रात्रीचे

रात्रीचे

Submitted by मिल्या on 10 April, 2015 - 03:34

मुग्ध एकांत, किती शांत प्रहर रात्रीचे
उलगडूयात, मऊसूत पदर रात्रीचे

दिवसभर सूर्य रुबाबात किती वावरतो
झेलतो चंद्र मुक्यानेच कहर रात्रीचे

सौख्य, ऐश्वर्य, बडेजाव मिरविते दिवसा
केवढे भग्न, किती नग्न शहर रात्रीचे

वेदना रोज, करे संग नव्या देहाशी
पाळते मात्र तिचे पाप ... उदर रात्रीचे

दिवस काढून फणा ताठ डसे गात्रांना
आतल्या आत भिनत जात जहर... रात्रीचे

वीज कापूर, शशी ज्योत, तबक तार्‍यांचे
मेघ चौरंग, धुके धूप, मखर रात्रीचे

मिलिंद छत्रे

Subscribe to RSS - रात्रीचे