क्षणात दिसून जाशी क्षणात लपून.. असाच काहीतरी खेळ सुरु होता.. ढगांच्या महासागरात सारा आसमंत बुडालेला.. पाच फुटापलिकडे काही दिसत नाही असे म्हणेस्तोवार बेफाम वारा येउन थैमान घालायचा नि क्षणात ढगाचा पडदा दूर लोटून भवतालाचा नजारा दिसायचा.. अगदी मंद धुंद वातावरण.. 'धोडप' च्या "रेलिंगबंद" अशा भिंती वरुन चालताना ह्या वातावरणाचा आस्वाद घेत होतो.. मग तो ढगांच्या अभिषेकात न्हाहून गेलेला धोडपचा माथा असो वा निसर्गाचा आविष्कार समजली जाणारी 'डाईक' भिंत असो !
जेव्हा नाशिक-आग्रा हायवे सोडून वडाळभोई फाट्यावरून 'हट्टी' गावात आलो होतो तेव्हा 'धोडप' चा किल्ला धुक्याच्या साम्राज्यात विलीन झालेला.. पाउस नव्हता पण कधीही येइल असा संदेश अवतीभवती भिरभिरणाऱ्या ढगांकडून मिळत होता.. त्या छोट्याश्या 'हट्टी' गावातून वस्तीची एसटी सुटण्याची वेळ झालेली.. इथल्या शाळकरी मुलांसाठी हीच स्कूलबस ! झेंडावंदनला जाण्यासाठी लगबग सुरु होती.. तर एकीकडे म्हशीचे दूध काढून बाहेर विकण्यासाठी दुधाच्या मोठ्या किटल्या भरल्या जात होत्या.. हनुमान मंदिराच्या आवारातच आम्ही गाडी उभी केली नि थोडीशी पेटपूजा करून घेतली.. तिथल्याच एका गावकऱ्याने येउन चहा नि गाइड अशी दोन्हीची ऑफर दिली.. चहाला नाही कसे म्हणणार.. दुधासाठी पैसे देताना भाव कळला फ़क्त वीस रूपये लीटर !! तेही अगदी ताजं नि भेसळविरहीत ! मनात आले बाटल्याच भरुन घेउया..
आमच्यातल्या मुकादम उर्फ़ गिरी ने आणलेले 'तिरंगा' बिल्ले इंद्रा, रो.मा, मी व आमच्यासोबत पहिल्यांदाच आलेला आ.का असे सगळयांना लावले नि आझादी दिन का जशन मनाने हम निकल पडे ! खरे तर धोडप वर राहण्याचा मानस होता पण भल्या सकाळीच पोहोचलेलो.. तेव्हा दिवसभर धोडपवर धुक्याच्या साम्राज्यात काय रहायचे म्हणून प्लान बदलला.. धोडप बघून खाली उतरायचे नि दुसऱ्या किल्ल्याच्या पायथ्याशी रहायचे ! अजब गजब अचानक निर्णय घेण्यात आम्ही पटाईत.. शिवाय आता पाठीवरचे ओझे गाडीतच ठेवून ट्रेक करायची सवय जडलेली.. आमच्यामागून अजुन एक ग्रुप गाडी घेउन आला त्यात 'ऑनलाइन' ओळख असलेले श्रीकांत शिंपी, अनुप बोकील भेटले.. त्यांना हाय-बाय करून धोडप च्या दिशेने चिखल तुडवत निघालो !
'हट्टी' गाव मागे पडले नि डोळ्यांसमोर धोडपची अंधुकशी डोंगररांग तरळू लागली.. निसर्गाच्या हिरव्यागार गालीच्यातून चालताना मोर, बुलबुल, सातभाई अश्या विविध पक्ष्यांची किलबील कानी पडत होती.. पावसाचे तुरळक तुषार आनंदाने झेलत धोडपच्या डोंगराजवळ पोचलो.. संपूर्ण धोडपचा आकार नजरेला पडत नव्हता पण किल्ल्याची प्रसिद्ध नैसर्गिक 'खाच' ढगांमधून मध्येच डोकावत होती..
डोंगराच्या पायथ्याशी शेंदुरी रंगाच्या घाणेरी फुलांमध्ये मारुतीरायांची शेंदुर फासलेली मूर्ति विलोभनीय वाटत होती.. नमन करुन आम्ही धोडपला भिडलो.. वाट अगदी मळलेली व चढ फारसा अंगावर न येणारा..फारसी थकबाकी न होता कातळात कोरलेल्या गणेशमूर्ती जवळ पोहोचलो.. समोरच्या पाण्याच्या टाकीतल्या पाण्याने ताजेतवाने झालो.. धोडपचा माथा अजुनही ढगांमध्येच गुरफटलेला.. पावसाची मधुनच अगदी नावाला शिवार पडत होती.. पण भणाणता वारा सुरूच होता..
- - -
- - -
माथ्यावर ढगांची जत्रा भरली असली तरी तिथवर पोहोचेस्तोवर वातावरण स्पष्ट होइल अशी आशा होती.. पुढेच धोडपच्या खांद्यावर वसलेली चार- पाच घरांची 'सोनारवाडी' लागली.. ह्या वाडीत दुधाचा खवा मस्त मिळतो ऐकून होतो पण तिथे पोहोचलो तेव्हा काही तयार नव्हता.. आम्ही वरती सरकलो तसा हवेचा जोर वाढू लागला.. वाटेत पक्ष्यांची माहिती देणारे फलक दिसू लागले ! नि पुढे रेलिंग बंदिस्त वाटही नजरेस पडली.. ! तर एका बाजूस कातळात कोरलेल्या पायऱ्यांची वाट दिसली.. फारशी अवघड वाटली नाही पण पावसात रिस्क नको म्हणून फ़क्त रोमा व मी या वाटेने वरती चढलो.. तर बाकी सवंगडी रेलिंग वाटेने वळसा घालून आले.. इथेच उध्वस्त दरवाजा नि सुस्थितीत असलेल्या देवडया नि बुरुज दिसले.. बुरुजावरती पाण्याचे खोदीव टाके नि वरच्या अंगाची तटबंदी सारे बऱ्यापैंकी शाबूत..
--
आता वाऱ्याने रौद्ररूप धारण केलेले.. जमेल तसे ढगांना पांगवत होता.. मध्येच सुर्याची किरणे भवतालच्या डोंगररांगेवर पडत होती नि चहुबाजुंची हरितसृष्टि चमकून निघत होती.. धोडपचा शेजारी 'इखारा' सुळका मात्र ढगांमध्येच मशगुल होता.. ढग - वाऱ्याच्या खेळात दुरदुरची डोंगररांग अधुनमधून अंधुक दर्शन देत होती..
पुन्हा पायऱ्याच्या वाटेने मुख्य दरावाज्यापाशी पोचलो.. फारसी शिलालेख, दरवाज्याच्या उंबरावर असणारे किर्तीमुख , दोन्ही बाजुस असणाऱ्या खोबण्या सारं काही मस्त.. हा दरवाजा म्हणजे अगदी कातळात भोगदा करून मार्ग काढला आहे.. त्यामुळे देवड्या अगदी प्रशस्त.. दरवाज्यातून वरती आलो नि पुन्हा ढगांचा हल्लाबोल झाला..
धोडपचा माथा आता कुठे दिसत होता तर लगेच धुक्यात नाहीसा झाला.. वाटेच्या उजव्या बाजूला उध्वस्त वास्तू असली तरी एक बाजू अजुनही तग धरून आहे हेच आपलं नशिब.. उरल्यासुरल्या अवशेषांमध्ये सुद्धा पूर्वीची कलकौशल्य दिसून येते.. डाव्याबाजूला सुद्धा काही अवशेष नि पाण्याच्या टाक्या नजरेस पडतात..
पुढे एक वाट उजवीकडे चढत धोडपच्या कातळभिंतीत कोरलेल्या गुहेकडे नेते तर एक वाट धोडप च्या शेंडयाला उजवीकडे ठेवत पुढे जाते.. या वाटा दिसताच धुक्याआड गडप झाल्या.. आता आमचा प्रवेश गुडुप धुक्यात झाला जिथे फक्त नि फक्त थंडगार हवा सुटलेली.. आम्ही डावीकडच्या वाटेने पुढे गेलो जी अगदी कातळाला बिलगुन जाते.. काही गुहा लागल्यानंतर शेवटी मोठी गुहा लागते जिथेच देवीचे मंदीर आहे तर बाजुला शिवलिंग नि पिण्याच्या पाण्याचे टाके आहे... इथेच भर धुक्यात पेटपूजेचा कार्यक्रम आटपून घेतला. खरे तर या गुहेत रात्रीच्या मुक्कामाचा विचार होता जो ऐनवेळी बदललेला.. पण दिवसाच इथे बिनधास्तपणे फिरणारे उंदीर बघून सुटका झाली असे वाटत होते.. शिवाय वातावरणातला गारवा वाढतच होता.. झोपेचे खोबरे वाचले म्हणायचे !
दाट धुक्यातून वाट काढत आम्ही आता धोडपच्या खाचेकडे निघालो..
धोडपचा माथा म्हणजे सुळकाच.. अगदी महादेवाच्या पिंडी सारखा आकार.. तर त्यालाच लागून असलेली सरळसोट कातळ भिंत म्हणजे 'डाईक' भूस्तर रचनेचा उत्तम नमूना.. ह्याच अजस्त्र भिंतीचा मधला काही भाग अगदी केकचा तुकडा व्यवस्थित कापल्यासारखा गायब आहे.. तो नक्की पडला की पाडला गेला की निसर्गतःच खाच आहे हे ठाउक नाही पण यामुळे धोडपला आगळेच वलय प्राप्त झालेय.. त्याचा एकूण वैशिष्टपूर्ण आकारच दुरून सहज लक्ष वेधून घेतो..
आम्ही याच भिंतीवरुन चालत खाचेच्या टोकावर पोचलो.. सभोवताल ढगांनी घेरल्यामुळे सफेद पडद्यापलीकडे काहीच दिसत नव्हते.. आतापर्यंत चालु असलेल्या वाऱ्यानेसुद्धा नेमका ब्रेक घेतला.. जल्ला नव्याने लावलेल्या रेलिंगची तटबंदीच काय ती दिसत होती.. याच टोकावरुन धोडपचा माथा अप्रतिम दिसतो हे ऐकून होतो पण आता मात्र सगळे नाहीसे झालेले..
इतक होउनही अंधुकशी आशा होती की थांबलेला वारा पुन्हा जोमाने येइल नि ढगाच्या पडदयाला भगदाड पडेल.. खाचेच्या दुसऱ्या टोकाची भिंत दिसेल.. पण काही बदलाव दिसला नाही म्हणून खाचेकडे पाठ फिरवत माघारी येणार तोच वाऱ्याने मोठ्या जोशमध्ये एंट्री घेतली... वाऱ्याचा वेग क्षणाक्षणाला वाढू लागला.. खाचेकडे वळून पाहिले तर ढगाचा पडदा हलताना दिसला.. लागलीच धावत येउन रेलिंगला खेटून उभे राहीलो.. आता कुठल्याही क्षणाला दर्शन घडणार होते... अकस्मात वाऱ्याची एक जोरकस लाट येउन थडकली.. सफेद पडदयातून ढगांचे लोट आमच्या दिशेने सुटू लागले.. नि अचानक पडद्यातून खाचेची समोरची भिंत अंगावर आल्यागत प्रकट झाली.. आनंदात्मक चीत्कार बाहेर पडले..
- -
- -
मागे वळून पाहिले तर धोडपचा माथाही आपल्या अंगावरचे ढग झटकत होता.. वारा सैरवैर बेफामपणे सुटलेला.. रो.मा ची मायबोली टोपी कधीच दरीत उडून गेलेली.. सुसाट वारा अधून मधून आम्हालाही झटके देत होता.. अशावेळी त्या रेलिंगचे महत्त्व मात्र कळले.. कदाचित त्या रेलिंग मुळे आम्ही या परिस्थितीतही कड्यावर बिनधास्त होतो.. पण हेच रेलिंग एरवी मात्र खरच सह्याद्रीकडयाच्या रांगडेपणावर घातलेल्या बेडया वाटतात..
आता 'क्षणात दिसून जाशी क्षणात लपून.' असाच काहीतरी खेळ सुरु झाला.. धोडप ची खाच दिसते तोच ढगांचा एक थवा यायचा.. तो स्थिरावेल तोच वारा एका फटक्यात उडवून लावत होता.. पण ढगांची मेजोरिटी जास्त झाली की पुन्हा सफेद पडदा आडवा यायचा..!! या निसर्गाच्या खेळात सुंदर दृश्य दिसतेच.. असेच एक दृश्य म्हणजे सह्याद्रीमध्ये हिमनग पाहतोय असा अनुभव.. आतापर्यंत ढगाच्या महासागरात खुपसून बसलेल्या धोडपच्या सर्वोच्च टोकाने मान वर काढली नि आम्हाला आगळया दुनियेत घेउन गेला.. नंतर माथ्याला ढगांचा अभिषेक चालूच राहिला.. कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते..
- - -
- -
पुन्हा गायब
- -
आम्ही पुन्हा त्या मंदिरापाशी आलो.. इंद्रा त्या भन्नाट वाऱ्याने त्रासला होता सो त्याने किल्ला उतरायला पण घेतला..पण आम्ही कसरत करत त्या धोडप माथ्याच्या कातळात कोरलेल्या आयताकृती गुहेत चढून गेलो.. अगदी छोटी गुहा पण धोडपची माची इथून मस्त नजरेत भरते..
अखेरीस बेफाम वाऱ्यापासून सुटका करत आम्ही गड उतरायला घेतला.. नाही म्हटले तरी सगळे पाहता आले होते पण शेजारचा 'इखारा' सुळकाच दिसायचा बाकी होता.. त्यानेही मग दर्शन देत आम्हाला खुष केले... सोनारवाडीत पोहोचण्यापूर्वी जवळ असणारी दुमजली विहीर पाहून घेतली.. वरतून घुमटी, एका बाजूने उतरायला पायऱ्या, सुंदर कमानी अशी सुंदर विहीर पुन्हा उत्कृष्ट स्थापत्यकलेचा उदाहरण देते..
सोनारवाडीत विचारणा केली तर इथला खवा खाण्याची देखील इच्छा पूर्ण झाली.. खव्याचा आस्वाद घेत आम्ही 'इखारा' सुळक्याच्या दिशेने असणाऱ्या दरावाज्यापाशी पोचलो.. बऱ्यापैंकी सुस्थितीत नि बाजूला तटबंदी पसरलेली.. इथूनच मग एका वाटेने हट्टी गावात उतरलो..
तीन वाजेपर्यंत हट्टी गावात आलो.. आता पुढे कुठे जायचे हे अजुन ठरवायचे होते तेव्हा हनुमान मंदिरात बसून चर्चासुत्र सुरु केले.. बरीच नावं घेउन झाली शेवटी वणीदेवीचे दर्शन पक्के होते म्हणून 'मार्कंडया' ठरले.. हट्टी गावातूनच मग पारेगावजवळून शॉर्टकट घेत आम्ही 'बाबापुर' गावाच्या शोधात निघालो.. गाडीरस्ता चांगला आहे असे वाटत होते पण मध्येच एकाठिकाणी रस्ता चांगलाच उखडला होता.. गाडी जाईल की नाही प्रश्न होता.. त्याच रस्त्याने बाइक घेउन जाणारे गावाकरीदेखिल मदतीसाठी थांबले पण शेवटी इंद्रदेवांनी सहजपणे आपल्या चारचाकी रथाला चिखलदिव्यातून बाहेर काढले.. !!
- - -
संध्याकाळचे चार वाजत आले होते पण पावसाळी काळोख दाटला होता.. बाबपुर च्या शोधात आम्ही 'मार्कंडया' व 'रावल्या - जवल्या"च्या खिंडीत पोचलो.. पण आता वरती रहाण्याची सोय नाही असा गैरसमज करून आम्ही खिंडीच्या पलिकडे कळवण गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने उतरलो नि 'मुळाणे' गावात मुक्कामाची सोय होते का बघू लागलो.. पाहिले एका मंदिरात रहावेसे वाटले.. अगदी डोंगराच्या कुशीत.. पण इथल्या तुफान पावासात निभाव लागायचा नाही हे जाणले नि पुढचा शोध सुरु केला..
गावातल्या शाळेच्या पटांगणात फडकलेला तिरंगा !
आता पिटुकल्या आंगणवाडीच्या ओसरीत एका कोनाडयात चुल पेटवायचे प्रयत्न सुरु होते.. बाहेरच्या पावसाची झाप ओसरीवर अधून-मधून येतच होती.. फायरक्युबच्या जोरावर पेट घ्यायला लाकडं अगदीच नाकं मुरडत होती.. हे पाहून मात्र आमचा जठाराग्नी जास्तच पेटलेला.. आंगणवाडीच्या खोलीत झोपण्याची परवानगी काढून झोपेचा प्रश्न कसाबसा सोडवलेला.. पण आता जेवणाचा प्रश्न होता.. रेडी टू इट करायला रेडी होतो पण चुल कुठं मिळेना.. निदान एक टोप गरम पाणी तरी पण तेसुद्धा नाही.. अंधार पडायच्या आत जेवून झोपायचे होते.. हवेतला गारावाही वाढत चाललेला..गावातल्यांनी पाहुणचाऱ्यासाठी फारसा उत्साह दाखवला नाही पण त्यांची शेतीची कामं असल्याने त्यांना दोष देण्यात अर्थ नव्हता.. आम्हाला झोपण्यासाठी उत्तम खोली मिळाली हेच खुप होते..
चुल पेटवेपर्यंत एकाने हेतुपरस्पर मदतीची तयारी दर्शवली.. रॉकेल देण्याच्या आमिषावर बाटलीची सोय होते का पाहत होता.. ! तरीच म्हटले इतक्या घरांमधून हाच कसा मदतीला उभा राहिला.. आमच्याकडे 'तसले' काही नसल्याचे समजुन गेला नि तो तसा गायब झाला.. इथे आम्ही सूप चे कसेबसे पडघम वाजवले.. तर एकीकडे झोपण्यासाठी मॅट अंथरुन झालेल्या.. बाहेर वारा पाउस सुरूच होता.. अंधार पडला.. मेणबत्ती - टोर्चच्या प्रकाशात आमची खादाडीसाठी शेवटची खुडबूड सुरुच होती.. अजुन एकजण विचारपूस करायला आला मग कळले खरे तर त्याच्याकडचे तांदुळ विकायला आलाय.. म्हटले आहे सगळे आमच्याकडे पण तुम्हीच दया बनवून, पैसे घ्या काय ते तर तोदेखिल अंधारात गायब झाला.. ! रोमा व गिरी एव्हाना घरुन आणलेली अंडी खाऊन कधीच आडवे झालेले.. पण बाकी आम्ही श्रावणवासी 'सांभार- राइस' तयार व्हायची वाट बघत बसलेलो...
झोपण्यासाठी उत्कृष्ट जागा मिळाल्याने शांत नि मस्त झोप घेता आली... उजाडले तरी वातावरणात काही फरक नव्हता.. आता सकाळीच चुल कुठे पेटवत बसणार म्हणून मॅगी -चहा या आवडत्या गोष्टींचा त्याग केला नि खिंडी कड़े निघालो.. शिल्लक मावाकेक वगैरे थोड खाऊन आता 'मार्कंडया' करणार होतो..
आम्ही पुन्हा त्या खिंडीत पोचलो तर ढगच आमच्या स्वागतासाठी खाली उतरलेले.. इथेही वाटेला रेलिंगने बंदीस्त केले आहे.. पायर्यांचे काम सुरु असल्याचे दिसले.. धुक्यात काही दिसत नव्हते पण रेलिंगमुळे माथा लवकर गाठू असे वाटले.. इथेही धोडपसारखी बोचरी हवा.. भोवताल सारा धुक्यात लुप्त झालेला.. पंधरा मिनिटांत पायर्या संपल्या नि भग्न दरवाजा पार करून पठारावर आलो.. पण गड कितपत सर केलाय याचा काहीच पत्ता लागत नव्हता.. फक्त पायाखालची वाट मात्र ठळक दिसत होती तिच्याच मागावर चालू पडलो..
आतापर्यंतच्या वाटेने चांगलेच दमवले होते.. पण काहीच चाहुल लागत नव्हती.. जवळपास वळसा घेतल्यावर वाटेला दोन फाटे फुटले.. इथे धुक्याच्या सान्निध्यात झाडांच्या आकृत्या अगदी गुढमय भासत होत्या.. धुक्यात बुडालेला हा शांत परिसर खरच ध्यानधारणेसाठी उत्तम ! त्या काळात मार्कंडेय ऋषींनी ह्या डोंगरावरची जागा निवडल्यामुळे हा डोंगर व किल्ला त्यांच्या नावाने ओळखला जातो..
आम्ही वर जाणारी वाट पकडली नि लवकरच एका कातळकड्याखाली कातळातच कोरलेल्या दोन भुयार सदृश गुहा दिसल्या.. चिखल नि अंधार त्यामुळे आत खोल जाणे टाळले.. ध्यान करण्यासाठी या गुहेचा वापर केला जात असे ! बाजूलाच देवीचे मंदीर बांधले आहे.. इथवर आलो नि थांबलेल्या पावसाने रिपरिप सुरु केली.. भवताल काही दिसणार नव्हता याची खात्री पटलेली त्यात इथून पुन्हा अंगावर येणारे चढ़ सुरु.. शेवटी इंद्रा व् गिरी ने कंटाळून निवृत्ती पत्करली.. बाकी आम्ही तिघे मात्र त्या वाटेला सामोरे गेलो.. वाट मार्कंडयाला जाणारी आहे की ढगांच्या महालात जाणारी आहे हे कळत नव्हते.. वाट अगदीच खड्या चढणीची.. इथे संपूर्ण वाटेत दगड टाकलेत पण अगदी असे की पावसात उतरताना पाय घसरलाच पाहिजे.. वाटले होते ही वाट लगेच माथ्यावर नेईल पण पोचलो घळीत ! उजवीकडची वाट बुरुज सदृश पठारावर नेते तर डावीकडची वाट अजुन वर नेत होती..
उजवी वाट धुंडाळून आम्ही डावीकडच्या वाटेला भिडलो.. वाटेत अधून मधून कोरलेल्या पायऱ्या लागल्या.. शेवाळ,ओघळते पाणी इत्यादी अडथळे पार करत आम्ही पुन्हा धुक्यात अंधुक दिसणाऱ्या रेलिंग पाशी आलो..
पण चढ़ काही संपत नव्हता.. इथेच एका बाबाची झोपड़ी दिसली व बाबा पण भेटला.. एवढ्या वरती थंडगार वाऱ्याचा नैसर्गिक एसी लावून ढगांच्या महालात एका झोपडीत एकटाच राहतोय ! ग्रेट ! या झोपडीच्या पलिकडे पाण्याच्या टाक्या आहेत.. त्यांच्या मागून वाट अजुन वरती सरकते जिथे मार्कंडेय ऋषींचे छोटे मंदीर आहे.. हेच मंदीर म्हणजे या डोंगराचा किल्ल्याचा सर्वात उंच भाग.. जेव्हा जेव्हा वणीला सप्तश्रुंगी देवीच्या दर्शानाला गेलो तेव्हा अगदी समोरच दिसणारा हा अवाढव्य डोंगर नि टोकाला असणारे छोटे मंदीर नेहमीच लक्ष वेधून घेत होते.. कधी तरी या मंदिरापर्यंत जायचे ही इच्छा आज पूर्ण झाली होती.. इतक्या दमछाक चाली नंतर एक आगळाच आनंद मिळाला.. इथून सप्तश्रुंगीचे दर्शन मात्र काही झाले नाही.. ढग - वाऱ्याने पुरते वेढले होते !
- - -
छोट्या मंदीरातील ऋषींच्या ध्यानस्थ मुर्तीचे दर्शन घेउन उतरायला सुरवात केली.. ध्यानस्थ गुहांपर्यंत पोचलो नि अचानक समोरचा ढगाचा पडदा हलू लागला.. निसर्गचित्र उमटायला लागले... सूर्यकिरणांनी झळाळी आली.. आम्ही ढगांच्या दुनियेतून फार नाही पण बर्यापैकी बाहेर आलो.. मार्कंड्या डोंगराचा माथा मात्र ढगांमध्येच लपलेला.. पण खाली पठारावर घर दिसली.. आश्रम असल्याचे लक्षात आले.. इथे निवासाची व चुलीची सोय झाली असती हे तिथे गेल्यावर कळले मग काय फ़क्त 'अरेरे अरेरे'..!
आका व रोमा तर जल्ला खायला निदान खोबरं तरी मिळतय का बघत होते.. भूकच फार लागलेली.. आता माघारी फिरताना भवताल अगदी प्रसन्न वाटत होता.. अगदी सकाळी येताना जी वाट अगदी निरुत्साही वाटत होती तीच वाट आता 'इथे बघ तिथे बघ' करत होती.. उतरताना खिंड नि खिंडीतुन जाणारा वळणाचा रस्ता अगदी सुरेख दिसत होता.. खिंडीपलीकडे रवळ्या-जवळ्या डोक्यावर ढग घेउन उभे होते..
आमचे थकलेले मित्र मात्र पायाथ्याला गाडीत आराम करत होते.. तासभरात खाली पोचलो.. पावसाने एव्हाना दडी मारली होती.. तीच मिळालेली संधी समजुन आडव्या येइल त्या ओढयावर अंघोळ करण्याचे ठरले.. तसा स्पॉट बघून ठेवला होताच..
आता भुक कडकडून लागली होती तेव्हा त्वरित वणीचा रस्ता पकडला.. कळवण रस्त्यामार्गे जाताना 'धोडप'ने आपले रांगडे सौंदर्य दाखवून दिले.. पुढे कण्हेरगड व नंतर मोहनदरी या दोन गडांचे फ़क्त मुखदर्शन घेउन आम्ही नांदुरला पोहोचलो.. वाटेत पाउस लागला नव्हता पण वरती सप्ताश्रुंगी गडावर पावसाचे चिन्ह स्पष्ट दिसत होते..
टोलनाक्यानंतर घाटरस्ता सुरु होण्याआधी चैतन्य होटेल लागले नि अगदी नाश्त्यापासून जेवणापर्यंतची ऑर्डर देऊन झाली.. !! चैतन्यपूर्ण ढेकर दिले नि देवीच्या दर्शनाला निघालो.. घाट रस्ता चढून गेलो नि मुसळधार पाउस आडवा आला..
गाडी मंदीराच्या पायाथ्याला पार्क केली.. नुकतीच मोठी सर येउन गेल्याने सगळीकडे चिंब चिंब झालेले.. रोमा, गिरी या पहिलटकरांनी नारळहार घेतले नि आम्ही पायऱ्या चढायला घेतल्या.. माझा तर यावेळी सुद्धा गडाला प्रदक्षिणा घालण्याचा विचार होता.. देवीची मुर्ती सामोरी आली आणि आतापर्यंतच्या सगळ्या त्राणाचा विसर पडला.. या मंदिराचा परिसर नि मंदिर बऱ्यापैंकी आहे तसेच आहे.. इतर सेलिब्रेटी मंदिरा सारखे मोठे बदल नाहीत.. त्यामुळे देवीदर्शन नि फिरणे अगदी मनसोक्त होते.. इथून समोरचा मार्कंडया डोंगर नि टोकावरचे मंदिर बघून तर अभिमान वाटत होता.. भरुन आलेल्या आभाळाखाली पसरलेला मार्कंडया सारखे लक्ष वेधून घेत होता.. त्याच्या एका कडेला वाऱ्यामुळे तयार झालेले पाण्याचे धुरांडे म्हणजेच 'reverse waterfalls' तर खासच.. मार्कंडयाच्या मागे 'रवळ्या-जवळ्या' नि 'धोडप' रांग उठून दिसत होती..
आमचे एकत्रितपणे असे ट्रेक वारंवार होवोत अशी मनोमन सामुहीक प्रार्थना करून आम्ही देवीचा निरोप घेतला.. ट्रेकचा शेवट सुंदर झाला यात खुप समाधान मिळून गेले.. नेहमीप्रमाणे 'ठरवले एक नि केले एक' असाच ट्रेक झाला.. मुक्काम होता धोडपवर पण राहिलो मार्कंड्याच्या पायाथ्याला.. असो सह्याद्रीसंपन्न अश्या नाशिक जिल्ह्यातील अजुन तीन किल्ले झाले हीच खरी एक आनंदाची बाब.. अजुन तर बराच आकडा गाठायचा आहे.. !!
(उजवीकडून सप्तश्रुंगी, मार्कंडया, रावळ्या व जावळ्या, नि मागे अंधुकसा धोडप)
[# कॅमेर्यातील सगळे फोटो तांत्रिक बिघाडामुळे उडाले तेव्हा वरील सगळे फोटो मोबाइल मधले ! देवीचा फोटो गिरीच्या मोबाइलमधून ]
सुंदर!!! धोडपवर पुर्वी
सुंदर!!! धोडपवर पुर्वी कुणीतरी गाय वासरु आणि खाचेबद्दल लिहिलं होतं. ती खाच दिसली का तुम्हाला?
मार्कंडेय ऋषी व सप्तशृंगी...वा! दोन्ही आमने सामने आहेत हे माहित नव्हतं. मार्कंडेयांनीच 'दुर्गा सप्तशती' ग्रंथ लिहिला आहे.
अप्रतिम वर्णन आणी फोटो
अप्रतिम वर्णन आणी फोटो ....हिरव हिरव किति सुंदर वातावरण आहे.
अप्रतिम फोटो नि वर्णन
अप्रतिम फोटो नि वर्णन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुपर्ब!
सुपर्ब!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लै भारी फोटु नि वर्णनही मस्तच
लै भारी फोटु नि वर्णनही मस्तच .....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम
अप्रतिम
फोटो आणि वर्णन दोन्ही ही
फोटो आणि वर्णन दोन्ही ही सुरेख! !
(No subject)
छान .एकदा थंडीत गेलो होतो
छान .एकदा थंडीत गेलो होतो जुन्या पायऱ्यांच्या वाटेने सप्तश्रृंगी गडावर. वरच्या चहाच्या टपऱ्या फारच अरारा. एकपण बरे हॉटेल नाही. समोरचा बोडका बिनझाडीचा डोंगर पाहून तसाच परत आलो.पावसाळयात बरे असावे.
क्लास फोटो रे मित्रा !!!
क्लास फोटो रे मित्रा !!! कमाल.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धोड्प व मार्केडया वरील रेलिन्ग्स बघुन फार वाइट वाटले पण.
सप्तशृंगी देवी कोणत्यातरी असुराचा वध करून जाताना ठेच लागून ती वेलशेप्ड धोडप ची खाच निर्माण झाली असे गावकरी सांगतात. खाचेच्या शेवटच्या point वरून मनात इच्छा धरून दगड फेकल्यास आणि तो खाचेच्या दुसर्या बाजूपर्यंत पोहोचल्यास मनातील इच्छा पूर्ण होते म्हणतात.
बाकी गाय आहेच अजून तिथे!!!
सेम अशीच पण ७ कमानी असलेली विहीर धोडपच्या कळवणकडील बाजूस ओतूर गावातही आहे. दोन्ही कनेक्टेड आहेत म्हणतात.
सर्वच फोटो छान, पहिल्या
सर्वच फोटो छान, पहिल्या फोटोतल्या पाण्याचा पोत खासच पकडलाय !
तो रस्ता होता होय ! मला वाटलं
तो रस्ता होता होय ! मला वाटलं तुम्ही लोकांनी शेतातूनच गाडी चालवली.
मस्त फोटो.
इथे जे गुहेचे वर्णन आहे ते
इथे जे गुहेचे वर्णन आहे ते वाचून, मिलिंद बोकिलांच्या "गवत्या" कांदबरीतली गुहा हिच असावी असे वाटायला लागलेय. यो हे पुस्तक मिळाले तर अवश्य वाच.
मस्तच. गाय वासरु आणि
मस्तच.
गाय वासरु आणि खाचेबद्दल लिहिलं होतं. ती खाच दिसली का तुम्हाला? >>++
बाकीचे फोटो छान आहेत पण तो झाडाचा फोटो सुंदर आहे.
अरेरे! अजूनही या बाजूला जाणं
अरेरे! अजूनही या बाजूला जाणं झालेलं नाही. सध्या तुमच्या फोटोवरच तृष्णा भागवतो.
धन्यवाद सूज्ञ माणसाने
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सूज्ञ माणसाने सांगितलेल्या खाचे बद्दल उत्सुकता होती पण पावसात शोध घेणे कठीण म्हणून तो प्रयत्न नाही केला..
अशीच पण ७ कमानी असलेली विहीर धोडपच्या कळवणकडील बाजूस ओतूर गावातही आहे. दोन्ही कनेक्टेड आहेत म्हणतात. एकदा तुझ्याबरोबर फिरावे लागेल.. बरेच शोध लागतील![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा.. नक्की
सुंदर... चांदवड ते धोडोप
सुंदर... चांदवड ते धोडोप ट्रेक झालाय पण पुढच्या भाग राहून गेलाय. धोडोपच्या पायथ्याला सोनारवाडीच्या कमानीच्या थोडे पूढे एक आश्रम आहे आम्ही तिथे राहिलो होतो आणि इखार्या सूळका पण केला होता.
बर राघोबादादांबद्दल काही लिहिले नाहीस? धोडोपवर नजरकैदेमध्ये होते ते काही काळ.
एक 4men टेंट घेउनच टाका आता.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त फोटो आणि वर्णन
मस्त फोटो आणि वर्णन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतिशय सुंदर लिहिल आहेस , मला
अतिशय सुंदर लिहिल आहेस , मला तिथे पोचाल्यासारखच वाटल , धुक लपेटलेल्या झाडाचं फोटो सुपर्ब !
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रे यो... आठवणी जाग्या
मस्त रे यो... आठवणी जाग्या झाल्या...
चला परत ट्रेकला कुठेतरी...सह्याद्री वाट पाहतोय..
मस्त फोटो रे.
मस्त फोटो रे.
योगेश फोटो मस्त आहेत… ७
योगेश फोटो मस्त आहेत…
७ कमानी असलेली विहीर कोल्हापूर जिल्ह्यातील सामानगड किल्ल्यावरदेखील आहे. त्याला हनुमान विहीर असे नाव आहे.
(No subject)
(No subject)
फिरावे लागेल.. बरेच शोध
फिरावे लागेल.. बरेच शोध लागतील >> यो रॉक्स आणि इतर भटके माबोकर यांच्यासाठी ही पोस्ट.
भुयार या पुस्तकात अशा बर्याच अडनिड्या जागेतल्या भटकंती विषयी माहिती आहे. लेखक बाळ बेंडखळे ( हे माझे शिक्षक आहेत) यांनी बर्याच वर्षापुर्वी फिरलेल्या भुयारांविषयी लिहीले आहे. तुम्हा कोणाला इंटरेस्ट असेल तर हे पुस्तक वाचुन तशी भटकंती करता येईल.
पुस्तक वाचुन सरांना भेटुन काही बोलायचे / विचारायचे असल्यास मी मदत करु शकते.
सुंदर, फोटो आणि वर्णन
सुंदर, फोटो आणि वर्णन दोन्हीही.
झाडाचा फोटो तर एकदम क्लास, एकदम गुढ वातावरण वाटत आहे. मोबाईलवरून एवढे सुंदर फोटो, कॅमेर्यात तांत्रिक बिघाड झाला नसता तर पर्वणीच मिळाली असती.
सावली, मस्त माहिती. ते
सावली, मस्त माहिती.
ते केव्ह एक्सप्लोरर या संस्थेशी निगडीत होते का?
प्रत्यक्ष भेटायला आवडेल.
सिद.. मस्त फोटो.. सावली..
सिद.. मस्त फोटो..
सावली.. माहितीबद्दल धन्यवाद
बर राघोबादादांबद्दल काही लिहिले नाहीस?>> सेन्या.. इतिहासाबद्दल तूच लिहीशील तर मस्त !!
केव्ह एक्सप्लोरर या संस्थेशी
केव्ह एक्सप्लोरर या संस्थेशी निगडीत होते का? >> माहित नाही, पण नसावेत. ते बहुतेक वेळा एकटेच फिरत असत.
तु इथे आलास की भेटायला जाऊ शकतो. ( रच्याकने, तुझ्या नावात तीन डॉट्स का झालेत आता? )
Pages