“राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु?काय त्या किल्ल्याची उंची, काय त्याचा विस्तार! जणू काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस पशू दिसत. त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांग त्याचा घेर बारा कोसांचा त्याला सगळीकडून वेढा घालणे कठीण होते“, महेमद हाशीम खालीखान.
'तोरणा ते राजगड' मोहीम फत्ते : भाग १ : शुभारंभ तोरणापासून ! इथून पुढे...
तोरणाच्या या कड्यावरून दिसणारा 'तोरणा-राजगड' मार्ग मस्तच !! बुधला माचीपासून डोंगरांची रांग सुरु होते ती थेट राजगडच्या संजीवनी माचीपर्यंत.. ! बघून तरी अंधार पडायच्या आता पार करु असे वाटत होते..
तोरणाच्या बुधलामाचीपासून सुरु होणारी तोरणा-राजगडची वाट.. (सुरवातीचा टप्पा)
मायबोलीवर 'तोरणा ते राजगड' भटकंतीचा बाफ झळकला नि माझा काळीज करपटला.. काय करणार.. मला जमण्यासारखे नव्हते.. 'योजना तयार ठेवा.. संधी मिळताच तुमच्यात सामिल होतो' असा संदेश मी या मोहीमेवर जाणार्या मायबोलीवीरांना दिला होता.. २१ जानेवारी उजाडला ज्या दिवशी गिरीविहारच्या गाडीतून मायबोलीवीर राजगडाच्या दिशेने कुच करणार होते.. मग तिथेच गाडी पार्क करुन एसटी वा जीप करुन वेल्हेला (तोरण्याच्या पायथ्याकडील गाव) जायचे नि मग तिथूनच 'तोरणा ते राजगड' या मोहीमेस सुरवात करायची अशी योजना आखली गेली होती.. त्याच दिवशी रोहीत, गिरीविहार यांचे फोन आले..