अनर्थ !
आमावसेची काळीकुट्ट रात्र होती. राकीड्यांची किरकिर तिची भयानकता अजून वाढवत होती. सगळीकडे स्मशान शांतता होती. असणारच!, कारण ते स्मशानच होतं. साधूच्या सांगण्यावरून राजा विक्रमादित्य स्मशानातून झाडावर लटकणारं प्रेत काढायचा. त्याला पाठीवर घेऊन साधूच्या होमकुंडाच्या दिशेने निघायचा. रस्त्यात त्या प्रेतात बसलेल्या पिशाच्चाने त्याला गोष्ट सांगायची, विक्रमादित्याने उत्तर दिलं नाही, तर डोक्याची शंभर शकलं होतील अशी भीती घालायची. आणि उत्तर दिलं की मात्र मौन भंगल म्हणून प्रेतासह परत झाडावर जाऊन लटकायचं. असा 'चीत भी मेरी, और पट भी' चा पिशाच्ची खेळ सुरु होता.