत
मनात कटुता बोलणे तरी मधुर किती
जवळचे होऊनी वार करी पाठीवरती
ओळखण्यास चुकतो, जीवास मुकतो
जेव्हा मैत्रीच्या पोशाखात वैरी निघतो
तोंडावर वर्षाव स्तुतीसुमनांचा होतो
पाठ वळताच निंदेचा बाझार भरतो
पत ढासळते, प्रतिष्ठा धुळीस मिळते
सामील असतात त्यात आदर करणारे
वाटते कधी टर टर फाडावे हे मुखवटे
झप झप वेशीवर टांगावे त्यांची लकत्तरे
पण आपण सुध्दा कुठे आहोत वेगळे
आरसा दाखवून मन शांतपणे विचारते