असोशी

एक उंबरा

Submitted by पुरंदरे शशांक on 12 November, 2024 - 00:12

एक उंबरा

एक उंबरा घरा,मनाचा
जरा जरासा वाट अडवुनि
स्वस्थ बसावा

एक कोपरा घरा,मनाचा
गर्द ताटवा, अजाण वेडा
बहरुन जावा

एक अंगण घरा,मनाचे
उदारतेने अनाहूताला
देत विसावा

एक मार्ग हा घरा,मनाचा
हात धरोनी, माणुसकीचा
स्पर्शत जावा

एक झरोका घरा,मनाचा
स्वच्छ प्रकाशे लखलखणारा
तेवत जावा

एक पायरी घरा,मनाची
जाता येता, अवचितवेळी
आधार व्हावी

एक पोकळी घरा,मनाची
अथांगता अन तरीही स्तब्धता
देत विसावा

एक असोशी घरा, मनाची
अविरत धारा, उगेउगेची
देत रहावी

असोशी विठूची

Submitted by दत्तात्रय साळुंके on 27 June, 2018 - 06:06

असोशी विठूची

देव नाही गाभाऱ्यात
ओस झाले मंदिरही
सुनी सुनी पायरीही
दैन्य आले कळसाही

दिंडी घेऊनीया विठू
प्रगटला भिमातीरी
टाळ मृदंग गजरी
विठू झाला वारकरी

चंद्रभागेच्या जळात
भक्ती तरंग उठतो
नाथ तीथे अनाथांचा
वारकऱ्यासंगे न्हातो

युगे युगे ताटातूट
जीव नाही की थाऱ्याला
भाग गेला शीण गेला
कृष्ण सुदामा भेटला

विठू देहात भरला
विठू अष्टगंध टिळा
विठू तुळशीची माळ
विठू सर्वांग सोहळा

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - असोशी