सध्य:स्थितीत रहात असलेल्या जागेत ह्या कबुतरांनी ग्यालरीत जे डांबरी'करण सुरु केलय..त्याला तोड नाही.खरच नाही. कारण घासून काढायला पत्रा किंवा फावडं जरी वापरलं तरी "ते वाळलेले" तुटत काहि नाही. मेलं इथे उद्वेगानी "श्शी!" पण म्हणता येत नाही!
त्यामुळे त्याच सदर उद्-वेगातून ह्ये वेगवान विडंबन बाहेर पडलेले आहे. ते त्याच भावनेनी वेचावे...सॉरी, वाचावे! ,अशी विनम्र विनंती.
मला कबुतरे आवडतात
शुभ्र गिर्रेबाज आवडतात
मीच पाळलेली आवडतात
फक्त माझ्याच शीळेच्या लयकारीवर
गोफणीतल्या दगडा सारखी आभाळी घुसणारी
ढगांचे रेशमी तुकडे चोचीत घेऊन परतणारी आवडतात
ज्यांच्या पायात रंगीत मण्याची पैन्जणे असतात
जी माझ्या कवितेच्या वहीवरून ठुबुक ठुबुक चालत जातात
न जाणे कोणत्या भाषेतली गाणी गळयात घोळवून घोळवून म्हणतात,
मृत्यूवर लिहिलेल्या कविताही मग मधाळत जातात
माझ्या खिडकीखालून उगवलेल्या पिंपळाची पाने तर
चैत्रफुंकर पडण्याआधीच तांबुसतात