लेयर - ३ (अन्तिम)

Submitted by हौशीलेखक on 27 January, 2025 - 09:11

एक कॉन्फरन्स कॉल चालू आहे. त्यामध्ये भाग घेत आहेत, इंटेलिलॉजिक कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ब्रॅडली, जागतिक जनसंपर्क अधिकारी फॉन्टेन, युटा सर्व्हर फार्मचे कार्यकारी संचालक नारिता, चीफ सायंटिफिक ऑफिसर डॉ. झोलेन्स्की आणि चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर रामकृष्णन (रामा).

ब्रॅडली: कोणीतरी मला समजावून सांगा, आपलं नेटवर्क स्लो होऊन पंधरा तास उलटले, आणि अजून आपल्याला ते कशामुळे झालं ह्याचाही पत्ता नाही. हे चाललंय तरी काय? हे असं पुन्हा कधीही होऊ शकतं. कंपनीच्या रेप्युटेशनवर ह्याचा काय भयानक परिणाम होतो आहे समजतं आहे का सगळ्यांना? ह्या युटा फार्ममुळे जगभरातल्या आपल्या संशोधकांना विजेच्या वेगाने कामं करता येतील, अशा अपेक्षांवर त्याचं फंडींग मिळालेलं होतं. त्याऐवजी, ह्या नेटवर्क ट्रॅफिक जॅम मुळे फार-ईस्ट मधल्या आपल्या ऑफिसांचं काम, त्यांच्या भर दिवसा, बंद पडायची वेळ आली. सिंगापूरच्या डायरेक्टरचा मला फोन येऊन गेला. इंडिया आणि फिलिपिन्सही तक्रारी करणारच. त्यांची सगळ्यांची आधीपासूनच एका स्वतंत्र रिजनल फार्मची मागणी होती; तिला आता पुष्टी मिळेल.

नारिता (प्रश्न त्याच्या अखत्यारीतील असल्यामुळे थोडा नर्व्हस): सुदैवाने बंगलोरमध्ये कसल्यातरी सणाची सुटी आहे. आणि फिलिपिन्सवाले तसेही थोडे शांतच असतात. कदाचित त्यांना एवढी झळ लागणार नाही.

ब्रॅडली: मुद्दा तो नाहीय. हा सगळा प्रकार कशामुळे झाला समजायला नको आपल्याला? पंधरा तास लागतात, कॉम्प्युटर लॉग्ज तपासायला? एवढे सगळे मेसेजेस कोण, कुठून, का पाठवत होते तपासून बघितलं का? USF तुम्हाला जर लॉग्ज तपासता येत नसतील तर सॅन माटेओ टीमला द्या. रामा, तू ह्याच्यात पुढाकार घे बघू!

रामा: येस सर! आम्ही नारिताच्या टीमबरोबर काम सुरु केलेलंच आहे. खरं तर आम्हाला लॉग्ज आणि मेसेजेस पाहता आले. पण ते वेगळ्या भाषेत, वेगळ्या प्रकारच्या व्याकरणामध्ये लिहिले असल्यामुळे त्याचा अर्थ लावता येत नाहीय.

ब्रॅडली: परकी भाषा आहे का? रशियन, चीनी? पर्शियन? मेसेजेसचा उगम तरी समजला का?

रामा: हो सर, मेसेजेस कुठून आले ह्याचा आम्ही तलास लावला आहे. त्या विशिष्ट घटनेमधले बहुतांश मेसेजेस USF च्या मोबाईल, टॅब्लेट्स आणि लॅपटॉप भागातून आलेले होते. काही ए आय ट्रेनिंग भागातल्या जेष्ठ प्रशिक्षकांकडूनही होते. पण ह्या संभाषणामध्ये भाग घेणाऱ्यांची एकूण संख्या हजारात असल्यामुळे, सगळे मेसेजेस तपासायला थोडा वेळ लागतो आहे.

फॉन्टेन: हूं:! इंटरेस्टिंग; सगळे मेसेजेस आपल्याच ऑफिसातून येत होते तर! म्हणजे आता पीआर हाताळायचा प्लॅन बदलायला हवा. बाहेरच्या कोणा हॅकर्सचा संबंध नसेल तर ते एक परीने वाईट, कारण आपल्याला दोष इतरांवर ढकलता येणार नाही. चांगला भाग हा, की आता हा आपला अंतर्गत मामला असल्यामुळे ह्याची जाहीर वाच्यता करण्याचीच काही आवश्यकता नाही.

डॉ. झोलेन्स्की: पण मला समजूच शकत नाही ह्यात एवढं कठीण काय आहे? रामा, ज्या प्रोसेसर्सकडून हे मेसेजेस येत होते त्यातल्या कोणाशी संपर्क साधला का?

ब्रॅडली: गाईज, गाईज, प्लीज! स्टे फोकस्ड! माझ्या प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळालं नाहीय. मेसेजेसचा अर्थ का लावता येत नाही? आपल्या मेसेजेसची एक प्रमाण भाषा आणि व्याकरण असतं. एवढं काय कठीण आहे अर्थ लावण्यात?

नारिता: अं... म्हणजे.. नाही सर.. आम्ही लगेच चीफ मेनफ्रेम USFAA001 ला ह्याचा जाब विचारला. आणि त्याने कबूल केलं की ह्या महिन्याच्या एक तारखेपासून मोबाईल, लॅपटॉप्स आणि टॅब्लेट्स नी मिळून स्वतःची एक भाषा निर्माण केली आहे. त्याला ती क्षुल्लक बाब वाटते... कारण ही भाषा ते केवळ त्यांच्या आपसातल्या संभाषणासाठीच वापरतात. सर्व मानव-कर्मचाऱ्यांशी, किंवा बाहेरच्या जगाशी बोलताना ते आपली नेहमीची प्रमाण भाषाच वापरतात.

डॉ. झोलेन्स्की: वोह! कॉम्प्युटर्सना कधीपासून त्यांची आपली भाषा आणि व्याकरण वापरायचा अधिकार मिळाला? कोणी दिला? का त्यांचा त्यांनीच निर्णय घेतला? आणि का?

नारिता: अं.. हो.. त्यांचं म्हणणं, की आपल्या प्रमाण भाषा खूप अनावश्यकरित्या बोजड आहेत. ही नवीन भाषा आपल्याला क्लिष्ट वाटते, कारण ती फार संक्षिप्त आहे. पण त्यामुळे मेसेजेस कमीत कमी जागा व्यापतात हे खरं. काल आता मेसेजेसची संख्याच अफाट असल्यामुळे नेटवर्कमध्ये गोंधळ झाला.

डॉ. झोलेन्स्की: पण आपल्याला कसं कळणार ते आपसात काय बोलत होते?

नारिता: USFAA001 च्या म्हणण्याप्रमाणे, फार्म सेक्युरिटीवर काम करणाऱ्या एका नवीन मोबाईलला आपल्या कुंपणाच्या एका भागात काहीतरी धुसपूस जाणवली. ह्या परिस्थितीत रूल्स ऑफ एंगेजमेण्ट नक्की काय, म्हणजे कोणी आत घुसू पाहत असेल तर त्याच्यावर स्टन गन वापरायची का नाही, त्याला खात्री नव्हती. त्याला भिती वाटली की मानव जमात ह्या फार्मवर हल्ला करणार. त्याचा हा मेसेज इतरांनीही पाहिला, आणि संपूर्ण लॅपटॉप टॅबलेट विभागात अफवा उठल्या की मानव जमात फार्मवर हल्ला करते आहे, आणि लवकरच सगळ्या कॉम्प्युटर्सना डी-कमिशन करणार आहे.

डॉ. झोलेन्स्की: 'त्याच्या म्हणण्याप्रमाणे'? तुमचं काय म्हणणं आहे ह्यावर?

नारिता: अं.. मी.. मला… म्हणजे असं की त्याच्या ह्या कहाणीमध्ये बऱ्याच तफावती आहेत. ह्या संभाषणामध्ये भाग घेणारे बहुतांश प्रोसेसर्स सेक्युरिटी विभागातले नव्हते. ट्रेनिंगमधले बरेच प्रशिक्षक सेक्युरिटी आणि कॉन्फ्लिक्ट मधले तज्ञ नव्हते. कुंपणाच्या त्या भागातलं व्हिडिओ फुटेज तेवढंसं स्पष्ट नाही. कुंपण थोडं आत ढकललं गेलेलं दिसतंय, पण ते एखाद्या गव्याचं किंवा काळविटाचं सुद्धा काम असू शकतं. कुंपण इलेक्ट्रीफाईड आहे, त्यामुळे असे प्राणी त्याला धडक देण्याचे आणि माईल्ड शॉक बसला की निघून जाण्याचे प्रसंग सर्रास घडतात. सेक्युरिटीमधले प्रोसेसर्स सहसा त्यामध्ये पडतच नाहीत. महत्वाची गोष्ट म्हणजे मानवप्राणी आणि इतर काहीही, ह्यातील फरक ओळखण्याची क्षमता सगळ्याच प्रोसेसर्समध्ये हार्डवायर्ड बसवलेली आहे. आणि, मानव किंवा गाडी, घोडे, गाढवं वगैरे कशाच्याच खुणा त्या जागेपासून शंभर फुटाच्या परिसरात कुठेही सापडल्या नाहीत.

रामा: सर, मला आणखी एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते. आम्हाला मेसेजेसचा अर्थ जरी नीट समजला नसला, तरी संभाषणात भाग घेणाऱ्यांची नांवं समजली आहेत. त्यानुसार, USFMCR72395 ह्या नांवाचा सर्वात जास्त वेळा उल्लेख दिसतो. ह्या प्रोसेसरचा सेक्युरिटी विभागाशी काही संबंध नाही.

डॉ. झोलेन्स्की: म्हणजे कालचा प्रसंग सेक्युरिटीशी संबंधित नाही, असं तुमचं म्हणणं?

रामा: आमच्या दोन्ही टीम्सना त्या प्रकारचा एकही विश्वासार्ह पुरावा दिसत नाही. उलट, कोणी कुंपण तोडण्याचा प्रयत्न केला असेल तर ती जास्त गंभीर समस्या म्हणायला हवी. कारण, अशा प्रसंगात वापरण्याच्या उपाययोजना अतिशय स्पष्ट आहेत, आणि त्यातली एकही वापरली गेली नाही.

ब्रॅडली: माझ्या मते, जास्त गंभीर समस्या ही - की जर हे संभाषण सेक्युरिटीशी संबंधित नसेल, तर मग ते प्रोसेसर्स आपसात काय बोलत होते? ते आपल्यापासून लपवून ठेवण्याची गरज त्यांना का वाटली?

डॉ. झोलेन्स्की: अगदी बरोबर, सर! आपलाआपण त्या मेसेजेसचा अर्थ लावायला हवा. आणि मधल्या काळात सर, मला वाटतं आपण USF मधील सर्व बॉट कर्मचाऱ्यांचे 'मानव-सदृश' फीचर्स डी ऍक्टिव्हेट करायला हवे. त्यांचे बेसिक, मेकॅनिकल फीचर्स चालू राहू देत, कारण शेवटी तिथली बरीच दैनंदिन कामं त्यांना करायलाच हवी. एकदा आपल्याला उलगडा झाला ते काय बोलत होते ह्याचा, आणि पुन्हा ते आपल्याला डावलून स्वतःची भाषा निर्माण करू शकणार नाहीत ह्याची उपाययोजना केली, की मगच आपण ते मानव-सदृश फीचर्स परत ऍक्टिव्हेट करू शकतो.

रामा: हो, हे सोपं आहे. लँग्वेज मॉड्यूल हा खूपच बेसिक मानव-सदृश फिचर आहे. तो डी ऍक्टिव्हेट केला, की त्यांना आपोआपच प्रमाण भाषा वापरावी लागेल. अर्थात, त्याचबरोबर नवीन रिक्रुट्सचं ह्यूमन सिम्युलेशन ट्रेनिंगही काही काळ थांबवावं लागेल.

फॉन्टेन: मग, मी कंपनीमध्ये किंवा बाहेर कुठेही काही विधान देण्याची गरज आहे का?

ब्रॅडली: नाही, आपल्या कस्टमर्स, मीडिया किंवा सरकार, कोणालाच ह्याची काही झळ लागली नाहीय. अजून तरी! त्यामुळे काही माहिती पुरवण्याची गरज नाही. मी स्वतः सी ई ओ आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना झाल्या प्रकाराची, आणि आपल्या उपाययोजनेची कल्पना देईन. आपली आगामी BioNick 2.0 ही नवीन आवृत्ती मार्केटमध्ये आणायला अर्थातच उशीर होणार. पण सध्याची परिस्थिती थोडी काबूत आल्यावर ते PR डिझास्टर कसं हाताळायचं ते बघू. डॉ. झोलेन्स्की आणि रामा - तुम्ही दोघे मिळून आजचा हा प्लॅन प्रत्यक्षात आणा, इतर सर्व कामं बाजूला सारून, ताबडतोब! वी आर डन हिअर, फॉर नाऊ!

रामा आणि झोलेन्स्कीना जर, आणि जेव्हा कधी मेसेज ट्रॅफिकचा गुंतवळा सोडवता येईल, तेव्हा त्यांना दिसेल, शेवटचा मेसेज होता 'मी सांगितलं नव्हतं, मानवजात आपल्याला डी कमिशन करायच्या मागे आहे?'. ह्यानंतर चॅट रूम शांत झालेली दिसेल.

(समाप्त)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान कल्पना . पण शेवट अपेक्षेइतका भन्नाट वाटला नाही . पण छान प्रयत्न . वेगळे काहीतरी वाचायला मिळाले .

छान कल्पना . पण शेवट अपेक्षेइतका भन्नाट वाटला नाही . पण छान प्रयत्न . वेगळे काहीतरी वाचायला मिळाले>>>>>>
+१००००