माझा गाव
शेण मातीने पोतले खळे माझ्या अंगणात
आंबा पोफळीची बने उभी माझ्या परसात
एका लयीत डोलती वार्यासंगे उंच माड
त्यात दिमाखाने उभे फणसाचे मोठे झाड
आहे चवही अवीट त्या आंबा-फणसांची
दारी फुलबाग फुले जाई जुई अबोलीची
लाल मातीतील वाट नागमोडी चालताना
पायी गारवाच मिळे जसा मेंदी लावताना
येई गोड दरवळ फळ फुल मोहोराचा
जणू अत्तर सांडतो भात आंबेमोहोराचा
माड बनाच्या पल्याड सागराची गाज येई
सूर्योदयी गजराने त्याच्या आम्हा जाग येई
त्याचा सूर्यास्त ही मोठा असे सुंदर देखणा
दमल्या सूर्यास कवेत जणू पाजतसे पान्हा