पुनरावृत्तीचे सुडहास्य

Submitted by विजयकुमार on 23 August, 2010 - 03:09

शापकाहुरात अडकलेले
शरीर जेव्हा
मरणजोगवा मागायला
लागते तेव्हा
प्राक्तनभोगाचे सर्प
विषपिशव्या तट्ट
फुगवून पारधीसाठी
बाहेर पडतात.

विषारी बिनविषारी भेद
संपून
सर्पांचे पेव फुटते तेव्हा
सारे जनमेजय
थिजून जातात
आळीला तक्षक समजून
संस्कृती पित्याचे रक्षण
करू लागतात.

इंद्राच्या सहस्र नयनातून
'पु'पूर वाहायला लागतो
अन् मळवट भरले दगड
अहिल्या होवून दगडी
कोळश्यासारखे
रसरसू लागतात
सुर्याज्वालामुखी सारखे.

मूर्तीभंजकांचे एकत्व
नदीकिना-याच्या संस्कृती
ढासळवत असताना
आवेत शिरलेले मडकी
जशी आग लागेल तशी
भाजली जातात
अन् उतरंडीवर चढतात.

शांतीच्या शालीत कुणी
दुख पुसत मग
धर्माची दीक्षा देतो
बाटग्याना,
खिळे ठोकल्याजागी
रक्त साखळलेलेच
मग दोन वाटांवर
शांतीदूत चालतात
एक काळा एक गोरा.

उन्माद प्यायले पारवे
टोचा मारून
घुमट पोखरतात,
इतिहास वर्तमान
होवून कोसळतो
अन् काळ हसतो
पुनरावृत्तीच्या सुडहास्याने.........

विजयकुमार.........
१४.११.२००९,मुंबई

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

!!!

!!!

किती मागे जायचं संदर्भ शोधत..?
अन् हाती काय तर पुन्हा तेच.. पुनरावृत्तीचे सुडहास्य!!