इम्पोर्टेड गुरु
Submitted by kulu on 26 January, 2018 - 01:53
"सुटलं का तुमचं पीएचडी?" सासुबाईंच्या मैत्रीणीनं विचारलं अन मी जेलमधुन बाहेर पडलो की काय असं मला वाटुन गेलं.
एका अर्थाने तेही काही चुकीचं नव्हतं. पीएचडी केलेल्या अन करणार्या प्रत्येकाला असच वाटत असावं. पण पीएचडी म्हणजे नेमकं काय, याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत.
"आता तू पीएचडी करणार म्हणजे तुला नोबेल मिळणार का?" मला अॅडमिशन झाली तेव्हा माझ्या भाचीनं विचारलं होतं. तिला लहानपणापासुन नोबेल लॉरेटच्या गोष्टी सांगण्याचा परिणाम असावा.
"भाऊ मग तुम्ही नेमकं काय करणार आहे, पीएचडी म्हणजे एकदम धासू काम असेल ना"
"हां. मी लेजरवर काम करणार आहे."
"पण त्याचा तर खूप वास येत असेल ना"