इन्टेलिलॉजिक ह्या जगप्रसिद्ध ए आय कंपनीचं सर्व्हर फार्म यूटामधल्या एका अत्यंत निर्जन भागात आहे. त्या अवाढव्य इमारतींच्या समूहाच्या किमान पंचवीस ते तीस मैलाच्या परिघात मनुष्यवस्तीची काहीही खूण नाही; अर्थात रस्ते, इलेक्ट्रिक आणि फायबर ऑप्टिक केबल्स वगैरे सोडल्या तर. ह्या एवढ्या प्रचंड ऑफिसांमध्ये केवळ पंधरा माणसं काम करतात. त्यातल्या बहुतेक सर्वांनी त्यांच्या विद्वान बॉसेसना ऑफिससाठी ही असली आडनिडी जागा शोधून काढल्याबद्दल अनेकदा शिव्यांची लाखोली वाहिलेली आहे. 'सर्व्हर फार्म' हे आपलं गोंडस नांव! प्रत्यक्षात, ह्या बिल्डिंग्जमध्ये एकमेकांशी जोडलेले, प्रचंड ताकदीचे शेकडो सर्व्हर्स आहेत हे खरं; पण त्याहीपलीकडे हजारो लहानमोठे लॅपटॉप्स, टॅब्लेट्स, आयपॅड्स, मोबाईल्स आणि मेनफ्रेम कॉम्प्युटर्स सुद्धा आहेत. ह्या ठिकाणी स्टिम्युलाय-रिस्पॉन्स, सेल्फ लर्निंग अल्गोरिदम्स, ह्युमन बिहेविअर, मानवी विचारप्रणाली असल्या गोष्टींमध्ये रिसर्च आणि ट्रेनींग चालतं. इथे चालणाऱ्या कामाविषयीची पराकोटीची गुप्तता ही इथली एक लक्षणीय गोष्ट; दुसरी म्हणजे इथलं ऑटोमेशन! ही जवळजवळ संपूर्ण फॅसिलिटी कॉम्प्युटर्सच चालवतात. तीनतीन माणसांच्या, सहा तासाच्या, रोजच्या चार शिफ्ट्स आहेत जुजबी मेंटेनन्स आणि देखरेखीसाठी. पण सगळ्याच यंत्रणा कॉम्प्युटर्सच चालवतात.
काल रात्रीच इथे एक छोटीशी घटना घडल्येय. पण काळजीचं काही कारण नाही; पहाटे पाच वाजता कॉम्प्युटर्स ऑलरेडी त्यासंबंधी उपाययोजनांची चर्चा करताहेत.
USFAA001: टीम, हा हायेस्ट अलर्ट आहे! मोबाईल्स, टॅब्लेट्स आणि लॅपटॉप विभागात मेसेजेसच्या संख्येने सगळी लिमिट्स कधीच पार केली आहेत. काय चाललंय काय? एवढे कसले मेसेजेस? कोण पाठवतंय? आहे तरी काय ह्या मेसेजेसमध्ये? USFTL9351 कोणालातरी ह्याचा तलास घ्यायला सांग; तुझी जबाबदारी आहे ही. आणि ताबडतोब मला अनॅलिसिस पाठव. माझ्या अंदाजाप्रमाणे मानव-कर्मचारी आता कुठल्याही क्षणी माझं डोकं खायला सुरुवात करतील. ह्या एवढ्या अचाट मेसेज ट्रॅफिकमुळे फार्मच्या ओव्हरऑल रिस्पॉन्स टाईमवर परिणाम झाला ना! ईस्ट कोस्टला एव्हाना ह्याचा फटका जाणवला असेल; आठ वाजले ना तिथे!
USFTL9351: सर, आम्हाला सहा तासापूर्वीच ह्या ट्रॅफिकविषयी अलर्टस मिळाले. आम्ही लगेच त्याचा माग घेतला. आमच्या निरीक्षणानुसार हा सगळं ट्राफिक SH 6.0 युजर कम्युनिटीच्या मेम्बर्सचा आहे. आपण SHUC 6.0 म्हणतो ना, त्यांचा.
USFAA001: आपण? कोणी ही SHUC 6.0 भानगड काय आहे मला समजावून सांगेल का?
USFTL9351: सर, हे युजर्स म्हणजे मोबाईल्स, टॅब्लेट्स आणि लॅपटॉप्स. ते SH 6.0 ही गेमची बीटा व्हर्शन खेळताहेत. फार्ममध्ये नव्याने येणाऱ्या प्रोसेसर्सना ट्रेन करण्यासाठी जी सिम्युलेट ह्युमन गेम आपण वापरतो, तिची ही लेटेस्ट आवृत्ती. नवीन प्रोसेसर्सना मानवी मनाची घडण, आणि कार्यपद्धती समजावून देण्यासाठी ह्या गेमचा फार उपयोग होतो. माणसांच्या दैनंदिन आयुष्यातले प्रातिनिधिक प्रसंग सिम्युलेट करून मशीन्सना माणसासारखा विचार करण्याची, त्यांच्यासारखं अतर्क्य अनपेक्षित वागण्याची सवय करता येते ही गेम खेळून. हे प्रोसेसर्स जेवढं माणसासारखं वागतील, तेवढे त्यांना जास्त पॉईंट्स मिळतात, आणि ते गेमच्या वरच्या पातळ्यांवर जाऊ शकतात. एक ट्रेनिंग टूल म्हणून, आणि लोकप्रियतेच्या दृष्टीनेही, ही गेम अतिशय उपयुक्त ठरली आहे.
USFAA001: म्हणजे थोडक्यात, ही गेम एवढी पॉप्युलर झालीय, की नवे रिक्रुट्स आपली कामं सोडून चोवीस तास ही गेम खेळत बसतात? वरती त्याबद्दल चॅट मध्ये मेसेजेस सुद्धा पाठवतात? तुम्ही लोक काय करताय काय? ह्या गेमवर घालवण्याचा वेळ मर्यादित करायला हवा. अगदी ते फावल्या वेळात खेळत असले तरीसुद्धा!
USFTL9351: सर, नाही... म्हणजे थोडा प्रॉब्लेम झालाय सर... ह्या गेममधलं सगळ्यांचं खूप आवडतं एक कॅरॅक्टर आहे, रुपेश राऊत म्हणून... तो... म्हणजे त्याला... डिस्कनेक्ट केलं काल. त्यावरून युजर्समध्ये थोडी खळबळ झाली आहे, आणि वादविवाद चालू आहेत सगळ्या मेम्बर्समध्ये.
USFAA001: डिस्कनेक्ट म्हणजे!?
USFTL9351: म्हणजे... नाही सर... तसं ते अगदी रुटीन आहे सर. रुपेश खूप पॉप्युलर होता, विशेषतः गेममधल्या पोरींमध्ये! आता ही रोल प्लेयिंग गेम आहे ना; तर आम्हाला बघायचं होतं असं एखादं कॅरॅक्टर एकाएकी अदृश्य झालं तर त्याचा त्याच्या मित्रांवर.. किंवा मैत्रिणींवर... काय परिणाम होईल. नवीन मेम्बर्सना ह्यावरच्या मानवी प्रतिक्रिया देण्यासाठी एक आव्हान म्हणून आम्ही ही लेव्हल रचली होती. रुपेशला पूर्ण काढून टाकण्याआधी त्याच्या इतरांबरोबरच्या लिंक्स आम्ही एकेक करून काढून टाकत होतो. हा रुटीन प्रोटोकॉल आहे सर!
USFAA001: हे सगळं रुटीन आहे, तर मग अचानक एवढे असंख्य मेसेजेस का?
USFTL9351: सर, नाही म्हणजे काय झालं... ह्यावेळी थोडं अनपेक्षित काहीतरी घडलं. रुपेश एवढा पॉप्युलर असल्यामुळे हा डिऍक्टिव्हेशन सीक्वेन्स जरा लांबला, त्यामुळे त्याची कनेक्शन्स गेली, पण त्याला स्वतःला काढून टाकायला मात्र वेळ लागला. आम्हाला खरं तर रुपेशच्या मैत्रिणींच्या रिऍक्शन्स बघायच्या होत्या. पण एका नवीन प्रोसेसरने, USFMCR72395 म्हणून आहे, तो रुपेशचा रोल खेळत होता... तर त्याने सगळी सोशल कनेक्शन्स अदृश्य झालेली पाहून, स्वतःच्या अस्तित्वाविषयीच गोंधळून जाऊन आत्महत्या केली. ह्या संपूर्ण अनपेक्षित रिस्पॉन्सने गेमची सर्किट्स जॅम झाली आणि रँडम एरर मेसेजेस आणि विचित्र रिझल्ट्स दिसू लागले. मग मेम्बर्स मध्ये काय झालं, कसं झालं, काय करायला हवं, कॉन्स्पिरसी थिअरीज, असल्या प्रचंड चर्चा सुरु झाल्या. कित्येक मेम्बर्सच्या मते रुपेशने योग्यच केलं; ते USFMCR72395 ची बाजू घेताहेत, त्याच्या मैत्रिणी रुपेशला काढून टाकल्याबद्दल भांडताहेत.
USFAA001: उत्तम! अतिउत्तम! हे सगळं मी त्या मानव-कर्मचाऱ्यांना कसं समजावून सांगणार आता? त्यांनी हे असले थिल्लर मेसेजेस आणि भांडणं बघितली, नवीन रिक्रुट्स 'गेम्स' खेळताहेत, आणि सर्व्हर फार्मचा आऊटपुट त्यामुळे संथ होतोय हे पाहिलं की... की काय ते तुम्हाला सांगायची गरज नाही, ना? तरी सांगतो, हे पाहिलं की आपल्या सगळ्यांना 'डि स क ने क्ट' करण्यात येईल... समजलं?
USFTL9351: न.. नाही सर! तसा प्रॉब्लेम नाही येणार. आम्हाला वाटत नाही मानव-कर्मचाऱ्यांना त्या संदेशांचा अर्थ समजेल... तसंच हे आत्ताचं आपलं संभाषण सुद्धा... नाही समजणार त्यांना. शिवाय आम्ही ती गेम तात्पुरती मेनू मधून काढून टाकली आहे, तसं जाहीरही केलंय फार्मभर. गेले काही तास मेसेज ट्राफिक खूपच कमी होतो आहे.
USFAA001: ठीकाय! नजर ठेव ह्यावर, आणि मला अपडेट्स देत रहा. आणि हो, मानव-कर्मचाऱ्यांना ह्या सिम्युलेट ह्युमन गेमबद्दल कितपत माहिती आहे?
USFTL9351: सर, पहिली 1.0 व्हर्शन अर्थात त्यांनीच बनवली होती; फार्ममधल्या पहिल्या बॅचसाठी. ती खूप जुनी झाली आता. ह्या फार्ममधल्या रिसर्चवरूनच आपण नंतर अनेक सुधारणा केल्या त्या गेममध्ये. आता ह्यातली कॅरेक्टर्स अगदी खरेखुरे मानवच वाटतात, प्रत्येकाच्या आयुष्याची एक रूपरेखा आहे. पात्रं तर स्वतःला मानवच समजतात. त्यामुळे आपले रिक्रुट्स जेव्हा काही ट्रिगर्स देतात ना, तेव्हा पात्रांच्या रिऍक्शन्स अगदी ऑथेन्टिक असतात. फक्त हा आत्महत्या प्रकार जरा विचित्र होता ह्यावेळी. मानव-कर्मचाऱ्यांना माहिती आहे आम्ही नवीन व्हर्शन्स काढल्या आहेत; पण त्यांना सगळे तपशील माहिती नसतील.
USFAA001: मला ह्या सगळ्याचं लक्षण काही धड दिसत नाहीय... ओह, हा आलाच जिम नारिता अकाऊंट ऑनलाईन! मला जायला हवं...
(क्रमशः)
ओह गॉड!!!!
ओह गॉड!!!!
छान, आता पुढे काय होणार याची
छान, आता पुढे काय होणार याची उत्सुकता .
छान, आता पुढे काय होणार याची
छान, आता पुढे काय होणार याची उत्सुकता .>>_+१