रातभूल..(मी मुसाफिर एकटा..)
रातभूल..(मी मुसाफिर एकटा..)
ती शरदामधली रात्र
अन मी गावाकडल्या घरी
पहुडलो बाजेवरती
लिंब ढाळे चवरी वरी
ती शिशिरामधली रात्र
अन मी उघड्या माळावरी
तृणपाती हलवी वारा
मज भरे थंड शिरशिरी
ती अचंद्र काळी रात्र
अन मी रानवाटे वरी
काजऽवे लगडले तरुला
ठिणग्या हलती खाली वरी
ती चांदणकाळी रात्र
अन् मी उजाड दुर्गावरी
आसमंती मी एकटा
पेटत्या दिवट्या दिसती दुरी
ती लखलखणारी रात्र
अन मी उघड्या व्योमाखाली
चांदणफुले चमकती गगनी
उधळण रत्नांची अंबरी