Submitted by तो मी नव्हेच on 1 August, 2020 - 06:06
शेण मातीने पोतले खळे माझ्या अंगणात
आंबा पोफळीची बने उभी माझ्या परसात
एका लयीत डोलती वार्यासंगे उंच माड
त्यात दिमाखाने उभे फणसाचे मोठे झाड
आहे चवही अवीट त्या आंबा-फणसांची
दारी फुलबाग फुले जाई जुई अबोलीची
लाल मातीतील वाट नागमोडी चालताना
पायी गारवाच मिळे जसा मेंदी लावताना
येई गोड दरवळ फळ फुल मोहोराचा
जणू अत्तर सांडतो भात आंबेमोहोराचा
माड बनाच्या पल्याड सागराची गाज येई
सूर्योदयी गजराने त्याच्या आम्हा जाग येई
त्याचा सूर्यास्त ही मोठा असे सुंदर देखणा
दमल्या सूर्यास कवेत जणू पाजतसे पान्हा
माझ्या गावची मासोळी अशी लागे रूचकर
तिची चव रेंगाळते सदा माझ्या जिभेवर
माझ्या गावचा माणूस जणू काटेरी फणस
आत तांदळाचा मोदक अन् गोड खरवस
जेव्हा येते मला सय माझ्या गाव कोकणाची
नांदे समाधान मनी कृपा राहो गणेशाची
- रोहन
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप सुंदर लिहिलं आहे
खूप सुंदर लिहिलं आहे
आहाहा!!! आम्हा देशावरच्या
आहाहा!!! आम्हा देशावरच्या लोकांना हे गावाकडचं सुख कळायच नाही. त्याकरता मग कुठे सहल काढा कुठे निसर्गरम्य परीसरांना भेटी द्या. कविता फार सुंदर आहे.
धन्यवाद द्वैतजी, धन्यवाद सामो
धन्यवाद द्वैतजी, धन्यवाद सामो जी
@सामो, मी पण तसा देशावरीलच आहे, मूळ गाव सह्याद्रीच्या अलीकडे, कोल्हापूर जिल्ह्यातील. कोकणात वरचेवर जाऊन जे अनुभवले आहे ते लिहिले.
Sundar.... Mamach gaav
Sundar.... Mamach gaav athaval....kokanach chan varnan kelay....
धन्यवाद चस्मिष
धन्यवाद चस्मिष
छानच आहे.
छानच आहे.
एक छोटीशी सुचवणी : कोंकणात आंबेमोहोर तांदूळ फारसा होत नाही. तो सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर अधिकतर होतो.
छान आहे कविता.
छान आहे कविता.
धन्यवाद हीरा, धन्यवाद मानव
धन्यवाद हीरा, धन्यवाद मानव
@हीरा सुचवणी साठी धन्यवाद.... तिथे दुसरे काही सुचल्यास नक्की बदल करेन