भाग १ : https://www.maayboli.com/node/84447
भाग २: https://www.maayboli.com/node/84450
भाग ३: https://www.maayboli.com/node/84454
भाग ४: https://www.maayboli.com/node/84459 (अंतिम)
================================================================
तारीख: 27 एप्रिल.. वार: गुरुवार..
तसा हा दिवस ऑफिसच्या धकाधकीचा दिवस होता पण मी आज वेळेआधीच ऑफिसला पोहोचलो. दिवसाचा क्रम तसा भरगच्च होता, छोट्या मोठ्या 7 मीटिंग होत्या पण आधी हाताशी बरेच दिवस मिळाले असल्याने मी दुपारी 3 नंतर कुठलीही मीटिंग ठेवली नव्हती की जॉईन ही करणार नव्हतो. पण आज सारखे लक्ष घड्याळाकडे जात होते केव्हा एकदा 3 वाजतात आणि मी ऑफिस मधून बाहेर पडतो असे झाले होते. एकदाचे घड्याळात 3 वाजले आणि आऊट ऑफ ऑफिस ची नोट लावून बाहेर पडलो. गाडी रेंट वर घेतली आणि घरी आलो. बायकोला तयार राहण्यासाठी कळवले होते, तिला पण सोबत घेणार होतो कारण जिथे क्लास रूम ट्रेनिंग होणार होते ती जागा घरापासून 40 किलोमीटर अंतरावर होती आणि तिथे एक प्रसिद्ध आइस्क्रीम शॉप होते. क्लास रूम ट्रेनिंग झाल्यावर दोघेही आइस्क्रीमचा आनंद घेणार होतो..तेवढीच आपली मजा
दोघेही वेळे आधी फ्लाईंग स्कूलला पोहोचलो. एका मोठ्या हँगर मध्ये बऱ्याचश्या खुर्च्या रांगेने मांडल्या होत्या आणि समोर फळ्यावर आखीव रेखीव अक्षरात बरीच माहिती लिहिली होती आणि आजूबाजूच्या भिंतीवर होते असंख्य फोटो.. फ्लायिंग स्कूल मधील प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जगभरात केलेल्या उड्डाणाच्या वेळी काढलेले फोटो.
फ्लाईंग स्कूल
फ्लाईंग स्कूल – आतील भाग
हळूहळू विद्यार्थी यायला सुरुवात झाली आणि ठरल्या वेळेप्रमाणे वर्गाला सुरुवात झाली. सुरुवातीला इंट्रॉडक्शन झाले, ह्या सगळ्यात मी एकटाच भारतीय होतो. मग थोड्याच वेळात मुख्य course ला सुरुवात झाली. विंग, ड्र्याग, फोर्स, एरोफॉइल, अपविंड, डाऊनविंड, अश्या एक ना अनेक संज्ञाचा भडिमार झाला. आमचा प्रशिक्षक "मार्क" अगदी सोप्या भाषेत सगळे समजावून सांगत होता. बालवाडीचा पहिला दिवस असावा अशीच माझी भावना होती. सगळे लक्षपूर्वक ऐकत होतो. एकतर सगळी माहिती नवीन होती आणि नंतर भविष्यात ती उपयोगी ही येणार होती.
साधारण दीड तासाने ब्रेक झाला, वर्गात पुन्हा एकदा गलबला झाला, हाय-हॅल्लोचे राऊंड झाले. ब्रेक संपला आणि सगळ्यांना ज्याची उत्सुकता होती ते ग्लायडर आमच्या समोर उघडण्यात आले. ब्रेकपूर्वी झालेल्या थियरी क्लासला आता प्रॅक्टिकलची जोड देण्यात आली होती. ग्लायडरचे तसे मुख्य दोन प्रकार एक फिक्स विंग तर दुसरे फ्लेक्सीबल. आम्ही फ्लेक्सीबल विंगने ग्लायडिंग करणार होतो. वजनाला अगदी हलके आणि पाठीवरच्या बॅग मध्ये मावेल असे हे छोटेसे ग्लायडर आता आमच्या समोर होते.
जमिनीवर अंथरलेले ग्लायडर आणि आमचा प्रशिक्षक
आम्ही ग्लायडर हाताळायला सुरुवात केली. ते उघडायचे कसे, पाठीवर लावायचे कसे, सुरक्षा सीट बांधायची कशी आणि ग्लायडर पॅक करून पुन्हा बॅग मध्ये ठेवायचे असे असा हा छोटासा प्रत्यक्षिक तास आणि पहिला दिवस संपला. दुसरा दिवस असणार होता शनिवारी, 29 एप्रिल ला. शनिवारी सकाळी कुठे जमायचे ह्याची माहिती शुक्रवारी रात्री आम्हाला ईमेल वर मिळणार होती.
आता वेध लागले होते ते शनिवारी असलेल्या उड्डाणाचे. शुक्रवार काही संपता संपेना.. ऑफिसमध्ये कसा बसा दिवस रेटला. घरी आलो आणि एक छानसा चित्रपट बघून लवकर झोपलो. उद्याचा दिवस थकवणारा असणार होता.
तारीख: 29 एप्रिल.. वार: शनिवार..
आम्ही दोघेही 5 च्या गजराला उठलो. बाहेरील टेंपरेचर बघितले तर ते 4°c होते, आणि दिवसभरात ह्यात वाढ होईल असे दिसत होते पण आजचा आऊटडोअर क्लास थंडीतच होणार होता. रात्री ईमेल वर मीटिंग पॉइंटची माहिती आलेली बघितली. जवळच असलेल्या एका पार्क मध्ये भेटायचे होते, हे तेवढे तरी बरे होते. गुरुवारच्या क्लास मध्ये आम्हाला सांगण्यात आले होते की शिकताना "No Mobile", मग पुन्हा बायको एकदा सोबतीला आली. ती म्हणाली मी काढते फोटो आणि व्हिडिओ. वा बायको असावी तर अशी..नेहमी सोबत देणारी (असो कौतुक सोहळा कमी आणि विषयाकडे वळूया)
दोघेही मीटिंग पॉइंट ला पोहोचलो, मार्क आमच्या आधी इथे पोहोचला होता आणि आम्ही पोहोचणारे दुसरे होते. पुन्हा एकदा वक्तशीरपणा दाखवत अगदी वेळेच्या आधी सगळे आले होते आणि आम्ही ठरलेल्या वेळेत पार्क ला पोहोचलो. सूर्यनारायण नेमकेच जागे झाले होते आणि कोवळे उन पूर्ण पार्क वर पसरले होते.
मार्कने एकदा सगळ्यांना डीब्रिफिंग केले आणि आमच्या वजनानुसार आमचे छोटे गट केले आणि सोबतीला दिला एक प्रशिक्षक. आम्ही आमचे ग्लायडर ओपन केले, जमिनीवर ठेवले. ग्रुप मधून सगळ्यात पाहिले मी ते माझ्या पाठीवर बांधले, इथून माझ्या पॅराग्लायडिंग प्रवासाला खरी सुरुवात झाली. आयुष्यात पहिल्यांदा मला पंख लाभले होते.
आता खरी कसरत सुरू झाली. ग्लायडरच्या दोऱ्या हातात घेऊन आपल्याला हवेच्या विरुद्ध दिशेला धावायचे असते जेणेकरून पुढून येणारी हवा ग्लायडर मध्ये शिरून त्यात असणाऱ्या सेल्स फुगतील आणि एक aerodynamic शेप तयार होऊन आपल्याला लिफ्ट मिळतो असे सोपे विज्ञान..पण हवेच्या दाबाने आपल्याला पुढे काही जाता येत नाही.. दाब इतका प्रचंड असतो की असंख्य हत्ती आपल्याला मागे ओढत आहेत की काय असे वाटते. ह्या सगळ्या पद्धतीला फॉरवर्ड लाँच म्हणतात आणि ही उड्डाणाची पहिली पायरी. सध्या पायाखाली असणारी जमीन सपाट असल्याने ह्या प्रक्रियेला फ्लॅट रन असेही म्हणतात.
पहिल्यांदा पाठीवर ग्लायडर बांधले तो क्षण
पूर्ण ताकदीनिशी ग्लायडर ओढताना अस्मादिक
आजचा आमचा उद्देश होता असे प्रत्येकी किमान 4 ते 5 फ्लॅट रन करणे आणि असे धावताना डोक्यावरील विंग स्टेबल ठेवणे. हे झाल्यावर आम्ही प्रोग्रेस करणार होते पार्क मधील टेकडीवर व तिथून करणार होतो "बनी हॉप्स" म्हणजेच उतारावरून खाली येणे
बऱ्यापैकी जमलेला फ्लॅट रन
पण हाय रे मेरी किस्मत.... थोड्याच वेळात वाऱ्याने जोर धरला आणि आम्हाला आमचे ग्लायडर गुंडाळून ठेवावे लागले. आम्ही थोडा वेळ वाऱ्याचा जोर कमी होण्याची वाट बघितली पण वाऱ्याचा जोर कमी झाला नाही आणि आमचे बनी हॉप्स चे सेशन अवराते घ्यावे लागले आणि रविवार ची वाट बघण्याशिवाय आमच्याकडे दुसरे काही ऑप्शन शिल्लक राहिले नाही.
पण एकंदरीत आजचा अनुभव अगदी वेगळा होता, ह्या ज्या काही थोड्याशा फ्लॅट रन झाल्या त्यातच दमायला झाले होते. आता घरी जाणे आणि रविवार साठी रिचार्ज होणे हाच काय तो माझा प्लॅन ठरला
तारीख: 30 एप्रिल.. वार: रविवार..
पहाटेचा क्रम अगदी काल सारखा होता फक्त आज तापमान 11 की 12 डिग्री होते. आकाश थोडे ढगाळ होते. वाटले आजचे सेशन पावसाने वाहून जायला नको.. पण आजचा दिवस माझा असणार होता का ?
पुन्हा त्याच पार्क मध्ये पोहचलो, ग्लायडर ओपन केले आणि फ्लॅट रनला सुरुवात केली. काल पेक्षा आज कॅनोपी वर चांगला कंट्रोल होताना लक्षात आले. एवढ्या वेळात ढग सुद्धा दूर झाले आणि तेवढ्यातच मार्कने आम्हा सगळ्यांना बनी हॉप्स साठी बोलावले. ग्लायडर गुंडाळले आणि स्लोप वर चढलो. क्रमाने इतर स्टुडंट्स बनी हॉप्स करत होते. माझा क्रम आला आणि पूर्ण ताकदीने ग्लायडर ओढले. ते अगदी योग्यरित्या डोक्यावर आले आणि हवेचा दाब अगदी नाहीसा होऊन मी अलगद स्लोप वरून खाली उतरू शकलो.. पण ह्या रन मध्येही पाय अजूनही जमिनीवरच होते.
पुन्हा एकदा स्लोप वर चढलो आणि पुढील ट्राय साठी तयार झालो. यंदा प्रशिक्षकाने सांगितले की वाऱ्याची एक झुळूक येण्याची वाट बघ मग लाँच कर.. तसेच केले आणि गेल्या वेळी पेक्षा अजूनच हलके वाटले आणि स्लोप च्या शेवटी शेवटी येताना काही सेकंदा पुरते हवते होतो... अगदी जगावेगळी फिलिंग होती ही. हे दोन सेकंद ही पुरेसे वाटले.. मन भरून पावले आणि ट्रेनिंग सफल झाले होते.
पहिली हवाहवाई मोमेंट – काही क्षणासाठी उडता आले
सेशन संपल्यावर मार्कने सगळ्यांना पुढील कोर्स म्हणजे P1/P2 पायलट कोर्सची माहिती दिली. मी आधीच ठरवले होते की पुढील कोर्स करायचा आणि एक हौशी(amateur) ग्लायडर वैमानिक व्हायचे. आता पुढील कोर्स युनिव्हर्सिटी तर्फे न होता "Muller WindSport" ह्या क्लब तर्फे होणार होता. इंट्रॉडक्शन पूर्ण झाले होते आणि ग्लायडर वैमानिक होण्याच्या दिशेने माझा प्रवास सुरू झाला होता.
वॉव मस्त अनुभव.
वॉव मस्त अनुभव.
रानीखेतला केले होते पण मागे पायलट अन पुढे नुसतेच प्रेक्षक आम्ही अशी सोय होती. सो नुसता उडण्याचा अनुभव घेतलेला. उडवण्याचा अनुभव खरा, तो तुम्ही घेतलात, ग्रेट!
एकुणच अधांतरी असणं अन उंचावरून खालचा निसर्ग बघणं हा कल्पनातित अनुभव आहे. जमेल तेव्हा प्रत्येकाने अनुभवावाच.
मस्त! मला करायचं आहे हे एकदा
मस्त! मला करायचं आहे हे एकदा तरी.
अवल, वावे >> धन्यवाद
अवल, वावे >> धन्यवाद
जमेल तेव्हा प्रत्येकाने अनुभवावाच >> अगदी अगदी
मला करायचं आहे हे एकदा तरी >> कामशेत येथे टेंम्पल पायलट किंवा पांचगणी येथे करता येईल
मस्त !
मस्त !
छान लिहीले आहे. फोटोज पण मस्त दिले आहेत.
मस्त, कसला भारी अनुभव
मस्त, कसला भारी अनुभव
फोटो पण अगदी परफेक्ट टायमिंग ला मिळालाय
मस्त लिहितोयस
धन्यवाद रआ, फोटोज पण मस्त
धन्यवाद रआ, फोटोज पण मस्त दिले आहेत >> फोटोंचे श्रेय बायकोला
फोटो पण अगदी परफेक्ट टायमिंग
फोटो पण अगदी परफेक्ट टायमिंग ला मिळालाय >> पिक्सेल मॅजिक, विडिओ मधून फ्रेम स्टॉप करून घेतला आहे
विडिओ करताना सौ ने फोटो काढले आहेत, त्यात पण अशीच मोमेन्ट आली आहे पण त्यात एक पाय almost जमिनीला टच झाला आहे. म्हणून हि ट्रिक करावी लागली