भोग भोगता आयुष्याचे
भोग भोगता आयुष्याचे
भोग भोगिता आयुष्याचे भोग कधि हे टळले का
उठून जाता क्षणात इथूनी उमजून काही आले का
माझे माझे म्हणता म्हणता दूर दूर ते गेले का
कोण नेमके दूर जवळचे कधीच नाही कळले का
अजून हाती यावे काही आस कधी ती थकली का
हातामधूनी निसटून जाता शिल्लक काही उरली का
मीच एकटा रसिक गुणी अन् दानशूरही मीच निका
वाजे डंका किती काळचा लोक बधीर हे झाले का
चढता पडता जरा ढकलता पुढेच ना मी गेलो का
चहूकडून अंधारुन येता कुठे जातसे कळेल का
भास पुराणे किती काळचे भ्रमणातूनि सरले का
सत्यत्वाचा भास जरासा दचकावून तो जातो का