झरा निळा सावळा
डोंगरमाथ्यावरुन झरते हळुहळु झुळझुळा
वाहत जाई शुभ्रजल ते प्रतिबिंबे घननिळा
इथले तिथले मिसळत बिलगत रुंदावे ते पाणी
दगडादगडातून जन्मला झरा शुभ्र अन् निळा
सपाट रानी काठांवरती तरुवेलींची दाटी
संथ प्रवाही वाहत जाई प्रौढ झरा सावळा
संथावल्या पाण्यामध्ये उठवी तरंग मासोळी,
क्षणी त्याच टिपे तिला ध्यानस्थ शुभ्र बगळा
काठावरच्या वृक्षावरती सानरंगुला पक्षी
लकेर घेई मजेत फुलवून गळा निळाजांभळा
हलके हलके वहात जाई पान एक हिरवे
खुडलेल्या सृजनाचा तरंगत जाई सोहळा
निर्झर
निर्झर होता एक बारीकसा; हिरव्या डोंगरातून वाहतसा
असुनी तो लहान छोटा; ठावूक नव्हत्या पुढल्या वाटा ||
धरतीवरच्या वर्षावाने; जीवन त्याचे सुरू जहाले
धरणी जाहली माता ती; अल्लड खट्याळ उदकाची ||
नित नवीन भरून जलाने; ठावूक त्याला भरभरून वाहणे
चंचल उत्कट उल्हासीत पाणी; घेवूनी जायी दो काठांनी ||
पुढेच मिळाली सरिता त्याला; सवे वाहण्या पुसे खळाळा
विचारही न करता तो मिळाला; निर्मळ नदीत एकरूप जाहला ||
- पाषाणभेद
१५/०७/२०१९
अंतरातले गाणे
अंतरातले गाणे वेडे
भरभरून येते की ओठी
येवो जावो ऊन—पावसा
झरा वाहतो कडेकपाटी
ग्रीष्मी सुकूनी क्षीण होतसे
पुन्हा कुठूनी तो येतो भरुनी
कळेचना तो उगम तेथीचा
निरखित त्याचे कवतिक दूरुनी
वार्यामधूनी गगनामधुनी
देतो घेतो कुठल्या ओळी
रोखू न शकती गतिमानता
फत्तर हो का माती काळी
विहरत जाता गाणे अवघे
समरसून मन जाते बुडूनी
लहरींवर हिंदोळत जाता
गाणे विरते उगम जेथुनी