अंताची चाहूल लागताच
सगळी मृगजळे
रसरसल्या ज्वालामुखीसम
उसळू लागतात
मग जाणिवेचे पक्षी
अंगजाळत्या उन्हात
पंख भिजवू लागतात,
अज्ञानात जीवास मुकतात.
कुणी फिरस्ता
क्षितिजाचे तळ गाठत
अंधारप्रदेशात प्रवेश करतो
जिथे चांदण्यांचा पाउस
पडत असतो,
आईच्या स्तनातून ओघळणा-या
दुधातून भिजलेल्या वाटा
पाय उष्टवतात,
मग सारी दलदल अशनी गिळंकृत
करते,
उरते ती दलदलीत खोल खाली
पायाला लागणारी
खडकाळ जाणीव
अन कंठ फोडून
डोळ्यात उतरलेले प्राण.
अंगाईच्या क्रूर किंकाळ्या
जाळून काष्ठवत झाल्या वेदना
जंगलाचा कानाकोपरा गाठतात
फकीरभावनेची लक्तरे लोंबकळून
धुक्यात माळलेला
संधीप्रकाश अन्
वाट पावसात
ओघळलेली
जुन्या वास्तूत
भयाण भूते
दडलेली !
जहरातुनी बनवती
उतारे जहराचे
मनात मेले साप
बहराचे,
रस्ता आडवुन
एक कात
पसरलेली !
चाहुल रात्रीची
अन् वेध
मद्यधुंद सहवासाचे
पसरलेले,
निरागस चेह-यात
नजर व्याकुळ
अडकलेली !
जगणे नव्हे
शाप पुर्वजन्मीचे
भोगतो,
कासावीस
चर्चची घंटा
घणघणते मनात
कोंडलेली !
शापकाहुरात अडकलेले
शरीर जेव्हा
मरणजोगवा मागायला
लागते तेव्हा
प्राक्तनभोगाचे सर्प
विषपिशव्या तट्ट
फुगवून पारधीसाठी
बाहेर पडतात.
विषारी बिनविषारी भेद
संपून
सर्पांचे पेव फुटते तेव्हा
सारे जनमेजय
थिजून जातात
आळीला तक्षक समजून
संस्कृती पित्याचे रक्षण
करू लागतात.
इंद्राच्या सहस्र नयनातून
'पु'पूर वाहायला लागतो
अन् मळवट भरले दगड
अहिल्या होवून दगडी
कोळश्यासारखे
रसरसू लागतात
सुर्याज्वालामुखी सारखे.
मूर्तीभंजकांचे एकत्व
नदीकिना-याच्या संस्कृती
ढासळवत असताना
आवेत शिरलेले मडकी
जशी आग लागेल तशी
भाजली जातात
अन् उतरंडीवर चढतात.