गगनात न मावणारा गगनातला आनंद - पॅराग्लायडिंगचा अनुभव

Submitted by सोनू. on 12 March, 2019 - 09:04

उडायची इच्छा कोणाची नसते? विमानातून गेल्यावर हेलिकॉप्टरमधे बसावसं वाटतं आणि मग तर वाटतं की आपणच उडावं मस्त पक्ष्यांसारखं. समुद्री खेळ खेळताना बोटीतून पॅराग्लायडिंग केलं होतं ज्यात ग्लायडर बोटीला बांधलेलं असतं नी आपण त्याबरोबर हवेत उडत असतो. तो छोटासा अनुभव आवडला होता आणि कधीतरी त्या दोरीचे बंधन तोडून आपले आपण हे पंख घेऊन उडायचं नक्की केलं होतं. पुण्या-मुंबईत कित्येक वर्षे राहत असूनही कामशेतला हे उडायचे धडे घ्यायचं सुचलं नाही. दूर गेल्यावर जाणवलं आणि सुट्टीत घरी आल्यावर उडायचं नक्की केलं. पण मला ते डबल सीट tandem पण नव्हतं उडायचं, एकटीने आपल्याआपण उडायचं होतं.

तीन दिवसांच्या प्रशिक्षणानंतर स्वतः, तेच ते स्वच्छन्द वगैरे पण थोड्या प्रमाणात, उडता येतं हे https://www.templepilots.com या साईटवर वाचून समजलं. यात student pilot असे प्रशस्तीपत्र देतात.
जास्त दिवसांचे प्रशिक्षणही आहे ज्यात पुढचं pilot प्रशस्तीपत्र मिळतं व आपण प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली, शिकलो त्या जागी कधीही उडू शकतो. त्याहून पुढचे प्रशिक्षण घेऊन आपण हवे त्या ठिकाणीही उडू शकतो. पण वेळेच्या कमतरतेमुळे किमान 3 दिवस तरी करू असं ठरवलं नी पैसे भरून नावनोंदणी करून घेतली. शुक्रवार, शनिवार नी रविवार असे तीन दिवस ठरवले.

या उन्हाळ्याच्या दिवसात दुपारनंतर पश्चिमेचा वारा सुरू होतो जो पवना धरणाच्या मागील बाजूच्या डोंगरावरून उडायला फायदेशीर आहे. त्यामुळे सकाळी वर्गात बसून शिकायचे नी जेवून मग प्रात्यक्षिक करण्यासाठी जायचे असा दिनक्रम असतो.

दिवस पहिला -

सकाळी १० वाजल्यापासून शिकवायला सुरुवात झाली. ग्लायडर कसे असते, त्याचे भाग, तो टोपीसारखा पंख, त्याचा पुढचा हवा आत जाण्यासाठी पिशवीच्या तोंडासारखा उघडा भाग, मागचा बंद भाग ज्यामुळे ती टोपी हवेने भरून आपल्याला उडवते, त्याच्या दोऱ्या, त्या जिथे एकत्र जोडलेल्या असतात ते रायझर व त्यांचे प्रकार, ब्रेक वगैरे सगळ दाखवलं. ते सगळं उघडायचं कसं, परत घडी घालून ठेवायचं कसं, ते ही. मग खुर्चीसारखे हार्नेस दाखवून त्यात आपण कसे सुरक्षित राहतो, त्याची ती जाड उशी ज्यावर बसायचं असतं, पाठ टेकायचा भाग, सगळी बकलं, ती कशी लावायची, त्याचे आकडे ज्यात ग्लायडर अडकवायचं असतं ते दाखवलं.
हे सगळं बघून कधी एकदा हे वापरतेय असं झालं होतं. मग काही व्हिडीओ दाखवून हे सगळं बांधून जमिनीवर धावायचं कसं ते समजावलं. एका लटकलेल्या चौकटीला आपण स्वतःला जोडून घेऊन त्यावर सराव करायला शिकवलं. जमिनीवर कसं अगदी वाकून धावायचं, हात मागे सरळ रेषेत ठेवायचे, ग्लायडर एकीकडे कलायला लागलं तर त्या बाजूला धावायचं आणि दुसऱ्या बाजूचा ब्रेक लावायचा, ब्रेक कितपत लावायचा वगैरे सगळं शिकवलं. ह्या सिम्युलेटरवर सराव केल्याने नेमकं काय करायचय हे व्यवस्थित कळत होतं पण तरीही हा झोका नाही, ते ग्लायडर लावलं तर कसं वाटत असेल आणि ते झेपेल का हा प्रश्न होताच.

दुपारी जेवल्यावर हार्नेस, ग्लायडर नी हेल्मेट असलेली एक भली थोरली १५ किलोची बॅग आम्हाला दिली. कोणते ग्लायडर घ्यायचे ते आपल्या वजनावर तर हार्नेस व हेल्मेट आपल्या आकारावर ठरतं. आम्ही तिघे होतो, दोन शाळा कॉलेजातले मुलगे तर त्यांच्या वयांच्या बेराजेपेक्षाही मोठ्या वयाची मी. आम्हाला ते धूड घेऊन गाडीत बसायला सांगितलं आणि मग सर्व प्रशिक्षक आणि पुढच्या कोर्सचे लोक वगैरे सगळे आम्ही पवना लेककडे रवाना झालो.

इथे यायचे म्हणजे पूर्ण बाह्यांचे टीशर्ट, पूर्ण पॅन्ट, चांगले स्पोर्ट्स शूज असलेच पाहिजेत. टोपी, कमीत कमी २ लिटर पाणी नी सनस्क्रीन आपले आपल्याजवळ ठेवावे.

आपण उडताना आपल्या अंगावर बांधलेल्या पाकिटात एक रेडिओ असतो. जमिनीवरून प्रशिक्षक आपल्याला सूचना देत असतात त्याप्रमाणे आपण करायचं. तो रेडिओ, हार्नेस नी हेल्मेट घालून आम्हाला जमिनीवर वाकून, हात मागे सरळ ठेऊन वाऱ्याकडे धावायचा सराव करायला लावला. नंतर ग्लायडर लावून ते ओढून फुगवायला नी डोक्यावर आल्यावर ते कंट्रोल करायला शिकवलं. आजचा दिवस हे असंच धरून धावायचं होतं. त्यात ते इतक्या वेळा पडतं, कधी आपण पडतो, कधी ब्रेक नीट नाही लागले, कधी जास्त लागले, हात सरळ नाहीत, नीट वाकलं नाही, नीट धावलं नाही, रायझर सुरुवातीला हातावर असल्याने हात खरचटले, हात मागे ठेवून खांदे दुखले असे कायकाय प्रकार करत कसाबसा सूर्यास्त जवळ आला नी दिवस संपला. बरोबरच्या दोघांना तितकासा प्रश्न आला नाही, मी जरा लटपटत होते. प्रत्येकाच्या आकलनाप्रमाणे प्रशिक्षक शिकवत होते त्यामुळे आपल्याला जमेल तेवढंच करणं सुरू होतं. मागे डोंगरावरून मात्र पुढच्या वर्गाचे विद्यार्थी मस्त उडत होते आणि बराच वेळ उडून मग आमच्याइथे येऊन उतरत होते. मजा वाटली त्यांना बघायला पण!

जमिनीवरचे प्रशिक्षण - उडण्यापूर्वीची तयारी
OnGround.jpg

दिवस दुसरा

सकाळी कालच्या दिवसाची उजळणी, अनुभवकथन, वगैरे आटपून पुन्हा व्हिडीओ दाखवले गेले. मग आपण उडतो कसे, वारा कसा वाहतो, तो ग्लायडरच्या कोणत्या भागावर काय परिणाम करतो, डोंगरावरून कसा वाहतो, कुठे आपण वर जातो, कुठे खाली येतो, कुठे गोलगोल फिरवून आपटू शकतो वगैरे सगळं शिकवलं. परत त्या सिम्युलेटरवर थोडा उडायचा सराव करून सकाळचं सत्र संपलं.

दुपारी परत ती धावाधाव करून घेतली. आता मात्र मला ते नीट आलं. मग कमरेजवळ दोऱ्या बांधून दोन प्रशिक्षक त्या धरून धावत नेऊन थोडं उडवायचा सराव केला. याला हॉप्स म्हणतात. उडताना डावीकडे उजवीकडे वळणं, ग्लायडर नीट कंट्रोल करणं शिकवलं. वाऱ्याची दिशा कशी बघायची, ब्रेक लावून उतरायचं कसं, पाय कसे टेकवायचे, ग्लायडर जमिनीवर कसा आणायचा त्याचाही बराच सराव झाला. तितकेसे उडायला पण मजा आली.

ती दोन छोटी मुले मस्त उडत होती त्यामुळे त्यांना डोंगरावरून एकटे उडायला परवानगीही मिळाली. मी जमिनीवरच थोडा सराव करून दुसऱ्या दिवशी उडायचं ठरलं. हे जमिनीवरचं कठीण काम नीट जमलं की प्रत्यक्ष हवेत उडणं सोपं असतं खूप! पण त्यासाठी हे दोन न संपणारे दिवस ढकलावे लागतात.

हॉप्स
Hops.jpg

दिवस तिसरा

सकाळच्या सत्रात उडताना काय कसं करायचं शिकवलं. उडताना त्या पाठीवरच्या खुर्चीत बसायचं कसं, बसून एका बाजूला कलून व ब्रेक लावून ग्लायडरची दिशा कशी बदलायची वगैरे सराव करून घेतला. परत एकदा वारा, त्याचा परीणाम, दिशा वगैरे उजळणी झालीच. मग लेखी परीक्षाही झाली आणि उत्तरपत्रिका तपासून, चुकलेल्या गोष्टी समजावून दिल्या. ८०% ला पास असतं जे आम्ही झालो होतो. मग अजून काही व्हिडीओ या तीन दिवसांनंतर काय, पुढचे कोर्स, फ्लाईंग टूर्स, वगैरे दाखवलं.

दुपारी जाऊन परत थोडे हॉप्स करून घेतले आणि ते अगदी नीट जमल्यावर आणि माझी मानसिक तयारीही झालीय ना ते पाहून तू उडायला तयार आहेस असा शेरा मिळाला. मग काय, आनंद गगनात घेऊन जायचा होता मावतो का बघायला Happy

गाडीतून आम्हाला ३५० फूट उंच डोंगरावर आणलं. खालचा परिसर दाखवून कसं उडायचं, कुठे वळायचं, कसं इंग्रजी एस सारख्या फेऱ्या मारत हळूहळू खाली यायचं, कुठे व कसं उतरायचं वगैरे नीट समजावलं. हे सगळं प्रत्येकाला सांगायला लावून आम्हाला नीट कळलय ना ते पाहिलं. चुकून रेडिओ बंद झाला तर काय करायचं ते ही समजावलं आणि तो उडायचा क्षण आला.

वारा हवा तसा वाहायला लागल्यावर सगळ्या जाम्यानिम्यासह मी सज्ज झाले. टेक ऑफ जवळचे प्रशिक्षक, लँडिंग जवळचे प्रशिक्षक या सगळ्यांशी रेडिओवरून संवाद पूर्ण करून मी ग्लायडर हवेत घेतलं आणि नीट कंट्रोल झाल्यावर पुढे झेपावले. पाय हवेत वर आल्यावर ग्लायडर कंट्रोलमधे आहे पाहून रेडिओवरून उडायच्या हात वर असलेल्या स्थितीत ये अशी सूचना मिळाली आणि मी स्वतःला वाकलेल्या स्थितीतून सरळ केलं.

उडताना
Fly.jpg

मी उडत होते, एकटीच, ते पंख घेऊन, ३५० फूट उंचीवरून, मस्त आकाशात! नाही वर्णन करता येत तो प्रसंग! खरच त्या गगनात आनंद नाही मावत. खालची जमीन, पुढचा तो मोठा तलाव, खाली लँडिंगच्या जागेवर दिसणारे ते माणसांचे ठिपके, सगळं कसं स्वप्नवत वाटतं. सगळ्या प्रशिक्षकांनी आधीच सांगितलं होतं की तुम्ही आयुष्यात कितीही उडालात तरी ती पहिली वेळ तुम्ही जन्मात विसरू शकणार नाही, आणि खरच होतं ते! वारा आपल्याला इकडे तिकडे नेत असतो आणि आपण भारावल्यासारखे सगळं डोळ्यात, मनात पूर्ण शरीरात तो अनुभव साठवून ठेवत असतो.

रेडिओवरून इकडे वळा तिकडे वळा, वेग कमी करा वगैरे सूचना पाळून मी जमिनीजवळ यायला लागले. जमिनीवरून सूचना यायला लागल्या होत्या. इतक्या फुटांवर आहात, इथे उतरायचय, पाय बाहेरच ठेवा, ब्रेक नीट धरा, कंट्रोल करा. आता पाचसहा फूटच अंतर होतं जमिनीपासून आणि ब्रेक जोरात लावायला सांगून एक पाय पुढे करून उतरायचं आणि किंचित धावून मागे वळून परत जोराने ब्रेक खेचून पडणाऱ्या ग्लायडरकडे धावायचं. सगळं व्यवस्थित जमलं आणि मी आनंदाने उड्या मारल्या. हेच हवं होतं. ह्याच आनंदासाठी आले होते इथे!

उडी बाबा!
Paragliding.gif

अजून वेळ होता आणि वाराही हवा तसा होता त्यामुळे सगळा जामानिमा गोळा करून परत गाडीतून वर जाऊन दुसरी फ्लाईट करायची होती. माझ्या बरोबरच्या मुलांना पुढच्या कोर्सचे टास्क करायचे होते ज्यात ब्रेकवरून हात सोडणे, ब्रेक न लावता आपण नुसते एका बाजूला कलून दिशा बदलणे वगैरे शिकवत होते आणि त्यांनी ते केलेही होते. मी म्हटलं मला पण जमेल, करू का? पहिला अनुभव चांगला आल्याने मलाही परवानगी मिळाली आणि मग परत हवेत उडताना जसजशी सूचना मिळेल तसं करणं सुरू झालं. हात सोडल्यावर सूचना आली, उडा आता मस्तपैकी मॅडम आणि मी हात हलवत उडायला लागले Happy आता तर अजूनच मजा येत होती. परत इकडे तिकडे फिरून उतरायच्या वेळी तसेच अलगद जमिनीवर पाय टेकवून उतरले. संध्याकाळी प्रशस्तीपत्र घेऊन आनंदाने घरी परतले.

सेफ लँडिंग
Landing.gif

हा अनुभव मला घ्यायचाच होता आणि घेतला. तुम्हालाही वाटत असेल असं उडावसं तर नक्की हा अनुभव घ्या. कशाला असलं काही करायचं तर त्याला उत्तर - हौस! आपण सरळ रस्त्यातून चांगले चालत असतानाही कधी डोंगरावर चढून गिर्यारोहणाची हौस पुरवतो तर कधी पाण्यात जाऊन पोहायची हौस पुरवतो, तशी ही उडायची हौस. पुढे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी उडता येते, उडायच्या स्पर्धेत भाग घेता येतो, प्रशिक्षक म्हणून काम करता येते.

सुरक्षितता -
१ - ज्या संस्थेतर्फे उडणार आहात त्यांची पूर्ण माहिती घ्या. त्यांच्याबद्दल वाचा, व्हिडीओ पहा आणि मगच जा. प्रशिक्षित लोक आहेत ना त्याची नीट चौकशी करा.
२ - हा एक adventure sport आहे. प्रशिक्षकांचे ऐकले नाही किंवा कधी काही झाले तर अपघात होऊ शकतो. इन्शुरन्स घेणे गरजेचे असते. तुमची संस्था त्याबद्दल सांगते. तो घेतल्याशिवाय जाऊ नका ( माझा सात दिवसांचा प्लॅन अडीचशे रुपयांहून कमी होता ज्यात hospitalization आणि औषधे वगैरे सगळे होते).
३ - संस्थेकडे असलेले सामान नीट आहे ना बघा.
४ - संस्थेने आणायला सांगितलेले सगळे सामान घेऊन जा जसे की लांब बाह्यांचे टीशर्ट, पूर्ण लांबीची पॅन्ट, चांगले स्पोर्ट्स शूज, इत्यादि.
५ - प्रशिक्षक प्रथमोपचार करण्यासाठीही प्रशिक्षित आहेत ना बघा. रुग्णवाहिका व इस्पितळ आसपास आहे ना ते विचारा
६ - आपली काळजी आपणही घ्या. काही शंका असेल तर लगेच योग्य व्यक्तीला विचारा. जमेल तेवढेच करा, उगाच आवाक्यात नसलेल्या गोष्टी करू नका Happy

मी खालील संस्थेकडून प्रशिक्षण घेतले जे या सर्व कसोट्यांवर खरे उतरले. संस्थेतील सर्व प्रशिक्षकांचे आभार या सुंदर अनुभवासाठी.

https://www.templepilots.com

तटी - तीन दिवसांच्या प्रशिक्षणाचे १५३४० झाले तर दोन रात्र राहणे व तीन दिवसांचे सर्व खाणे मिळून ३००० अधिकचे

या संस्थेचा हा सिझन मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंतच आहे. तेव्हा लवकर जायचं करा नाहीतर पुढचा सिझन केव्हा ते विचारून घ्या.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी!

माझ्याही बादली यादीत आहे हे,
माझी एक मैत्रीण दिल्लीवरून येऊन हा कोर्स करून गेली आणि पुण्यातल्या पुण्यात असोन मला अजून जमले नाहीये. Sad

अभिनंदन सोनू, एकदम बादल पे पाव है
सुंदर लेख आणि त्याहून थरारक अनुभव.

BTW बुडता बुडता उडायला कशा लागलात तुम्ही?

आई शप्पथ ! जबरी !
मस्त डिट्टेलवार लेख आवडला!
वाचून मला पण करावंसं वाटतंय आता !

भारीच!
आम्ही फक्त वाचणार. असले धाडस काही जमणार नाही बुवा आपल्याला.

अभिनंदन सोनू!
थरारक अनुभव. छान लिहीलंय.

कित्येकदा हे करायचं म्हणुन ठरवलं पण राहून गेलं.

जबरदस्त लेख.. आणि gif मस्त टाकला आहे.

शाली -परसिलिंग करा- सेफ असते पाण्यात आणि सेम उडण्याची मजा पण.

ज्जे बात!
अभिनंदन सोनू.. Happy
अनुभव वाचतानाच तुमचा उत्साह जाणवत होता
मस्त आहेत फोटो आणि जीआयएफ Happy
आज मै उपर वाली फीलींग आली असेल ना Happy

शाली -परसिलिंग करा- सेफ असते पाण्यात>>> मस्त. च्रप्स, हा पर्याय छान आहे. या होळीला कोकणात चाललोय. नक्की ट्राय करणार.

मस्त अनुभव आणि अनुभवकथन.
लँडिगचा सराव करता येत नसेल ना? एकदा उडल्यावर त्याची धाकधूक नाही वाटली?

मस्त अनुभव.
किती काय काय करत असतेस तू हल्ली! हे जसे डिटेलमध्ये लिहिलेय तसे पाण्याखालच्याअनुभवाचं लिहिण्याचे करा की. (की लिहिलंय आणि मी वाचले नाही)

धन्यवाद धन्यवाद Happy
माझ्या या अनुभवकथनाने कोणी हा अनुभव स्वतः घेतला तर खूप आनंद होईल. कळवा नक्की.

साधारण खर्च किती येतो? >> लेखात घातलेय आता ते ही

लँडिगचा सराव करता येत नसेल ना? एकदा उडल्यावर त्याची धाकधूक नाही वाटली? >>
त्या हॉप्स मधे लँडिंगचा सराव होतो.

BTW बुडता बुडता उडायला कशा लागलात तुम्ही? >>
आजकल पाँव जमींपर नहीं पड़ते मेरे Happy Happy

पाण्याखालच्याअनुभवाचं लिहिण्याचे करा की. (की लिहिलंय आणि मी वाचले नाही)
>>
स्कुबा डायविंग पोटापाण्याचा धंदा आहे. त्यात पोटापाण्याइतके कमवायला लागल्याशिवाय लिखाण प्रसिद्ध करायचं नाही असं ठरवलय. कमवायला लागायला अजून बराच वेळ आहे म्हणून लिहून सगळं अप्रकाशित ठेवलय.

मस्त लेखन. आवडले.
मला उंचीची आणि पाण्याची भिती वाटते. तरीही नवर्याच्या आग्रहास्तव जोडीने parasailing केले होते.
त्यांनी पाण्याला पाय लागतील एव्हढे खाली आणून पुन्हा वर सोडून दिले होते. मस्त वाटले होते.

पराग्लायडिंग शिकणे एक मस्त अनुभव आहे. मी 4 5 वर्षांपूर्वी क्लब पायलट केले होते. ते केले की तुम्हाला स्वतः फ्लाय करता येते आणि फ्लाईंग चा वेळ लॉग होतो. तो तुमचा अनुभव म्हणून धरला जातो.
सोनू तुम्ही एलिमेंटरी पायलट केले असेल तर क्लब पायलट नक्की करा. 3000 फुटांवर पराग्लायडिंग करणे म्हणजे स्वर्ग सुख आहे. ट्रान्स मध्ये गेल्याचा अनुभव येतो.
बाकी स्किल म्हणून गरम हवेचे कॉलम पकडून वर जाणे. तुम्ही आजूबाजूला उडणारे पक्षी पाहून त्यांना कॉपी करावा लागते. रुटीन जगायला लागणाऱ्या स्किल च्या पालिकडे जाऊन विचार करायला लावतात हे असे एक्सपरिइन्स.

Pages