उडायची इच्छा कोणाची नसते? विमानातून गेल्यावर हेलिकॉप्टरमधे बसावसं वाटतं आणि मग तर वाटतं की आपणच उडावं मस्त पक्ष्यांसारखं. समुद्री खेळ खेळताना बोटीतून पॅराग्लायडिंग केलं होतं ज्यात ग्लायडर बोटीला बांधलेलं असतं नी आपण त्याबरोबर हवेत उडत असतो. तो छोटासा अनुभव आवडला होता आणि कधीतरी त्या दोरीचे बंधन तोडून आपले आपण हे पंख घेऊन उडायचं नक्की केलं होतं. पुण्या-मुंबईत कित्येक वर्षे राहत असूनही कामशेतला हे उडायचे धडे घ्यायचं सुचलं नाही. दूर गेल्यावर जाणवलं आणि सुट्टीत घरी आल्यावर उडायचं नक्की केलं. पण मला ते डबल सीट tandem पण नव्हतं उडायचं, एकटीने आपल्याआपण उडायचं होतं.