सुखोईवर ब्रह्मोस
भारतीय हवाईदलाच्या सुखोई-30 एमकेआय विमानावरून ब्रह्मोस या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात 19 एप्रिल 2022 ला यशस्वी चाचणी घेतली गेली. भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेले ब्रह्मोस हे जगातील एकमेव स्वनातीत (सुपरसॉनिक) आणि लक्ष्यावर अचूक मारा करणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे.
ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारतीय भूदलात आणि नौदलात आधीच सामील करण्यात आलेले आहे. भारतीय नौदलातील युद्धनौकांवर ते तैनात करण्यात आलेले असून सध्या या क्षेपणास्त्राच्या पाणबुडी आवृत्तीचाही विकास केला जात आहे. त्याचबरोबर लढाऊ विमानांवरून डागता येऊ शकणाऱ्या आवृत्तीचा विकास आता पूर्ण होत आला आहे.