मला होईल तो होऊच दे तू त्रास आता
तुझ्यावाचून मी घेईन सारे श्वास आता...
तुझी जागा कुणाला मी कधी देणार नाही
मनाजोगा हवा आहे गळ्याला फ़ास आता
खर्या प्रेमामुळे आयुष्य़ जर बर्बाद होते
कसा ठेवू इथे कोणावरी विश्वास आता
जिथे जावे तिथे येतो थवा हा आठवांचा
नकोसा वाटतो एकांत या देहास आता
मुळाशी घाव तू घालून गेली काळजाच्या
पहा होणार नाते आपले खल्लास आता
जसा उद्धार सीतेचा कधी जाळात झाला
तसा होणार का उद्धार माझा खास आता...
पुन्हा नाही दिसायाचा तुला संतोष वेडा
प्रिये तू मोकळे हासून घे बिंधास आता...
दिवाणाखाली कचरा साचलाय
कपाटावर धूळ जमा झालीय
भिंतीचे पापुद्रे ओठ काढून आहेत
सारवल्या नाहीत मी अजून.....
छप्पराचा पत्रा चिरलाय
त्यातून येते दिवस असताना
धुलीकणांशी घुटमळत
एखादी प्रकाशाची तिरीप
आणि रात्री थोडा निःशब्द गारवा...
कपडे अस्ताव्यस्त पडलेत
रणांगणात मरुन पडलेल्या सैनिकांसारखे
निवांतपणे अगदीच सुन्न.. बेवारस
तुझ्या स्पर्शाची वाट बघत..
जणू तू येशील अन भरशील
तुझ्या जिव्हाळ्याचे श्वास त्यांच्यात
आणि बोलू लागतील ते निर्जिव कपडेही..
प्रत्येक कोपर्यात जाळं विणलंय कोळ्याने
रोज हळूहळू आकार वाढत जाणारं
माझ्याकडे बघून छद्मीपणे हसणारं
अख्खं घर त्याच्या विळख्यात घेऊ पाहणारं..