क्षणात दिसून जाशी क्षणात लपून.. असाच काहीतरी खेळ सुरु होता.. ढगांच्या महासागरात सारा आसमंत बुडालेला.. पाच फुटापलिकडे काही दिसत नाही असे म्हणेस्तोवार बेफाम वारा येउन थैमान घालायचा नि क्षणात ढगाचा पडदा दूर लोटून भवतालाचा नजारा दिसायचा.. अगदी मंद धुंद वातावरण.. 'धोडप' च्या "रेलिंगबंद" अशा भिंती वरुन चालताना ह्या वातावरणाचा आस्वाद घेत होतो.. मग तो ढगांच्या अभिषेकात न्हाहून गेलेला धोडपचा माथा असो वा निसर्गाचा आविष्कार समजली जाणारी 'डाईक' भिंत असो !
नाशिक जिल्ह्यात तीन मुख्य डोंगररांगा पसरलेल्या आहेत . त्र्यंबकेश्वर, सातमाळ आणि बागलाण. या तीन मुख्य रांगाना अजंठा सातमाळ आणि बालाघाट या दोन उप-डोंगररांगाची जोड आहे. यातील अजंठा सातमाळ रांगेत नाशिक जिल्ह्यातील बहुतेक मोठे किल्ले वसलेले आहेत. या डोंगरांगांच्या आजुबाजुला विस्तर्ण पठारी प्रदेश आहे. सह्याद्रीतील दुर्गम डोंगररांगा मधे स्वराज्य स्थापन केलेल्या महाराजांना नाशिकच्या या भौगोलीक परिस्थीतीची उत्तम जाण होती, हे त्यांनी घेतलेल्या नाशिक मधिल किल्ल्यांवरुन लक्षात येते.