भक्तपराधीन
Submitted by पुरंदरे शशांक on 16 June, 2019 - 22:54
भक्तपराधीन
नाही भुलत स्तुतीला
ना ते बाह्य दिखाव्याला
शुद्ध भाव उमजोनी
विठू येई चाकरीला
काय कुंभार तो गोरा
जाणे काय स्तुती मोठी
शुद्ध भाव घाली धाक
देव मळतसे माती
नसे जनाबाईपाशी
पंचपक्वान्न जेवण
रानी तिच्यासंगे हरी
पायी फिरे वणवण
माळी सावता महान
आवडीने नाम घेई
मळा राखण्यास काठी
सर्सावून देव जाई
एकनाथा घरी देव
पाणी भरी कावडीने
शेले कबिराचे विणी
फेडी दामाजीचे देणे
विषय: