'तोरणा ते राजगड' मोहीम फत्ते : भाग १ : शुभारंभ तोरणापासून !

Submitted by Yo.Rocks on 30 January, 2011 - 14:36

मायबोलीवर 'तोरणा ते राजगड' भटकंतीचा बाफ झळकला नि माझा काळीज करपटला.. काय करणार.. मला जमण्यासारखे नव्हते.. 'योजना तयार ठेवा.. संधी मिळताच तुमच्यात सामिल होतो' असा संदेश मी या मोहीमेवर जाणार्‍या मायबोलीवीरांना दिला होता.. २१ जानेवारी उजाडला ज्या दिवशी गिरीविहारच्या गाडीतून मायबोलीवीर राजगडाच्या दिशेने कुच करणार होते.. मग तिथेच गाडी पार्क करुन एसटी वा जीप करुन वेल्हेला (तोरण्याच्या पायथ्याकडील गाव) जायचे नि मग तिथूनच 'तोरणा ते राजगड' या मोहीमेस सुरवात करायची अशी योजना आखली गेली होती.. त्याच दिवशी रोहीत, गिरीविहार यांचे फोन आले.. टांगारुंनी ऐनवेळी टांग दिल्याने फक्त तीनच मायबोलीवीर जायला निघाले होते.. रोहीत.. एक मावळा, गिरीविहार नि इंद्रधनुष्य !
माझा सुट्टीचा प्रॉब्लेम होता पण शेवटी राजगड प्रेम पुढे आले नि शेवटच्या क्षणी ऑफिसला टांग देण्याचे ठरवून मोहीमेत सामिल होण्याचा निर्णय घेतला... गाडीत अजुन एक जागा होती सो 'नविन' ला फोन करुन आमंत्रण दिले नि अपेक्षेप्रमाणे त्याने सहर्षाने स्विकारत येण्याचे पक्के केले !

भांडुपला सगळे भेटून तिथूनच मग रात्री १०.३० च्या सुमारास 'गिरीविहार'च्या चारचाकी रथातून पुण्याच्या दिशेने प्रयाण केले.. सध्या थंडीने जोर धरल्याने आम्ही मनाची तयारी केली होतीच.. पण पुण्यात पोहोचलो तरी काहीच गारवा जाणवला नाही.. वाटले सॅकमध्ये थंडीरक्षक वस्त्रांचा काही फायदा नाही.. पहाटे तीन-साडेतीनच्या सुमारास आम्ही गुंजवणे (राजगडाच्या पायथ्याशी असलेले गाव) गाठले.. गाडीतून बाहेर पडलो तोच थंडीने आमच्यावर हल्लाबोल केला नि आतापर्यंत गाफील असलेले मायबोलीवीर आहाहा-हूहूहू करत पटापट आपापल्या सॅकमधून थंडीरोधक वस्त्रे बाहेर काढू लागले..! Lol त्या पाच-दहा मिनीटात पुरते गारठून गेलो..
आमच्याअगोदर नुकताच एक ग्रुप गाडीने आला होता जो राजगड ते शिवरथळ असा ट्रेक करणार होता..! वेळ रात्रीची असली तरी चंद्राच्या दुधाळ प्रकाशात बर्‍यापैंकी दिसत होते.. आम्हाला आता इथूनच रात्री मुक्कामाला आलेल्या एसटीने पहाटे निघायचे होते त्यामुळे ऐनवेळी घाई नको म्हणून जवळच असलेला ओढा गाठला नि लख्ख चांदण्याप्रकाशात आधी महत्त्वाचे कार्यक्रम उरकून घेतले.. Happy

आमच्या हातात दिडेक तास होता तेव्हा एक डुलकी होईल म्हणून तिथेच जवळ असलेल्या हनुमान मंदीरात आडवे झालो.. पण अपेक्षेप्रमाणे झोप काही लागली नाही.. तासभरातच कानावर मराठी गाण्यांचा आवाज ऐकू पडला.. या गावात असलेले पुरोहीतांचे "अरण्यधाम" दुकान उघडले होते जिथे चहानाश्त्याची नि जेवणाची सोय होते.. (संपर्क : श्री.चंद्रकांत पुरोहीत , दुरध्वनी क्र.०२१३०-२८०३६३,२८०२५१,२१८०१९, भ्रमणध्वनी क्र. ९४२०८६०६९१) आम्ही तिथे चहाची ऑर्डर देउन लगेच सामान आवरायला घेतले.. गिरीने आपली गाडी एका बाजूला पार्क केली नि काही मिनीटांतच आम्ही गुंजवणे सोडले.. एसटीने बाहेरच्या रस्त्यावर मार्गासनीला उतरलो.. आता इथूनच लिफ्ट मागून पुढे 'वेल्हे'ला जाणार होतो.. लिफ्ट मिळेपर्यंत रस्त्याच्या बाजूला शेकोटी करुन उब घेत बसलो.. अर्ध्यापाउण तासातच आम्हाला जीप मिळाली जी आधीच भरून आली होती... आम्ही पाचजण त्यात मोठ्या सॅक्स.. असे सारेजण मागच्या बाजूने स्वतःला कोंबून बसलो ! इंद्रा ज्या पोझमध्ये होता तो उभा आहे की बसलाय हेच कळत नव्हते.. Lol नशिबाने पुढचे दोघे तिघे काही अंतरावर उतरले तेव्हा कुठे नीट बसायला मिळाले.. (जीपवाल्याचा संपर्क - श्री. सोमनाथ - ०९५७९९१८८७७)

सकाळी सातच्या सुमारास वेल्हेला पोहोचलो नि जवळच्या हॉटेलात नाश्तापाणी करण्यासाठी शिरलो.. हवेत अजुनही गारवा होता.. गावात तशी शाळेत जाणार्‍या मुलांची वर्दळ जास्त होती.. ट्रेकमधला पहिला फोटो या वेल्हे गावातच मिळाला.. दृश्यच तसे खास होते..

<

पोह्यांचा फक्कड नाश्ता झाला नि आम्ही तोरणाच्या दिशेने कूच केले.. याचवेळी स्वारगेटहून वेल्हेकडे येणारी पहिली एसटी पोहोचली नि आमच्यासारखेच 'तोरणा ते राजगड' करणारे दोन तीन ग्रुप उतरले.. गावातून सरळ एक वाट तोरणाच्या दिशेने वरती जाते ती वाट पकडली..

उंचपुरी तोरणा (पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च किल्ला) सुर्याची कोवळी किरणे खात आमच्या स्वागतासाठी सज्ज होताच.. आम्ही उत्साहात पटापट चालू लागलो पण सुरवातीलाच दोन तीन मोठे चढ लागले नि वेग मंदावला.. Proud ही वाट संपुर्ण ओसाड डोंगराची असल्याने आम्ही टप्प्याटप्यावर असणारे झाड बघून थांबत होतो..

हे चढ पार करताच वेल्हे गावचा परिसर नजरेत भरतो तर वरती तोरण्याची तटबंदी सारखी खुणावत होती.. पुढची वाट ही डोंगराच्या सोंडेवरुन कमरेभर उंचीच्या कारवीजंगलातून जाते.. इथूनच मग तोरणा किल्ल्याच्या डोंगरापाशी जवळ येउन पोहोचलो.. इथून खालीच असणार्‍या गुंजवण धरणाचे निळेभोर पाणी अगदी उठून दिसत होते..

<

एका बाजूस तोरणाच्या डोंगरावरील घड्या लक्ष वेधून घेत होते..

तर वरच्या बाजूस पाहिले असता तोरणाचा एका बाजूने घेरा लक्षात येत होता..

आता इथूनच खर्‍या अर्थाने तोरणाची चढाई सुरु होणार होती.. खडकांमधून वर चढणारी वाट आधीच्या वाटेपेक्षा खूप बरी वाटली.. दमही निघत नव्हता नि उंचीही गाठली जात होती.. इथेच अधून मधून कोरलेल्या पायर्‍या लागतात.. काही ठिकाणी रेलिंग लावलेले आहेत.. खाली पाहिले तर आम्ही केलेली वाटचाल नजरेस पडली..

तर वरती तोरणाचा बुरुज आमचा उत्साह वाढवत होता..वाटले इथूनच सरळ वर चढत जायचे असेल..

पण भ्रमनिरास झाला नि वाट उजवीकडे वळाली.. पुन्हा कारवीच्या जंगलातून जाणारी सहज सोप्पीशी वाट.. इथेच डावीकडे एक झरा लागला नि आम्ही पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.. इथेच रोहीतने फोटोसाठी एक अवतार धारण केला..

आमच्या ग्रुपच्या मागेपुढे अजुन दोनेक ग्रुप होते.. नि हो जोडीला गावातील कुत्रा नसेल तर नवलच.. पुढे पाचदहा मिनीटांतच पुन्हा पायर्‍या लागल्या.. नि बिनी दरवाज्यातून आम्ही तोरणावर पोहोचलो.. !

सुरवातीलाच दरवाज्यापाशी असणारे भरभक्कम बुरुज नि मग लागणारा कोठी दरवाजा हे जंगी स्वागतासाठी उभे असलेले दिसले..

नेहमीप्रमाणे शिवरायांचा जयजयकार करत आम्ही प्रवेश केला..

याच कोठी दरवाजाच्याबाजूने एक वाट मागे जाते जिथे "तोरणजाई"चे छोटेसे मंदीर पडीकावस्थेत आहे..
उन कडक पडले होते नि पोटात देखील कडक भूक लागली होती.. पण आधी तोरणाची एक बाजू बघून घेउ नि मग थोडे वरती सरकून पेटपूजा उरकुन घेउन असे ठरले..

तोरणाच्या त्या भक्कम बुरुजावरती उभे राहून फोटोसेशन झाले..

आम्ही एका कडेला होतो तर दुसर्‍या कडेला हे साहेब आपल्याच तोर्‍यात वार्‍यावर स्वतःचे डोके डुलवत होते...

माझ्या गेल्या सलग चार ट्रेकमध्ये सर्पदर्शन झाले होते नि आता ही पाचवी वेळ !! (ही बाब माझ्यासाठी तरी अभिमानास्पद नव्हे.. आत्मविश्वासाची बोंब लागते आपली मग पुढे जंगल तुडवताना.. सारखे वाटत राहते पायाखाली काहितरी..!!! ) नि वरील फोटोत साप कितीही सुंदर दिसत असला नि दिसायला तो छोटा वाटत असला तरी मी काय त्याच्या जवळ गेलो नाही.. जल्ला शिस्तीत झूम करुनच काढलाय... Lol गिरीने मात्र अगदी मनासारखे जवळून फोटो काढून घेतले..

त्याचे फोटो काढून झाले नि मग मला 'उडी उडी' आठवले.. Proud बाकी कोणी उडी मारण्याच्या मनस्थितीत नव्हते पण 'नविन' तयार झाला..

----
आमच्यापासून दुसर्‍या ग्रुपमधले प्रेरित झाले.. तेव्हा त्यांच्यातील फोटोग्राफर नि उडीमास्टारचा एक मस्त फोटू घेतला..
<

म्हटले आता मी पण उडून घेतो म्हणून चार-पाच उड्या मारल्या पण जल्ला' नविन'ला काही टिपायला जमले नाही.. शेवटी वैतागून आम्ही पेटपुजेसाठी मार्गी लागलो.. एका पडीक बांधकामाच्या सावलीत बसून पुरणपोळी, ठेपले, बोरं, काकडी इति आहार झाला.. इथे काही नव्याने केलेले बांधकाम दिसले ते कशाला ते कळले नाही.. डोळ्यात खुपते ते.. नुतनीकरण करताना जुनेपणाचा फिल जाणार नाही याकडे पुर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसले.. असो.. आम्ही खात असतानाच तोरणाचा नकाशा पाहून घेतला.. नि एका तासात शक्य तितके फिरुन घ्यायचे नि मग राजगडच्या वाटेला निघायचे असे ठरले.. खाणं उरकताच आम्ही हनुमान बुरुजाकडे वळालो.. इथेच भल्यामोठ्या ढोलकाठीला निशाण फडकावलेले आहे.. इथे जाताना तोरणाची एका बाजूकडील तटबंदी लक्ष वेधुन घेत होती..

----------------------

(बुरुज,"तोरणजाई"चे छोटेसे मंदीर नि तटबंदी)
----------------------

(ढोलकाठी)
----------------------

(बघत रहावे असे..)

इथूनच पुढे आम्ही तोरणा किल्ल्यावरील खास आकर्षण असलेली 'झुंजार माची' बघण्यासाठी कडेला सरकलो..
तोरणाला बिलगून खालच्या बाजूस असणार्‍या डोंगराच्या सोंडेवर बांधलेली ही माची निव्वळ अप्रतिम !

दिसायला छोटी दिसत असली तरी आकर्षून घेईल असे ह्या माचीचे बांधकाम.. इथे जाण्याचा मार्ग किंचीतसा अवघड आहे.. इथे उतरण्यासाठी एक शिडी लावलेली दिसली.. तिचा एकंदर मर्यादीत स्वरुपात असलेला विस्तार लक्षात घेता आम्ही वरूनच कड्यावरुन तिचे दर्शन घेण्यात समाधान मानले.. वेळ कमी होता नि ही माची तशी सहजस्पष्टपणे नजरेत भरत होती.. सो जाण्याचे टाळले नि आम्ही मेंगजाई मंदीराच्या दिशेने निघालो..


(मेंगजाई मंदीर)
-------

(मंदीरातील प्राचीन मुर्ती नि राजांचा फोटो)

या परिसरात दोन तीन टाकी नि पडीक बांधकाम आढळते.. या मंदीराची डागडुजी केल्याने आता चांगल्या स्थितीत आहे..

या मेंगजाई देवळाच्या समोरच प्राचीन मंदीर आहे जिथे शिवलिंग आहे नि बाहेर नंदीची प्राचीन मुर्ती आहे.. हे मात्र पडीक अवस्थेत आहे...

दुपारचे बारा वाजून गेले असल्याने उनदेखील आता चटके देउ लागले होते.... तेव्हा तिथेच एका गावकर्‍याकडून लिंबूसरबत घेतले तसेच त्या प्राचिन मंदीराबाजूसच जवळच असणार्‍या पाण्याच्या टाकीतले पाणी पिण्यासाठी भरुन घेतले.. इथे रोहीत आणि इंद्रा या दोघांनी कसोशीने प्रयत्न करुन पाणी भरुन घेतले.. कारण पाणी खूप खालच्या बाजूस होते नि पाणी भरताना कुठे पकडण्यास अशी सोयदेखील नव्हती.. रिकाम्या बाटल्या रिफील झाल्या नि मग इथूनच 'तोरणा-राजगड' वाटेचा अंदाज घेण्यासाठी पुढे एका कड्याकडे सरकलो.. !

(इथेही राजगडाच्या दिशेने फडकणारा भगवा नि मायबोलीवीर )

क्रमश :
(पुढील भाग : 'तोरणा- राजगड' मार्ग :))
-----------------------------------------------------------------------------
मोहीमेत सहभागी झालेल्या मायबोलीवीरांची ओळख.. Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम्म्म.... चांगलंय...
फोटो खासच!!
शेवटच्या परिचयाची पद्धत मस्त!! Happy
पुढचा लवकर टाका...
(अस्साच माझ्या मागे लागला होतास ना तेव्हा!!! :P)

आला आला वॄत्तांत आला.....
यो सुरुवात तर झकास झाली.....
झुंझारमाची अन उडीमास्तरचा फोटो झकास.....
माझ्या कॅमेरात टिपलेला सापाचा फोटो....
P1050734.JPG

गुंजवणेतील पहाटेची बोचरी थंडी... मार्गासनीची शेकोटी आणि तेथूनच होणारे राजगडावरील नेढ्याचे दर्शन... सगळा रोमांच पुन्हा एकदा Happy

झुंझारमाचीचा प्रचि केवळ अप्रतिम... तिथे जाणार्‍या शिडीचा फोटो काढला असशिल तर टाक... ते धाडस पुन्हा कधितरी...

तोरण्याच्या वाटेवरील झर्‍याचे पाणी आणि काकडीने खुप ताजेतवाने केले. गडावरील ताक विकणार्‍या गावकर्‍याला त्या सर्पा बद्दल विचारले तर म्हणाला, "फुरसं आसलं... हाईत बरीच" :p

खंडप्राय वृत्तांत लवकर आटपू दे रे देवा! Wink

झुंजार माचीबद्दल पुर्वी वाचले होते आणि हे चित्रही पाहिले होते पण हीच ती माची आहे हे नव्हते माहित. तुम्ही नेहमीच साध आणि मनाला भावणार लिहिता. फोटोंमुळे पुढे पुढे वाचतचं रहावसं वाटतं. छान उपक्रम आहे. पुढील भागांची वाट पहात आहोत. शक्य तेवढे चित्र टाका.

काय रे काय... ती झुंजार माचीची शिडी उतरुन गेलाच नाहीत तुम्ही... मी सुद्धा ती शिडी उतरुन माचीच्या शेवट पर्यंत जाऊन आलोय....

पण तोरणा चढताना मात्र थोडा जरी उशीर झाला तरी वाट लागते.. आमची तीच गोची झाली होती... सकाळी पुण्यातून निघालो आणि कात्रजला पोचेपर्यंत एकाची बाईक पंक्चर.. जल्ला १ तास वाया.. पहाटे पहाटे पम्पचर कोण काढून देणार.. आणि त्यात तोरण्यावर जाताना वाटेत दोन तीनच मोठी झाडं लागतात जिथे जरा थांबून दम खाता येईल... त्यात बरोबर कंपणीतल्या तीन कन्यका पण होत्या... सुदैवानी त्यांचा चढण्याचा वेग बरा होता.. नाहीतर दुपारच्या चहालाच पोचलो असतो गडावर..

परत एकदा जाऊन यायला पाहिजे तोरण्यावर... आणि आता यो दगडानी दिलेली माहिती घेऊन म्हणजे सगळा गड नीट बघता येईल..

धन्यवाद मंडळी Happy

योगी... हा बघ कलरमधला झुंजार माचीचा दुसरा फोटो..

इंद्रा.. शिडीचा फोटो आहे पण अँगल चुकलाय.. रोहीतच्या कॅममध्ये असावा चांगला फोटो..

"फुरसं आसलं... हाईत बरीच" >> Lol

हिरकु.. अरे बराच मोठा पल्ला गाठायचा होता रे.. म्हणून जाण्याचे टाळले..

मस्तच रे वर्णन आणी प्रची..
मला आमचा गेल्यवर्षीचा आमचा हाच ट्रेक आठवला...सहीच अनुभव्...आम्ही एका दिवसात तोरणा -राजगड केला होता...सकाळी वेल्ह्यावरुन सुरु करुन सुर्यास्ताला पद्मावती मंदिरात मुक्कामाला...मस्त मजा आली होती....

बघतो..झब्बु द्यायला फोटो शोधतो...

पुढचा भाग कधी ??

विन्या.. आता इथे पुन्हा डायरेक्ट जुनमध्ये रे..>>> अरे १९ फेबचा गोरख नाईट ट्रेक विसरलास काय?

तोरण्याचे मास्टर फोटो काढले आहेत. व्व्व्व्व्व्व्व्वा! ऑब्जेक्ट, अँगल एकदम भारी!! वातावरणही भारी गांवलेलं दिसतंय. मी हा ट्रेक उलटा केलांय. सिंहगड- राजगड (मुक्काम)- तोरणा- वाळंजाई दरवाजा- भट्टी- गेळगणी (मुक्काम)- मोहरी- बोराटा नाळ- लिंगणमाची- पाने (मुक्काम)- रायगडवाडी- नाना दरवाजाने रायगड.

..बाकी ढोलकाठी की ढालकाठी?
... आणि ते फुरसं नाही! विषारी साप ओळखण्याची ढोबळ खूण म्हणजे त्याचं डोस्कं त्रिकोणी आस्तंया..आनि फुरसं मातकट रंगाचं असतं!!! आमच्या कोकनांत लंय गांवत्यांत. .

वर्णन व फोटो सुरेख<>फोटो मस्त. तुझ्य बरोबर ट्रेक कराचा आहे. मुहुर्त कधी लग्तो ते बघु.>>>>>> १०० % अनुमोदन!!!!... आणि ते फुरसं नाही!>>>>> धामणं असावी ......

जबर्दस्त यार... एकदम मस्तच वर्णन आणि फोटो...
विन्या.. आता इथे पुन्हा डायरेक्ट जुनमध्ये रे..>>>>> मी पण... मला पण बोलव...

मस्तच फोटो .. पहिल्यान्दा राजगड तोरणा २ ० ० ४ साली केला होता. त्या मानाने आता गडावर बरेच काम सुरु दिसतेय.