दरी
"सर" लांबून कुठूनतरी लहान मुलीचा आवाज कानावर पडल्यासारखं वाटलं त्याला. फळा पुसता पुसता त्याने मागे वळून पाहिलं. मुलांच्या नजरा फळ्यावर होत्या. भास झाला असेल असं वाटून पंकजने हाताने खडूची पावडर झटकली. तो हात पाठीमागे बांधून बाकांच्या मधून फिरत राहिला. मुलांच्या चेहर्यावरचा कोवळेपणा निरखून पाहता पाहता त्याला बिल्वाची आठवण येत होती. कशी दिसत असेल? १४ वर्षाची असेल आता. म्हणजे जवळजवळ याच मुलांएवढी. ओळखेल? स्वीकारेल? तिला मुळात आपल्याबद्दल काही माहीत असेल? मनात येणार्या प्रत्येक प्रश्नाबरोबर त्याच्या फेर्यांचा वेग वाढत होता. आपण वर्गात आहोत. बाकांच्या मधून फेर्या मारतोय.