कोकणात जायचे म्हटले की प्रथम आपल्या डोळ्यांसमोर दिसतो तो अथांग असा समुद्र व त्याचा किनारा. परशुरामांनी समुद्राला ४०० योजने मागे हटवून कोकण वसविले अशी आख्यायिका सांगतात. कोकणातली अनेक पुरातन व प्राचीन मंदिरही प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच चिपळुणजवळील एक परशुराम मंदिर. महाराष्ट्रात परशुराम मंदिर आहेतच त्याशिवाय केरळ, आसाम, गुजरात व पंजाबमध्येही परशुराम मंदिर असल्याचे वाचण्यात आले.
१०/८/२०१३
बरेच दिवसांपासून कुठे तरी लांब हिंडण्याचा मनोदय होता. पाऊस उघडला होता. त्यामुळे लांब कुठेतरी हिंडून येण्याचे पक्के केले. चिपळुणला आमचे कुलदैवत श्री. करंजेश्वरी आहे. तिचे दरवर्षी दर्शन घेण्यासाठी आम्ही नवरात्रात जातो. मागील वर्षी काही कारणामुळे राहून गेले होते. यावर्षी लवकरच दर्शन घेण्यासाठी निघालो. ताम्हिणी घाटातून रायगड, चिपळूण, श्री. परशुराम मंदिर, विसावा पाइंट व नंतर संगमेश्वर येथील श्री. कर्णेश्वर मंदिर व परत येताना कुंभार्ली घाटातून परत घरी असा दोन दिवसांचा प्रवास केला. त्या विषयी....