आक्रोश करायचा आहे...
कधीचा.. थांबून ठेवलेला.
कित्येक जुन्या वर्षांचा..
कित्येक दिवसांचा..
मागचा.
कालचा.
आत्ता या क्षणाचा.. आक्रोश करायचा आहे..मला
पार बेंबीच्या देठापासून..
अगदी मेंदूतील रक्त
गोठवणारा आक्रोश.
किंवा अख्खे शरीर ही..
त्या समुद्र मंथनाच्या गोष्टी सारखे..
समुद्र घुसळून टाकणारा आक्रोश...
पण मला काहीच नकोय...
मी दानवही नाही आणि देव तर मुळीच नाही.
लोचट लेकाचे.
मी पाहिली आहे सोसेनाशी (सोशल मीडियावर)
एका कवीची भीषण उपेक्षा
कवयित्रीला रिप्लाय लाडीक
कवीला नसते खारीक बारीक
अघोरी गप्पा मैलामंडळाच्या
कवयित्रीच्या कवितांवर चाली
यमक जुळवा, अथवा तुडवा
कच्छचे रण कवीच्या भाळी
दु:खात भर आणि तेव्हां पडते
जेव्हां कवयित्री सुंदर असते
गद्य जरी लिहीले तिने
ते महान एक काव्य ठरते
मी कवी एक फाटका तुटका
झोळी घेऊन उन्हात फिरतो
सावलीतले प्रतिसाद लाडे
घामात निथळत वाचत बसतो
कवी दिनाचे निमित्ताने तुमची
गचांडी धरतो रिप्लायसाठी
विनोद समजून सोडून द्यावा
टाळी द्या एक कवितेसाठी
कवी - उद्ध्वस्त कपोचे
दिवाणाखाली कचरा साचलाय
कपाटावर धूळ जमा झालीय
भिंतीचे पापुद्रे ओठ काढून आहेत
सारवल्या नाहीत मी अजून.....
छप्पराचा पत्रा चिरलाय
त्यातून येते दिवस असताना
धुलीकणांशी घुटमळत
एखादी प्रकाशाची तिरीप
आणि रात्री थोडा निःशब्द गारवा...
कपडे अस्ताव्यस्त पडलेत
रणांगणात मरुन पडलेल्या सैनिकांसारखे
निवांतपणे अगदीच सुन्न.. बेवारस
तुझ्या स्पर्शाची वाट बघत..
जणू तू येशील अन भरशील
तुझ्या जिव्हाळ्याचे श्वास त्यांच्यात
आणि बोलू लागतील ते निर्जिव कपडेही..
प्रत्येक कोपर्यात जाळं विणलंय कोळ्याने
रोज हळूहळू आकार वाढत जाणारं
माझ्याकडे बघून छद्मीपणे हसणारं
अख्खं घर त्याच्या विळख्यात घेऊ पाहणारं..