एक कॉन्फरन्स कॉल चालू आहे. त्यामध्ये भाग घेत आहेत, इंटेलिलॉजिक कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ब्रॅडली, जागतिक जनसंपर्क अधिकारी फॉन्टेन, युटा सर्व्हर फार्मचे कार्यकारी संचालक नारिता, चीफ सायंटिफिक ऑफिसर डॉ. झोलेन्स्की आणि चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर रामकृष्णन (रामा).
इन्टेलिलॉजिक ह्या जगप्रसिद्ध ए आय कंपनीचं सर्व्हर फार्म यूटामधल्या एका अत्यंत निर्जन भागात आहे. त्या अवाढव्य इमारतींच्या समूहाच्या किमान पंचवीस ते तीस मैलाच्या परिघात मनुष्यवस्तीची काहीही खूण नाही; अर्थात रस्ते, इलेक्ट्रिक आणि फायबर ऑप्टिक केबल्स वगैरे सोडल्या तर. ह्या एवढ्या प्रचंड ऑफिसांमध्ये केवळ पंधरा माणसं काम करतात. त्यातल्या बहुतेक सर्वांनी त्यांच्या विद्वान बॉसेसना ऑफिससाठी ही असली आडनिडी जागा शोधून काढल्याबद्दल अनेकदा शिव्यांची लाखोली वाहिलेली आहे. 'सर्व्हर फार्म' हे आपलं गोंडस नांव!
लेयर - १:
शेवटी एक माणूस म्हणजे असतं तरी काय? एक चेहरा? एक शरीर? एक व्यक्तिमत्व? का त्या माणसाला ओळखणाऱ्या इतरांच्या त्याच्याविषयीच्या भावना, त्यांचा एकत्र सहवास, त्यांच्या आठवणी ह्या सगळ्याची गोळाबेरीज? मग, कोणीच ओळखत नसेल तुम्हाला, तर? तरीही तुमचं अस्तित्व आहे, तुम्ही आहात, का नाही?