बाबर पासून बहादुरशाह जफर पर्यंत विविध मुघल सम्राटानी या देशावर सत्ता गाजवली. विशेषतः बाबर (इ.स. १५२६) ते औरंगजेब (इ.स. १७०७) पर्यंत मुघलांची निरंकुश सत्ता होती म्हटल्यास वावगे ठरू नये. जे प्रादेशिक राजे वा प्रांतिक शासक शरण येत नाहीत त्यांच्यावर आक्रमण करून त्यांच्या नृशंस हत्या करायच्या, त्यांच्या जमिनी बळकवायच्या, त्यांच्या स्त्रिया पळवून आणायच्या आणि त्यांची राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणून तेथील कर आपल्या तिजोरीत भरायचा, अशी सर्वसाधारणपणे मुघलांची राज्य करण्याची पद्धती होती. शेकडो ते हजारो स्त्रिया मुघल बादशाहांच्या जनानखान्यात असल्याचे सांगितले जाते.
१६ वर्षात जे कमावले ते जवळ-जवळ सर्व पुरंदरच्या तहात राजांनी गमावले होते. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती. सोबत होती ती फक्त प्रचंड आत्मविश्वासाची, निर्धाराची, जिजाउंच्या आशीर्वादाची आणि स्वराज्यस्वप्न साकार करायचेच ह्या ध्येयाने झपाटलेल्या सोबतींची. नोव्हेंबर १६६६ मध्ये आग्र्याहून स्वतःची सुटका करून परत आल्यावर शिवरायांनी औरंगजेबाच्या दख्खन सुभेदाराला म्हणजे शहजादा मुअझ्झम याला 'आपण झालेला तह मोडणार नाही' असे पत्र लिहून स्पष्ट कळवले होते. ह्या मागचे राजकारण साधे सरळ होते. लढण्याची ताकद पुन्हा एकदा निर्माण करायला काही अवधी जावा लागणारच होता.
संदर्भ ग्रंथ - 'सह्याद्री' - स. आ. जोगळेकर.
१६६५च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी घाईघाईने राजगड गाठला. औरंगाबादहून निघालेल्या शाही फौजा सासवडला पोचल्या होत्या. २९ मार्च रोजी पुरंदरला वेढा पडला. १५ दिवस घमासान लढाई झाली. १४ एप्रिल रोजी पुरंदरचा जोडकिल्ला वज्रगड मुघलांनी काबीज केला. आता अंतिम लढाई सुरु झाली होती. किल्लेदार मुरारबाजी यांनी जीवाची बाजी लावली. मराठा इतिहासामध्ये ते अमर झाले.