सरोवर
प्रशस्त हिरवळ निळ्या कपारी
झुकली झाडे जुनी तिरावर
पडछाया घेऊन नभाची
बागडते मदमस्त सरोवर..
झुकलेल्या फ़ांद्यांना चुंबत
खोडांना घासत अंगाने
भिजले आहे चिंब कधीचे
धुंद लव्हाळीच्या रंगाने...
हुसकत फ़ौज तटावर बसली
हुंदडणार्या करकोच्यांची
पांघरते अन रेशीम चादर
अंगावर कोमल लाटांची...
शीतल वारा सुटतो जेव्हा
बावरते घाबरते पळते
अनेकदा धावून बिचारे
पदरात नदीच्याही शिरते..
रानफ़ुले काही पडलेली
ओंजळीत घेउन भिरभिरते
स्वच्छ सरोवर खडकावरती
कोंदण कसलेसे उमटवते....
बगळ्यांची आरास किनारी
भ्रमरांची झुडूपात भरारी
बघत सरोवर लोळत पडते
खडकांच्या पकडून कपारी....