पीएचडी पुराण - भाग १ :- पीएचडी म्हणजे काय?

Submitted by विजय देशमुख on 14 August, 2013 - 03:28

"सुटलं का तुमचं पीएचडी?" सासुबाईंच्या मैत्रीणीनं विचारलं अन मी जेलमधुन बाहेर पडलो की काय असं मला वाटुन गेलं.
एका अर्थाने तेही काही चुकीचं नव्हतं. पीएचडी केलेल्या अन करणार्‍या प्रत्येकाला असच वाटत असावं. पण पीएचडी म्हणजे नेमकं काय, याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत.
"आता तू पीएचडी करणार म्हणजे तुला नोबेल मिळणार का?" मला अ‍ॅडमिशन झाली तेव्हा माझ्या भाचीनं विचारलं होतं. तिला लहानपणापासुन नोबेल लॉरेटच्या गोष्टी सांगण्याचा परिणाम असावा.
"भाऊ मग तुम्ही नेमकं काय करणार आहे, पीएचडी म्हणजे एकदम धासू काम असेल ना"
"हां. मी लेजरवर काम करणार आहे."
"पण त्याचा तर खूप वास येत असेल ना"
"वास?" मला वाटलं तो केमिकल लेजर वगैरेचा विचार करतोय की काय.
"हो ना, ते आधी सडवतात मग ..."
"अर्रर्र... ते लेदर आहे, लेजर नाही."
"मग हे लेजर काय असते भाऊ?" त्याने अगदी निरागसपणे विचारलं.
"जे डोळ्याच्या ऑपरेशनसाठी वापरतात ना ते..." माझ्याकडे एकच ऑप्शन होता.
खरंतर पीएचडी म्हणजे आधीच्या लोकांनी जे संशोधन केलय, त्यात आपण थोडीशी भर घालणे, पण काही लोकांना असं वातते, की पीएचडी केलेल्या माणसाला त्या विषयाचं संपुर्ण ज्ञान असतं आणि बरेचदा "अरे तो पीएचडी आहे पण त्याला हेसुद्धा माहीती नाही" असेहि शेरे ऐकावे लागतात.
तसेच अनेक बाबी आहेत, ज्यावर लिहावसं वाटतय. अर्थातच मी कोणत्याही क्षेत्राचा जाणकार नाही, आणि यासोबत अनेक लोकही इथे लिहितलच.

पीएचडीतील अनेक तांत्रिक संज्ञा आहेत आणि त्यांची वेगळी मजाही.

१. problem :- माझा एक मित्र पहिल्यांदाच International Conference साठी गेला होता. तेव्हा एका परदेशी शास्त्रज्ञाने त्याला विचारले, "What is your problem?" त्याला काही कळेचना. तो म्हणाला, नाही मला काहीच problem नाही. त्यावर तो शास्त्रज्ञ हसायला लागला आणि मग त्याने मित्राला समजावुन सांगीतले की problem म्हणजे संशोधनाचा विषय.

२. conference:- एक प्रकारचं शास्त्रीय गटग. भारतातली conference म्हणजे झकास जेवण तर परदेशातली म्हणजे उपासमार. Happy अर्थात परदेशातल्या conference ला गेल्यावर तिथले टुरिस्ट स्पॉटस बघण्याचीही संधी असते.
वेगवेगळ्या देशातील/ भागातील आपल्याच क्षेत्रातील अनेक लोकांना भेटण्याची संधी मिळते. वेगवेगळ्या कल्पना मिळतात, बाकी लोकं कसे संशोधन करतात, अडचणी कश्या दुर करता येतील याच्या कल्पना मिळतात.
अर्थात काही लोकं याकडे फक्त खाणे,पिणे आणि मौज इतकच बघतात, हा भाग वेगळा.

३. बॉस/ अ‍ॅडवाईजर/ प्रोफेसर/ गुरुजी/ मास्तर वगैरे....
हा एकच माणुस असतो, ज्यामुळे तुमचं पीएचडी होऊ शकते किंवा उध्वस्तही. अर्थातच गुरुजीचे उपकार असले तरी ४-६ वर्षात जे काही विद्यार्थी भोगतो, ते कधी मजेदार किस्स्यांमधुन बाहेर येते, तरी दारुच्या ग्लासात ओतले जाते.

४. पल्बिकेशन/ आर्टीकल/ manuscript/ रिसर्च रिझल्ट्स / (रिसर्च) पेपर वगैरे :- संशोधकाचं मुल्यांकन या पेपर्सच्या आधारे होत असतं. जसं एखादी बातमी मोठ्या (आणि प्रतिष्ठीत) वर्तमानपत्रात आली की लोकांना आनंद होतो (उदा. times magzine) तसच काहीसं संशोधकांचं आहे. प्रत्येक क्षेत्राला वाहुन घेतलेले शेकडो जर्नल्स (scientific journals/ magzines) आहेत, त्यात अनेक ग्रुप्ससुद्धा आहेत. उदा. नेचर, सायन्स, IEEE, इत्यादी. यांच्या वेगवेगळ्या जर्नल्समध्ये आपलं संशोधन प्रसिद्ध करणे हे मानाचे मानले जाते. पण म्हणुन केवळ संशोधन प्रसिद्ध होणेच पुरेसे नाही, तर ते संशोधन दुसर्‍या कोणी वापरले आहे का (ज्याला citation म्हणतात), तेही खुप महत्त्वाचे. जितकं जास्त citation तितकं महत्त्वाचं संशोधन. यावरुनच प्रत्येक जर्नलचा impact factor काढतात. म्हणजे एखाद्या जर्नलमध्ये एका वर्षात प्रसिद्ध झालेले लेखांपैकी कीती लेख त्याच्या पुढच्या (किंवा ५ वर्षात) cite झाले, तो फॅक्टर. नेचर, सायन्स, सेलसारख्या उच्चश्रेणीतील जर्नलचा impact factor सर्वात जास्त असतो.
टिपः- हा impact factor ग्रुप ऑफ जर्नलचा नसुन वेगवेगळ्या जर्नलचा असतो. त्यामुळे नेचर मटेरिअल सायन्स आणि नेचर फोटॉनिक्स या नेचरच्याच वेगवेगळ्या जर्नलचा impact factor वेगवेगळा असतो.
बर्‍याच आधी या impact factor वर लोकांची बरिच टिका केली होती. कारण स्वतःच्याच पेपरला स्वतःच दुसर्‍या एखाद्या जर्नलमधल्या पेपरमध्ये cite केले की त्या जर्नलचा impact factor वाढतो. त्यामुळे आता असे citation वजा करुनही impact factor काढतात, असे ऐकवीत आहे. पण अजुनही impact factor ला बरच महत्त्व आहे.
पण जसं कुठल्याही तरूणीला वय विचारू नये, तसच कोणत्याही संशोधकाला किती पेपर झाले हे विचारू नये, असा अलिखित नियम आहे.

५. h-index:- Impact Factor किंवा self-citation यावरुन एखाद्या संशोधकाची दुसर्‍याशी तुलना करणे वादाचे होते. त्यामुळे पुढे (२००५ मध्ये) h-index हा प्रकार पुढे आला. यात तुमच्या किमान किती पेपर्सला किमान तितकेच citation आहेत, हे बघितल्या जाते. उदा. समजा माझे २५ पेपर्स आहेत, त्यापैकी काही पेपर्सना १००+ तर काहींना १-२ citations आहेत. २५ पेपर्समधील समजा १० पेपर्सना किमान १० (किंवा अधिक) citations असतील, तर माझा h-index =१०. विकिवरील हा आलेख आणि त्यावरुन काढलेला h-index बघा.
एक मजेदार अभ्यासातुन नोबेल पारितोषिक विजेत्यांचा h-index १०० च्या जवळपास असतो असे आढळुन आले आहे. भारतातील डॉ. सी.एन.आर. राव यांचा h-index १०० आहे, याचा अर्थ त्यांच्या १५०० हुन अधिक पेपर्सपैकी किमान १०० पेपर्स १०० किंवा त्यापेक्षा अधिकवेळा cite केले आहेत.

citation हे एक प्रकारचं पुर्वी झालेल्या संशोधनाला दिलेली पोच. अशी पोच देणे आता आवश्यक झाले आहे. जर तुम्ही एखाद्याच्या संशोधनातील कोणताही भाग वापरत असाल तर ही पोच न देणे हा एक प्रकारचा गुन्हा मानल्या जातो. अशाच एका प्रकारामुळे नुकतच एका कोरियातील जागतिक दर्जाच्या विद्यापीठातील प्राध्यापकाला तत्काळ बाहेरचा रस्ता दाखवल्या गेला आणि आजन्म कोणतेही शास्त्रीय संशोधन प्रसिद्ध करण्यावर बंदीही घालण्यात आली. त्यामुळे सहसा असं करण्याची भानगड कोणी करत नाही. तसच to the best of our knowledge असं म्हणुन एखादं संशोधन माहीती नसेल ही शक्यता ग्रूहीत धरुनच पुढे संशोधनाचे details लिहिले जातात. तसही आजकाल सगळे संशोधन ऑनलाईन उपलब्ध आहे, तसच तुम्ही एखादं वाक्य कुठुनतरी कॉपी केली आहे का, तेही अवघ्या काही सेकंदात कळतं. त्यामुळे अश्या भानगडीत न पडलेलंच बरं.
काही वर्षांपुर्वी पेटंट रिपोर्टवरुन बरच वादळ उठलं होतं, आणि दुर्दैवानं त्या कमिटीच्या संचालकपदावरुन एका मराठी शास्त्रज्ञाला राजिनामा द्यावा लागला होता. अगदी त्यांचा संबंध असो किंवा नसो.

ह्या वरच्या संज्ञा (terms) पुढच्या लेखात बरेचदा येतील, म्हणुन जरा जास्त जागा घेतली. तसच पुढे काही संदर्भ लागला तर इथे परत येता येईल, म्हणुन हे नमनाला घडाभर research.

"पीएचडी पुराण भाग २:- पीएचडीचा शोध">

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतकं अर्धवट का लिहीलंस रे भाऊ?

पी च डी करायला चार वर्षे लागतात. धागाही चार वर्षात भरभरुन जाईल

देशमुखसाहेब
पीएचडीचं महत्व माझ्यासारख्या अशिक्षित माणसाला किती वाटतं हे तुम्हा शिकलेल्यांना नाही समजायचं. पीएचडी म्हणजे काय, लोक कसे पीएचडी करतात हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. वाईच उलगडून सांगा वं

माझा स्वत:चा या बाबतचा अनुभव शेअर करतोय....
मेडीकलला एमडी / एम एस नंतर पी एच डी ही दुर्मिळ बाब. मी तसा निर्णय घेताच "कां?", " कशाला?’, " काय फायदा ?" हे प्रश्न सुरू झाले. आमच्या मराठवाडा विद्यापीठात (आता डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) मेडीकल फॅकल्टीत आधी कोणी पी एच डी केलेलं नव्हतं. मी पहिलाच. मग त्यासाठी नियम करून घ्यावे लागले. मात्र प्रत्यक्ष पी एच डी करण्याचा अनुभव अत्यंत आनंददायक होता. ते चार वर्ष माझ्या आयुष्यात अत्यंत झपाटलेले होते. पदवीदान समारंभाला डॉ नारळीकर प्रमुख पाहूणे होते. पदवी घेतांनाच त्यांनी मला नंतर भेटायचंय असं सांगितलं व त्याप्रमाणे ते भेटलेही. त्यांना ही मी वैद्यकीय विषयात पी एच डी केलं याचं नवल होतं, त्यांनी अत्यंत आस्थेवाईकपणे माझा विषय समजाऊन घेतला......आणि मला पूढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या

डॉ अशोक,

>> मेडीकलला एमडी / एम एस नंतर पी एच डी ही दुर्मिळ बाब.

तुमचे अनुभव वाचायला आवडतील. कृपया या यादीत आपले नाव टाकावे. Happy

आ.न.,
-गा.पै.

इतकं अर्धवट का लिहीलंस रे भाऊ? >>>>>>>>

अरे मास्तरचा फोन आला होता, त्यामुळे तसच प्रकाशीत केलं आता ते पुर्ण केलय.

kiranu नक्कीच लिहितो. हळूहळू एक एक अनुभव लिहितोच.

डॉ. अशोक, डॉ. नारळीकरांच्या हस्ते.... खरच लकी. मला हे भाग्य फक्त एकदाच मिळालं, तेही दुरुन बघण्याचं. Happy

हा धागा, संशोधनक्षेत्रातील मायबोलीकर इथे कसा हलवायचा?

>> हा धागा, संशोधनक्षेत्रातील मायबोलीकर इथे कसा हलवायचा?
एकदा एडिट करून दुसरी कॅटेगरी घे. त्यानं होऊन जाईल बहुतेक!

Srd अगदी बरोबर. पण एकदा का तुम्ही त्या काळ्या यादीत आले, की करिअरच संपते. त्यामुळे अश्या भानगडीत न पडलेलं बर.