बाहुली
त्या खोलीत फारसा उजेड नव्हताच. बाहेर आभाळ चांगलंच अंधारून आलं होतं. काळसर हिरवट भासणारं उदास वातावरण, गडद हिरव्या रंगांची गाद्यांची आवरणं आणि कांबळी. या सगळ्यांचं त्या खोलीत एक प्रकारचं विचित्र मिश्रण झालं होतं. ती बाहुली एका मखमली आच्छादनाच्या खुर्चीत पडली होती. अन् तिथल्या त्या उदास रंगछटेत ती बेमालूमपणे मिसळून गेली होती. हिरव्या मखमली कपड्यांत अन् टोपीत आपल्या रंगवलेल्या मुखवट्यासह ती अस्ताव्यस्त लांब पसरलेली वाटत होती. पण लहान मुलं जिच्यावर 'भावली' म्हणत झेपावतात, तशी ती नव्हतीच मुळी! एखाद्या कळसूत्री बाहुलीसारखी दिसायची.