भाग १ : https://www.maayboli.com/node/84447
भाग २: https://www.maayboli.com/node/84450
भाग ३: https://www.maayboli.com/node/84454
================================================================
मे, जून महिन्यात ऑफिस आणि पॅराग्लायडिंग अशी कसरत करत भरपूर सेशन केले. सोबतीला स्कूल मध्ये ग्राउंड स्कूल 1, ग्राउंड स्कूल 2 आणि ग्राउंड स्कूल 3 असे तीन क्लासरूम सेशन्स झाले. त्यात सेफ्टी, हवामान, उड्डाणाचे नियम (अगदी कमर्शिअल पायलटला असतात तसेच नियम पॅराग्लायडिंगला ही लागू आहेत), कॅनडा एअर ट्रान्सपोर्टची नियमावली अशी माहिती देण्यात आली. उद्देश होता पायलटच्या परीक्षेची तयारी करणे.
ह्या दीड महिन्यात आम्ही सगळ्यांनी भरपूर ग्राउंड हॅण्डलिंग केले. पायलट होण्यासाठी किमान २५ छोट्या फ्लाईट हव्या असतात आणि एक लेखी परीक्षा द्यावी लागते. मी २६ छोटया फ्लाईट पूर्ण केल्या. सोबतच पायलट कोर्सला रजिस्टर केले होते तेव्हा स्कूलने पॅराग्लायडिंगचे पुस्तक दिले त्याचेही वाचन सुरूच होते. त्यामुळे लेखी परीक्षेची तयारी ही झाली होती.
स्कूलने दिलेले पुस्तक
लेखी परीक्षा तशी फार कठीण ही नव्हती आणि सोपी ही नव्हती. आता पर्यंत जे शिकलो त्याची ती उजळणी होती. आमच्या बॅच मधील सगळेच विद्यार्थी लेखी परीक्षेत पास झाले.
आता पुढची पायरी होती Hang-gliding and Paragliding Association Of Canada (HPAC) ची मेंबरशिप घेणे. मेंबरशिप घेतल्यावर संस्थे तर्फे आपल्याला पायलट लायसेन्स इश्यू होते आणि मग आपण High Flights म्हणजे उंच डोंगरावरून फ्लाईटस् घ्यायला सिद्ध होतो. फ्लाईंग स्कूल कडूनच हे सगळे डॉक्युमेंटेशन करून घेण्यात आले. आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना मेंबरशिप मिळाली आणि सोबतीला आमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वतःचे ग्लायडर ही ऑर्डर केले. मी सुद्धा ग्लायडर ऑर्डर केले आणि नव्या ग्लायडरची टेस्ट फ्लाईट घेतली.
कोर्स पूर्ण केला, परीक्षा पास झालो, मेंबरशिप मिळाली आणि ग्लायडर ही घेतले...सगळे सोपस्कार पार पाडून मी पायलट होण्यास सिद्ध झालो. आता फक्त बाकी होता ग्रॅज्युएशन सोहळा म्हणजेच हाय फ्लाइट, ही फ्लाईट म्हणजे एका मोठ्या आणि उंच डोंगरावरून आकाशात उडणे. एखाद्या गरुडाची पिल्ले जशी उंच कड्यावरून उडी घेत आपली पहिली मोठी भरारी घेतात तसेच.
आमच्या या हाय फ्लाइट्सचे स्थळ होते कॅनडा मधील ब्रिटिश कोलंबिया भागातील "माउंट 7". आमच्या ह्या हाय फ्लाइट्स साठी बॅच मधील सगळे विद्यार्थी आणि फ्लाईंग स्कूल मधील प्रशिक्षक ह्यांनी जुलै लाँग वीकेंडच्या आधीच्या रात्री माउंट 7 च्या पायथ्याशी असणाऱ्या गोल्डन शहराजवळील निकोल्सन येथील जाण्याचे ठरवले. लाँग वीकेंड असल्याने आम्ही दोघेही जोडीने जाण्याचे ठरवले. 3 दिवसात शक्य होईल तेवढ्या फ्लाइट्स करायच्या आणि दुपारच्या वेळी जेव्हा फ्लाईंग होत नाही तेव्हा आजूबाजूचा प्रदेश फिरायचा.
गुरुवारी दुपारीच घरातून निघालो आणि संध्याकाळच्या आत कॅम्प साईटवर पोहोचलो. छानपैकी कॅम्प सेटअप केला आणि सकाळची तयारी करून लवकर झोपलो.
कॅम्पसाइट
सकाळी 8 वाजता सगळी मंडळी जमली आणि आम्ही माउंट 7 कडे कूच केला. डोंगरावर गेलो तेव्हा उन्हाळा असूनही वातावरण गार होते. महत्वाचे म्हणजे आजूबाजूला कुठेही बर्फ नव्हता. सगळ्यांनी वातावरणाचा अंदाज घेतला.. आजचे वातावरण आयडील म्हणावे तसे वातावरण होते.. लाईट विंड, ती सुद्धा अगदी हव्या त्या दिशेने... मनमे लड्डू फुटा टाईप. सगळेच आनंदी झाले. सगळ्यांनी आपले नवे कोरे ग्लायडर ओपन केले, सगळे सेफ्टी चेक्स केले आणि आपला क्रम येण्याची वाट बघत उभे राहिले.
माऊंट 7 वरून लाँच करतांना
सुरुवातीला थोडे वजनदार पायलट आणि त्यांच्या मागे माझ्यासारखे वजनाने हलके पायलट असा क्रम ठरला होता. माझा क्रम येई पर्यंत हवेत अजून थोडा उबदारपणा आला होता. थोड्याच वेळात माझा क्रम आला आणि मी तयार झालो. उतारावरून धावत गेलो आणि काही कळायच्या आत मी हवेत होतो.. उंच डोंगरावरून माझी ही पहिली झेप अगदी स्वप्नवत होती.. जवळपास 25 मिनिटे मी आकाशात उडत होतो...स्वच्छंद पक्ष्याप्रमाणे.
आकाशी झेप घे रे पाखरा
खाली उतरलो तेव्हा बायको वाट बघत होती माझ्या प्रमाणे तिच्याही मनातील आनंद अक्षरशः गगनात मावेनासा होता. माझ्या पाठोपाठ माझे उर्वरित बॅचमेटही सुखरूप खाली आले सगळ्यांच्या पहिल्या हाय फ्लाईट सक्सेसफुल झाल्या आणि आज आम्ही खऱ्या अर्थाने पॅराग्लायडिंग पायलट झालो.
निकोल्सन नदीवरून फ्लाय करताना
उडी उडी जाय
म्हणतात ना sky is the limit.. पण आमच्यासाठी "Sky is not the limit.. it is our playground"
(समाप्त)
मस्त..
मस्त..
खूप छान लेखमाला. १ प्रश्न आहे
खूप छान लेखमाला आणि पॅराग्लायडिंग पायलट झाल्याबद्दल अभिनंदन. १ प्रश्न आहे, उतरताना दरीत उतरून परत डोंगरावर यावे लागते का? की जिथून सुरुवात केली तिथेच उतरता येते? थोडक्यात विचारायचे तर पक्षी जसे खालून वर जातात, तसे ग्लायडरने जाता येते का?
धन्यवाद मनिम्याऊ आणि उपाशी
धन्यवाद मनिम्याऊ आणि उबो
१ प्रश्न आहे, उतरताना दरीत
१ प्रश्न आहे, उतरताना दरीत उतरून परत डोंगरावर यावे लागते का? की जिथून सुरुवात केली तिथेच उतरता येते? थोडक्यात विचारायचे तर पक्षी जसे खालून वर जातात, तसे ग्लायडरने जाता येते का?
नवीन Submitted by उपाशी बोका on 17 December, 2023 - 23:30
>>>>
खूप छान प्रश्न
हो, अगदी हवे तसे आणि हवे त्या ठिकाणी उतरता येते. (थोडी हवामानाची माहिती आणि हवामानाची सोबत लागते). अगदी पक्षी जसे खालून वर जातात तसेही जाता येते. जिथून सुरुवात केली तिथेही उतरता येते, ह्याला बऱ्याच ठिकाणी Top Landing म्हणतात. तसेच एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाता येते, ह्याला क्रॉस कंट्री (XC) म्हणतात.
तुमचा landing zone (LZ) कुठे आहे यावर तुमचे कंट्रोल असलेच पाहिजे नाही तर बरेच वेळा क्रॅश लँडिंग किंवा displaced landing होते.
मी सुरुवातीच्या भागात जसे लिहिले आहे कि स्कायडायविंग म्हणजे वरून खाली येणे तर पॅराग्लायडिंग म्हणजे खालून वर जाणे. पॅराग्लायडिंग मध्ये वातावरणातील गरम हवा (thermals) चा उपयोग करून तासंतास उडाण करता येते.
पॅराग्लायडिंगचा लॉंगेस्ट अंतराचा रेकॉर्ड तब्बल ६१० किमी आहे, वेळ म्हणाल तर हि ऍक्टिव्हिटी फक्त दिवसाच्या उजेडात होते त्यामुळे जेवढा दिवस मोठा तेवढे जास्त वेळ उडाण करता येते. माझ्या ओळखीतील काही पायलट ने सलग १२ तास हि उडाण केले आहे. आणि विशेष म्हणजे ह्यात कुठलेही इंजिन न वापरात फक्त वाऱ्याचा वापर आणि हवामानाची माहिती याचा उपयोग करून.
जबरदस्त झालाय हा भाग पण
जबरदस्त झालाय हा भाग पण.अमक्याच ठिकाणी उतरायचं हे कसं जमवतात?ठिकाणाच्या जवळ आलं की कोणता गिअर दाबायला असतो का?किंवा रिक्षा सारखं टर्न हँडल?
जबरदस्त झालाय हा भाग पण
जबरदस्त झालाय हा भाग पण.अमक्याच ठिकाणी उतरायचं हे कसं जमवतात?ठिकाणाच्या जवळ आलं की कोणता गिअर दाबायला असतो का?किंवा रिक्षा सारखं टर्न हँडल?
>>> धन्यवाद मी अनु
अमक्याच ठिकाणी उतरायचं हे कसं जमवतात? -- जिथे उतरायचे आहे ते ठिकाण दृष्टीक्षेपात आले कि altitude कमी करायचा, ह्या साठी बऱ्याच पद्धती आहेत. त्या वापरून हळू हळू खाली यायचे.
ठिकाणाच्या जवळ आलं की कोणता गिअर दाबायला असतो का?किंवा रिक्षा सारखं टर्न हँडल? -- गियर नसतो पण ब्रेक असतात, दोन्ही हातात ब्रेक असतात, ज्या हाताचा ब्रेक ओढला त्या दिशेला वळता येते. पायाजवळ स्पीड बार असतो, त्याने वेग कमी जास्त करता येतो माझ्या ग्लायडरचा ट्रिम स्पीड (नॉर्मल स्पीड) तशी ४० kmph च्या जवळ आहे. ह्यात विंड स्पीड ऍड केला तर फ्लाईंग स्पीड मिळतो. Downwind (पाठीमागून येणारी हवा) असेल तर स्पीड वाढतो आणि Upwind ह्याच्या उलट.. उतरताना नेहमी upwind उतरतात. हे अगदी विमानाच्या टेकऑफ आणि लँडिंग सारखे आहे. same principle.
खूपच आव्हानात्मक आणि धाडसी
खूपच आव्हानात्मक आणि धाडसी उपक्रम मध्यलोक! तुमचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन!!
मला पण ते लँडिंग कसे काय होते याचे खूप आश्चर्य वाटते. लँडिंग साठी तो हवेचा दाब वगैरे कसा कमी करायचा ?..आणि उडत असताना अचानक ग्लायडर मध्ये काही बिघाड वगैरे झाला तर..(म्हणजे आपली नेहमीची मध्यमवर्गीय भीती...)
धन्यवाद, मध्यलोक.एकदम चांगलं
धन्यवाद, मध्यलोक.एकदम चांगलं समजावून सांगितलंत.
भारी!
भारी!
हौस म्हणून एकदा उडणं वेगळं आणि नीट शिकून घेऊन उडणं वेगळं. पेशन्स ठेवून शिकून यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन.
(तुम्ही आता पायलट झालात म्हणजे तुम्ही अजून एखाद्याला, म्हणजे मित्राला, पत्नीला वगैरे सोबत घेऊन उडू शकता का?)
धन्यवाद स्वान्तसुखाय, मी अनु
धन्यवाद स्वान्तसुखाय, मी अनु आणि वावे
सुरेख झाली रे लेखमाला.
सुरेख झाली रे लेखमाला.
प्रश्नोत्तरांचा भाग लेखातच जोड किंवा लेखमाला अजून एका भागाने वाढव.
मला पण ते लँडिंग कसे काय होते
मला पण ते लँडिंग कसे काय होते याचे खूप आश्चर्य वाटते. लँडिंग साठी तो हवेचा दाब वगैरे कसा कमी करायचा ?..आणि उडत असताना अचानक ग्लायडर मध्ये काही बिघाड वगैरे झाला तर..(म्हणजे आपली नेहमीची मध्यमवर्गीय भीती...)
Submitted by स्वान्तसुखाय on 18 December, 2023 - 06:18
>>>>>>
लँडिंग साठी तो हवेचा दाब वगैरे कसा कमी करायचा ? >>> हवेचा दाब कमी नाही करत, ब्रेक्स लावून अल्टीट्युड कमी केला जातो, किंवा स्पीड वापरून जिथे पोहोचायचे आहे त्या लँडिंग झोन (LZ) जवळ जाण्याचा प्रयत्न करतात आणि मग डिसेंडं तंत्र वापरून खाली येतात.
उडत असताना अचानक ग्लायडर मध्ये काही बिघाड वगैरे झाला तर >>> हो असा बिघाड होऊ शकतो, त्या वेळेत करायच्या उपाययोजना थोड्या वेगळ्या असतात. ह्या उपाययोजना शिकण्यासाठी SIV (Safety In Vol - Vol हा हवेसाठी फ्रेंच शब्द आहे) म्हणजेच "सेफ्टी इन एअर" असा एक वेगळा कोर्स करावा लागतो, त्यात अनेक गोष्टी शिकवल्या जातात. सहसा १० तासांचा एअर टाइम झाल्यावर हा कोर्स करतात. (मी हा कोर्स २०२४ मध्ये करण्याचा विचार करतोय). तसेच ह्या उपाययोजने सोबतच प्रत्येक पायलट च्या हार्नेस मध्ये एक पॅराशूट असतं, जे आपत्कालीन परिस्थितीत वापरल्या जाऊ शकते. हे पॅराशूट म्हणजे स्कायडायविंग, बेस जम्पिंग, विंग सूट फ्लॅईंग इत्यादी मध्ये वापरले जाते तसेच असेल. ह्याला बरेच वेळा "रिसर्व्ह" किंवा "रिसर्व्ह शूट" असेही म्हटले जाते. मुख्य कॅनोपी (इथे पॅराग्लायडर) व्यतिरिक्त हे शूट असते. म्हणजे पॅराग्लायडर जरी बिघडले तरी ह्याचा वापर करून सेफ लँडिंग करण्याचा प्रयत्न असतो.
तुम्ही आता पायलट झालात म्हणजे
तुम्ही आता पायलट झालात म्हणजे तुम्ही अजून एखाद्याला, म्हणजे मित्राला, पत्नीला वगैरे सोबत घेऊन उडू शकता का?
Submitted by वावे on 18 December, 2023 - 07:40
सध्या नाही, सध्या मी P१/ P२ असा हौशी/novice/beginner साठी फ्लॅईंग परवानगी देणारा कोर्स केला आहे. माझ्या सोबत कोणाला घेऊन उडण्यासाठी मला P३/P४ कोर्स करावा लागेल, अजून जास्त फ्लॅईंग अवर्स ऍड करावे लागतील आणि माझे ग्लायडर बदलावे लागेल. सध्या माझ्याकडे असलेले ग्लायडर हे माझ्या वजनाच्या रेटिंगचे आहे. अजून एक व्यक्ती ऍड करण्यासाठी मला जास्त वजन रेटिंग चे ग्लायडर घ्यावे लागेल.
गमतीची बाब म्हणजे माझे वजन सगळ्यात कमी कॅटेगरी च्या वजनात येते, पण मी सगळ्यात जास्त वजन रेटिंग चे पंख घेऊन कुठल्याही व्यक्तीला सोबत नेऊ शकतो. हे म्हणजे सडपातळ बस ड्राइव्हर ने मोठी बस चालविण्या सारखे आहे
सुरेख झाली रे लेखमाला.
सुरेख झाली रे लेखमाला.
प्रश्नोत्तरांचा भाग लेखातच जोड किंवा लेखमाला अजून एका भागाने वाढव.
Submitted by हर्पेन on 18 December, 2023 - 10:16
धन्यवाद हर्पेन
नक्की प्रयत्न करतो, इंफॅक्ट डोक्यात विचार होता पण विषय खूप टेकनिकल होईल म्हणून लिखाणाचा विचार केला नाही.
उलट जसे प्रश्न येतील तसे सोप्या भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न करेनच आणि जसे फ्लॅईंग वाढेल तसे अजून काही अनुभव शेयर करेन, त्या साठी नवा धागा हि काढता येईल.
छान झाले सगळे भाग. २५ मिनिटे
छान झाले सगळे भाग. २५ मिनिटे हवेत ते पण चौथ्या दिवशी म्हणजे मोठीच डेरींग झाली. टेंपल पायलट मध्ये कमी उंचीवरून उडवतात. ही जी टेकडी दिसते तिच्या टोकावरून.
७ आणि १० दिवसांचा कोर्स असतो
७ आणि १० दिवसांचा कोर्स असतो त्यात उंचीवरून उडवतात.
धन्यवाद बोकलत
धन्यवाद बोकलत
२५ मिनिटे हवेत ते पण चौथ्या दिवशी म्हणजे मोठीच डेरींग झाली >> चौथ्या दिवशी नाही, ३ दिवसीय कोर्स (एप्रिल महिना) नंतर दिड महिना सराव केला आणि पायलट कोर्सची तयारी केली. १ जुलैच्या विकांतला पहिली मोठी फ्लाईट झाली.
टेंपा ची साईट छान दिसतेय
हो आता सविस्तर वाचले सगळे भाग
हो आता सविस्तर वाचले सगळे भाग. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथे तुम्ही प्रॅक्टिस केली पहिल्या दोन भागात ती जागा छान प्लेन दिसते. इकडे तशी साईट मिळणे अवघड आहे. जरा जरी अंदाज चुकला तर दगड नाहीतर काटेरी झुडूप यांच्याशी गळाभेट ठरलेली आहे. इकडे हॉप करताना आपल्या हर्नेसला दोरखंड बांधतात आणि दोन मुलं खेचतात. साधारण २५ ३० फूट वर गेलो की कंट्रोल करायला सांगतात. बनी हॉपला इकडे मिनी फ्लाईट बोलतात. ते करताना मी दोन्ही ब्रेक किंचित मागे ओढून ठेवायचो.त्यामुळे सुरवातीपसूनच एअरबॉर्न व्हायचो. तुम्हाला सराव करायला मिळतोय हा एक मोठा प्लस पॉईंट आहे. सध्या माझा या ॲक्टिव्हीटीला पास आहे. पुढे जाऊन चांगला पायलट झालो तर सांगतो तुम्हाला. भारतात आल्यावर जाऊ मग दोघे.
सगळे भाग वाचले
सगळे भाग वाचले
हे कामशेतला असे उडणारे लोकं पाहिले होते
पण त्यामागचे टेक्निक, आणि इतर गोष्टी काहीच माहीत नव्हते.
लेख वाचून बरीच माहिती मिळाली.
हवेत तरंगण्याची मजा काही औरच!
भितीवर कशी मात होते? किंवा करावी?
बाकी टेक्निकल माहितीसोबत हे ही लिहाच.
हे कधी जमेल का माहीत नाही पण कमीत कमी समद्रावर बोटीला बांधून उडवतात ते तरी करावे अशी इच्छा आहे.
बाय द वे, एक त्रिकोणी देखील ग्लायडर असते ना?
चित्रपटात पाहिलंय
Submitted by बोकलत on 18
Submitted by बोकलत on 18 December, 2023 - 13:59
सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथे तुम्ही प्रॅक्टिस केली पहिल्या दोन भागात ती जागा छान प्लेन दिसते. >> हो इथली प्रॅक्टिस साईट छान आहे, मस्त प्लेन आणि गवत, ग्राउंड हॅन्डलिंग साठी सुयोग्य आणि शॉर्ट फ्लाईट साठी पण छान.
इकडे हॉप करताना आपल्या हर्नेसला दोरखंड बांधतात आणि दोन मुलं खेचतात. >> हे इंटरेस्टिंग आहे
बनी हॉपला इकडे मिनी फ्लाईट बोलतात. ते करताना मी दोन्ही ब्रेक किंचित मागे ओढून ठेवायचो.त्यामुळे सुरवातीपसूनच एअरबॉर्न व्हायचो. >> येस, फास्टर way
तुम्हाला सराव करायला मिळतोय हा एक मोठा प्लस पॉईंट आहे. सध्या माझा या ॲक्टिव्हीटीला पास आहे. पुढे जाऊन चांगला पायलट झालो तर सांगतो तुम्हाला. भारतात आल्यावर जाऊ मग दोघे. >> नक्की प्रयत्न करा
धन्यवाद झकासराव
धन्यवाद झकासराव
हवेत तरंगण्याची मजा काही औरच! >>> १००%
भितीवर कशी मात होते? किंवा करावी? >>> सराव आणि सेफ्टीचा आग्रह, बाकी पहिल्या फ्लाईट ला थोडी भीती वाटतेच, साहजिक आहे ते
हे कधी जमेल का माहीत नाही पण कमीत कमी समद्रावर बोटीला बांधून उडवतात ते तरी करावे अशी इच्छा आहे. >> नक्की करा, पुण्यात असाल तर हडपसर येथे ग्लायडिंग क्लब आहे, तिथे दर रविवारी tandem flights आणि जॉय राईड होतात, आम्ही तिकडे जायचो तेव्हा फक्त १८७ रुपये एवढी फी असायची, फक्त बुकिंग आधी करावे लागते आणि वैटिंग खूप असते. तिथेही तुम्ही paragliding चा अनुभव घेऊ शकता, तिथले ग्लायडर हे एका छोट्या विमाना सारखे असते, दोरीने ओढून त्याला गती देतात (winch वापरून). त्याचा try करू शकता
एक त्रिकोणी देखील ग्लायडर असते ना? >>> हो, त्याला हँग ग्लायडर म्हणतात, मी जिथे ग्लायडिंग शिकलो तिथे हे पण शिकवले जाते.
माझ्या ग्रुप मधील एकाच्या हँग ग्लायडिंगच्या लँडिंग चा एक छोटा विडिओ केला होता, आमच्या YouTube चॅनल ला पोस्ट केला होता त्याची लिंक देतोय. एक मिनिट चा छोटासा विडिओ आहे सगळ्यांना आवडेल नक्की बघा
YouTube चॅनेल - Mountain Couple
https://youtu.be/YRj1825j_wU?si=47tVJb-zD_fTfSUR (हँग ग्लायडर लँडिंग)
Ok मध्यलोक
Ok मध्यलोक
हडपसरच्या ग्लायडिंग क्लब बद्दल ऐकलेलं आहे फक्त
मस्त झाली लेखमाला ! मे
मस्त झाली लेखमाला ! मे महिन्यात ब्रिटिश कोलंबियात लोकं उडताना बघितले होते त्यातले तुम्ही एक असाल
हडपसरच्या ग्लायडिंग क्लब
हडपसरच्या ग्लायडिंग क्लब बद्दल ऐकलेलं आहे फक्त >> वेळ मिळाला तर तिथे नक्की भेट द्या
मस्त झाली लेखमाला >>> धन्यवाद
मस्त झाली लेखमाला >>> धन्यवाद मंजूताई
मे महिन्यात ब्रिटिश कोलंबियात लोकं उडताना बघितले होते त्यातले तुम्ही एक असाल >> हो कदाचित
मस्त आहे मालिका. फोटोंनी जान
मस्त आहे मालिका. फोटोंनी जान आणली.
तुमचे गणेशोत्सवातल्या धाग्यांवरचे फोटो पाहता इथे आणखी फोटो हवे होते ही अपेक्षा होती. जमल्यास एक भाग आणखी निव्वळ फोटो आणि व्हिडीओजसाठी येऊ द्यात. उत्सुकता आहे.
एव्हढे एक अॅडव्हेंचर स्पोर्ट्स राहून गेले. आता ते जमणार नाही. पण सांगता येत नाही. पुन्हा इच्छा तीव्र झाली तर होईल पण.
त्या वेळी मात्र या लेखमालिकेची खूपच मदत होईल. अशा सर्वच इच्छुकांसाठी उत्तम मालिका आहे.
या आधी शापित गंधर्व यांनी पण मायबोलीवर असे लिखाण केले आहे आणि बहुतेक एका स्त्री सदस्याने पण. एक वेगळा ग्रुप हवा आहे.
रआ, पुन्हा एकदा धन्यवाद.
रआ, पुन्हा एकदा धन्यवाद.
प्रतिसाद द्यायला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व
तुमचे गणेशोत्सवातल्या धाग्यांवरचे फोटो पाहता इथे आणखी फोटो हवे होते ही अपेक्षा होती. जमल्यास एक भाग आणखी निव्वळ फोटो आणि व्हिडीओजसाठी येऊ द्यात. उत्सुकता आहे. >> अगदी मान्य, पण flying च्या प्रत्येक वेळी सौ सोबत नसल्याने अनेक वेळा फोटो काढायचे राहिले. आणि इथे विडिओ शेयर करण्याची तशी थेट सोय नाही त्यामुळे विडिओ शेयर करता आले नाहीत.
पण आमच्या Mountain Couple या YouTube चॅनेल वर ३ छोट्या भागात विडिओ शेयर करण्याचा प्रयत्न केला आहे. दोन भाग प्रकाशित झाले आहेत त्याची लिंक वेगळ्या प्रतिसादात देतोय. तिसरा भाग आज शुक्रवारी संध्याकाळी (भारतीय वेळेनुसार शनिवार सकाळी प्रकाशित होईल) तेव्हा त्याचीही लिंक देईनच. लिखाणाप्रमाणे विडिओ सुद्धा आवडतील ह्याची खात्री आहे.
एव्हढे एक अॅडव्हेंचर स्पोर्ट्स राहून गेले. आता ते जमणार नाही. पण सांगता येत नाही. पुन्हा इच्छा तीव्र झाली तर होईल पण.
त्या वेळी मात्र या लेखमालिकेची खूपच मदत होईल. अशा सर्वच इच्छुकांसाठी उत्तम मालिका आहे. >> कुठल्याही वयात सहज आणि सोप्या पद्धतीने जमणारा असा हा adventure स्पोर्ट आहे, आमच्या वर्गात साठी पार केलेले काका सुद्धा होते. फक्त तुम्हाला वेळ द्यायला जमले पाहिजे. कधीही वेळ मिळाला तर ह्या खेळाचा नक्की विचार करा.
या आधी शापित गंधर्व यांनी पण मायबोलीवर असे लिखाण केले आहे आणि बहुतेक एका स्त्री सदस्याने पण. एक वेगळा ग्रुप हवा आहे. >> शापित मित्र आहे, दुर्गभ्रमण मुळे कनेक्टेडहि आहोत. शापितने sky diving बद्दल लिखाण केले होते. छान लेख आहे तो. बाकी paragliding वर "सोनू" यांच्या लेखाची लिंक उपाशी बोका यांनी पहिल्या भागाच्या कंमेंट सेक्शन मध्ये दिली आहे. तो हि छान लेख आहे. त्यात GIF सुद्धा आहेत.
Learning Paragliding | EP -1
Learning Paragliding | EP -1 | The Start | With English Subtitles
https://youtu.be/8jxvkbT_Chc?si=0ws8npJCe58hVxOQ
Learning Paragliding | EP -2 | The First Flight | With English Subtitles
https://youtu.be/vs6V5s0YVu8?si=7J7sokm6uvFiAYPq
Mountain Couple या आमच्या YouTube चॅनेल वर paragliding चे विडिओ पोस्ट केले आहेत नक्की बघा तुम्हा सगळ्यांना आवडतील. पहिला विडिओ ४ मिनिट ३५ सेकांदाचा आहे तर दुसरा ४ मिनिट ४० सेकांदाचा.
छान लिहिले आहे. सुरेख अनुभव.
छान लिहिले आहे. सुरेख अनुभव. अभिनंदन. गोल्डन सुंदर आहेच, तिथे फिल्ड जवळ एक पाचू सारखं तळं आहे. फोटो छान आहेत. व्हिडिओ बघितला. कॅलगरी, BC, कॅनडा ❤️❤️
Learning Paragliding | EP -3
Learning Paragliding | EP -3 | Becoming Pilot | With English Subtitles
https://youtu.be/YTizV-ii23M?si=qwY8HkoN4nKXkFVa
तिसरा भाग इथे द्यायला उशीर झाला. _/\_
हा भाग सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. यात हाय फ्लाईटचे अनुभव आणि विडिओ आहेत