प्रसववेदनेचा तडफडात

Submitted by विजयकुमार on 25 August, 2010 - 02:53

अंताची चाहूल लागताच
सगळी मृगजळे
रसरसल्या ज्वालामुखीसम
उसळू लागतात
मग जाणिवेचे पक्षी
अंगजाळत्या उन्हात
पंख भिजवू लागतात,
अज्ञानात जीवास मुकतात.

कुणी फिरस्ता
क्षितिजाचे तळ गाठत
अंधारप्रदेशात प्रवेश करतो
जिथे चांदण्यांचा पाउस
पडत असतो,
आईच्या स्तनातून ओघळणा-या
दुधातून भिजलेल्या वाटा
पाय उष्टवतात,
मग सारी दलदल अशनी गिळंकृत
करते,
उरते ती दलदलीत खोल खाली
पायाला लागणारी
खडकाळ जाणीव
अन कंठ फोडून
डोळ्यात उतरलेले प्राण.

अंगाईच्या क्रूर किंकाळ्या
जाळून काष्ठवत झाल्या वेदना
जंगलाचा कानाकोपरा गाठतात
फकीरभावनेची लक्तरे लोंबकळून
हरल्या जगण्याची निशाने
म्हणून मिरवतात,
जळणा-या उदीच्या धुरासारखा
वास
सर्वत्र भरून राहतो
सुफी भावनेसारखा.

कधीतरी पाचव्या बाळांतपणात
आईने माझी बहिण
भिरकावली होती
अज्ञात क्षितिजापार,
तिची ओली नाळ
गळ्याचा फास बनून
श्वासांचे तांडव रोखते
तिच्या अंगाईच्या क्रूर
किंकाळ्याना पार्श्वसंगीत देत
घरघर
जंगल जाळल्या, वाळल्या
काड्यातून
आक्रोशांचे झंकार उमटवते,
मग
ढगांना भान येते
चांदण्या नष्ट पावतात
अंधाराला काळे करत
आकाश सर्वदूर पसरते
उरते ती फक्त
फकिरीअंताची सुफी भावना.

मृगजळांचे पक्षी होतात,
दलदलीत कमले फुलतात
आईच्या गर्भभान विसरल्या
दुधाचे सरोवर होवून
राजहंस विहरू लागतात
चंदनी नौकेत
ओला बाळंतविडा तरंगत
असतो
तेव्हाच
अंतग्रासास सोकावल्या मगरी
नरडीचे घोट घेतात
ओल्या दलदलीत शरीराची
घुसमट होवून
प्राण आकाश भेदतात
अन पुन्हा दुधाळ चांदणे
धरतीवर प्रसवू लागते.

विजयकुमार.........

19 / 08 / 2010 , मुंबई

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वा !!