गारवा - विडंबन
Submitted by ओबामा on 1 March, 2018 - 20:06
गारवा पसरला थोडा
जागीच गोठला ओढा
बेफ़ाम धावतो आहे
पांढरा धुक्याचा घोडा...
घागरी घेऊनी काही
बायका निघाल्या कोठे
चरण्यास उधळल्या गायी
जाहले रिकामे गोठे...
कानास उपरणे टोपी
घोंगडी लोंबते खाली
शेतात चालला आहे
शेतांचा दणकट वाली...
शेगड्या बंब दाराशी
ओठांवर घुमली गाणी
पेटल्या चुलीवर कोणी
ठेवले चहाचे पाणी..
गजरात मंद चिपळ्यांच्या
वासुदेव देतो हाळी
ओट्यावर म्हातारीची
तालात वाजते टाळी...